सौ राधिका भांडारकर
पुस्तकावर बोलू काही
☆ “आणखी एक सिद्धार्थ (अनुवादित कथासंग्रह)”– मूळ हिन्दी लेखिका : सुश्री प्रतिमा वर्मा – अनुवादिका : सौ. उज्ज्वला केळकर ☆ परिचय – सुश्री सौ राधिका भांडारकर ☆
पुस्तक : आणखी एक सिद्धार्थ – ( अनुवादित कथासंग्रह )
मूळ लेखिका : प्रतिमा वर्मा
अनुवाद : उज्ज्वला केळकर.
प्रकाशक : महाकवी एंटरप्राईजेस.
पृष्ठे:२०८
किंमत :४२०/—
२०२२ साली नव्याने प्रकाशित झालेला, मूळ लेखिका प्रतिमा वर्मा यांचा अनुवादित कथासंग्रह”आणखी एक सिद्धार्थ” नुकताच माझ्या वाचनात आला. या कथासंग्रहाचा अनुवाद सुप्रसिद्ध लेखिका आणि कवियत्री माननीय सौ. उज्वला केळकर यांनी अत्यंत प्रभावीपणे आणि परिणामकारक रीतीने केलेला आहे. यापूर्वीही त्यांच्या अनेक हिंदी कथासंग्रह व इतर साहित्याचं अनुवादित लेखन मी वाचलेले आहे आणि मला ते आवडलेलं आहे. त्यापैकीच”आणखी एक सिद्धार्थ” हे पुस्तक.
सौ. उज्ज्वला केळकर
मा. उज्वला ताई त्यांच्या इतर भाषेतील साहित्याचा अनुवाद करण्याच्या भूमिकेबद्दल मनोगतात म्हणतात,
”अनुवादरूपाने का होईना इतर भाषेतील दर्जेदार साहित्याचा आस्वाद घेता येतो. त्या त्या समाजाच्या धारणा, वर्तन प्रणाली, संस्कृती याचाही अनुभव घेता येतो.”
साध्यर्म आणि वैधर्म जाणून घेण्याच्या दृष्टीने त्यांनी त्यांना आवडलेल्या विशेष करून आशय – विषय मांडणीच्या अनुषंगाने जवळच्या वाटलेल्या हिंदी कथांचा मराठी अनुवाद करून ते साहित्य वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा मानस खरोखरच स्तुत्य आहे.
“आणखी एक सिद्धार्थ” या प्रतिमा वर्मा यांच्या कथासंग्रहात आठ दीर्घकथा आहेत. प्रतिमा वर्मा या मूळच्या पाटणा बिहार इथल्या रहिवासी. १९७० पासून त्यांनी स्वतंत्र लेखनाला सुरुवात केली आणि अनेक साहित्यप्रकार विविध माध्यमातून प्रकाशित केले. प्रतिमा वर्मांच्या बहुतेक कथा या स्त्री केंद्रीत आहेत. मात्र त्यातील स्त्री दर्शन हे विविधरंगी आहे. त्यांच्या कथेतल्या स्त्रिया मुक्त असल्या तरी विचारी आणि खंबीर आहेत. मानसिक आणि भावनिक पातळीवर आधार मिळण्याचे सामर्थ्य त्यांच्याच आहे. प्रतिमा वर्मा यांचे लेखन तरल आणि संवेदनशील आहे. त्यात नुसतीच कल्पनारम्यता नसून वास्तवतेचे रेखाटन आहे आणि या कथांचा अनुवाद करताना उज्वला ताईंनी लेखनाचा गाभा, आशय त्याच प्रभावीपणे जपण्याचे भान आणि समतोल दोन्हीही राखलं आहे. उज्ज्वलाताईंचे मराठी भाषेवरचे प्रभुत्व लक्षवेधी आहे.
“आणखी एक सिद्धार्थ” या कथासंग्रहातील आठही कथा वेगवेगळ्या विषयांवरच्या आहेत. वास्तविक कथानकं ही नेहमीच्याच सामाजिक, कौटुंबिक अथवा भावभावनांचं विश्व उलगडवणारं असलं तरी या सर्वच कथा वाचकाला जगत असणाऱ्या नेहमीच्या जीवनापलीकडचं जीवन, वेगळं भावविश्व अनुभवायला भाग पाडतात. एका वेगळ्याच स्तरावरचं सुंदर, सूत्रबद्ध लेखन वाचल्याचा आनंद मिळतो. सुरुवात मध्य आणि शेवट अशा नियमबद्ध साच्यातल्या या कथा नसून त्या वाचल्यानंतर मनात काही प्रश्न ठेवून जातात. जिथे कथा संपते तिथूनच ती पुन्हा सुरू झाल्यासारखे वाटते हे या कथांचं वैशिष्ट्य आहे.
“आणखी एक सिद्धार्थ” ही कथा एका श्रीमंत बापाच्या शाळकरी मुलाची मनोविश्लेषणात्मक कथा आहे. चांगल्या शिक्षण प्राप्तीसाठी भरपूर पैसा असलेल्या अनुपम नावाच्या मुलाच्या पैसेवाल्या, प्रसिद्ध वकील बापाने त्याला महागड्या रेसिडेन्सी स्कूल मध्ये ठेवलेले असते पण तिथे आलेल्या अत्यंत वाईट अनुभवामुळे त्याच्या बालमनावर परिणाम होतो. या वाईट अनुभवात शाळेतल्या गुंड मुलांनी त्याच्या मित्राची निर्घुण हत्या केलेली असते आणि या विरुद्ध लढण्या ऐवजी शाळेचे व्यवस्थापन केवळ पैशाच्या लोभाने प्रकरण दाबून टाकतात. दुसरा वाईट अनुभव म्हणजे शिक्षकाकडून.. ज्याची प्रतिमा खरोखरच चांगला शिक्षक अशी असते आणि त्याच्याकडून अनुपमचे लैंगिक शोषण होते. परिणामी अनुपम सारखा मूळचा हुशार विद्यार्थी मनोरुग्ण होतो. या घटनेचा त्याच्या अभ्यासावर परिणाम होऊन तीन वेळा नापास झाल्यामुळे शाळेतून त्याला डी बार केले जाते. याच दरम्यान त्याला त्याचे वडील जे आदर्श वकील वाटत असतात तेही गुन्हेगारांना सोडवण्याच्या धंदा करून अमाप पैसा मिळवत आहेत हे कळल्यावर त्याच्या मनाचा उद्रेक होतो आणि अखेर एक नापास केडरचा मुलगा असला तरी वाईट कर्मांची साथ देणाऱ्या त्याच्या डॅडी समोर तो ताठपणे उभा राहून त्यांना”तुम्हाला शरम वाटली पाहिजे.” असे तो म्हणू शकतो आणि त्याचवेळी कोमेजलेलं त्याचं मन मुक्त होतं. स्वप्नात भयभीत होणारा हा मुलगा क्षणात भयमुक्त होतो. आणि मग तो काहीतरी स्वतःशीच ठरवून घराबाहेर पडतो. पिंजरा तोडून बाहेर येतो. मुक्त होतो. अशी अतिशय सुंदर संवेदनशील बालमनाची ही एक प्रौढ कथा आहे.
दूरस्थ या कथेतल्या या ओळी मला फार आवडल्या.”इतक्या वेळानंतर मला वाटू लागलं की मी घराचा मालक आहे. माझ्याविना काही जरुरीची कामं खोळंबून राहू शकतात. प्रेम किंवा रोमान्सने पूर्णपणे झाकून टाकता येईल इतका जीवनाचा फलक लहान नाहीच मुळी. जीवनाचे अनेक पैलू आहेत,”
ही कथा दोन व्यक्तींची आहे. एक स्त्री आणि एक पुरुष. त्यांचे एकमेकांशी लग्न झालेलं आहे पण मुळातच हे लग्न दुसऱ्यांची मनं सांभाळण्यासाठी झालेलं आहे. एका वेगळ्याच नात्याची कथा वाचताना मन थकून जाते. या कथेतल्या स्त्री पात्राची सक्षमता मनाला समाधान देते.
तिचं हसू ही एका कुरूप उपेक्षित आणि प्रत्यक्ष आईकडूनच अवहेलना सहन करत जगणाऱ्या स्त्रीची हृदय पिळवटून टाकणारी कथा आहे. या कथेतल्या पात्रांचे विविध प्रकारचे भावनिक स्तर वाचताना मानवी जीवनाचे अनेक पैलू वाचकांसमोर येतात. ही सुद्धा एक अतिशय सुंदर कथा आहे.
राख ही पती-पत्नीच्या विस्कटलेल्या नात्याची कथा आहे. या कथेतले भावबंध वाचताना मन घायाळ होते. पुरुषाचं मन आणि स्त्रीचं मन याचे वास्तव रूप या कथेत अनुभवायला मिळतं. असहाय्यता, प्रेम, पर्याय नसणारी स्थिती आणि त्यातूनच निर्माण होणारी घृणा, तिरस्कार, हतबलता आणि तटस्थता याचे सुरेख मिश्रण म्हणजे ही कथा. वाचायलाच हवी अशी.
दिलासा या कथेत एका लष्करातल्या बेपत्ता जवानाच्या बापाच्या मनाची घालमेल आणि त्याच वेळी गावातल्या एका शहीद जवानाच्या अंत्ययात्रेसाठी जमलेलल्या जनसमुदायाचे वर्णन आहे आणि त्या अनुषंगाने समाज, सरकार, आजची तरुण पिढी यांची सीमेवर लढणाऱ्या सैनिकाविषयीची जी भावना, जी मानसिक गुंतवणूक अनुभवायला मिळावी अशी अपेक्षा असताना नेमके त्या उलट सामाजिक चित्र दिसावं याची खंत आणि केंद्रस्थानी सीमेवर बेपत्ता अथवा युद्धकैद्यांच्या यादीत नाव असणाऱ्या जवानाच्या वृद्ध बापाची प्रचंड मानसिक यातायात अत्यंत प्रभावीपणे मांडलेली आहे. ही कथा वाचताना वाचकालाही सूक्ष्मपणे अपराधाची जाणीव पोचत राहते. या तुटलेल्या बापाला निदान देशासाठी लढणाऱ्या त्याच्या मुलाची दिलासा देणारी एखादी खबर मिळावी असे वाटत राहते.
काळा त्रिकोण या कथेचं शीर्षक वाचल्यावरच या कथेतला विषय कळतो. ही एक प्रेमकथाच आहे आणि या प्रेमकथेतही त्रिकोण आहे. तीन व्यक्तींभोवती ही प्रेम कथा गुंफली आहे वरवर हा विषय नेहमीचाच वाटत असला तरीही या कथेत टिपलेली मनामनाची वादळे हही विलक्षण वाटतात. या प्रेमात कुठलीही स्पर्धा, द्वेष, मत्सर चढाओढ अथवा फसवणूक नाही. एका वेगळ्याच उंचीवरची कथा ही आहे. या कथेच्या शीर्षकाबद्दल मी काही सांगण्यापेक्षा कथा वाचून वाचकाने त्यातला गर्भितार्थ शोधावा एवढीच अपेक्षा.
एकंदरीत विचारांचं आणि समर्थ भाषेचं सौंदर्य प्रत्येक कथेत जाणवतं. कधी विधानातून तर कधी संवादातून.
दूरस्थ या कथेत तो तिला विचारतो,”तुला पुरुषाची गरज वाटत नाही का?”
तेव्हा ती उत्तर देते,
“वाटते की. पण जिला मन मारायची सवय लागली आहे तिच्या बाबतीत हा काही मोठा प्रॉब्लेम नाही. प्रेम हे असं गीत आहे की जे प्रत्येक वाद्यावर गाता येत नाही. मी दुसऱ्या प्रकारचं वाद्य आहे असं समजा.”
राख या कथेतील नायिका तिच्या जीवनात हरलेल्या पतीला ठामपणे सांगते,”तुम्ही गरीब यासाठी नाही की तीन चारशे रुपयात तुमचं भागत नाही. तुम्ही गरीब यासाठी आहात की आपल्या इच्छा, आपली स्वप्नं, आपलं व्यक्तिमत्व तुम्ही हरवत चालला आहात. संतपणाचा अभिमान बाळगताना अकिंचन असल्याचा जाणीवेतून तुम्ही सुटू शकत नाही.
“प्रेतावर एक मण लाकडाचे ओझं काय नि नऊ मण काय.. काय फरक पडतो. तुमचे जितक्या मर्यादेपर्यंत पतन झाले त्याच्या खाली कोणतीच पातळी नाही. मृत्यूची सुद्धा नाही.”
सांजवात या कथेत जयंतीच्या मनातले विचार किती सुंदर आणि परिणामकारक शब्दात लिहिले आहे ते बघा.”आत्मीयतेच्या ओलाव्याने भरलेला गोपू तेल वातीने ओथंबलेल्या दिव्यासारखा आहे. त्याच्या स्वप्नांची वात चेतवायला हवी. चिरा गेलेल्या दिव्यात मनोबलाची स्नेहधारा भरायला हवी.”
असाच एक आणखी सुंदर वास्तविक विचार.
“आपण जळू लागलात तर प्रथम काय फेकाल? शरीराची कातडी की परिधान केलेले नैतिकतेचे कपडे?”
“क्षणाच्या छोट्याशा अंगठीतून अनुभूतीचं पुरच्या पुरं ठाणंच खेचून निघतं. ढाक्याची मलमल तरी इतकी बारीक असेल?”
“तू भेटल्यानंतर माझ्या लक्षात आले की मला एक परिपूर्ण स्त्री हवी आहे जिच्याजवळ हृदय, बुद्धी, समज, शक्ती आहे केवळ चेहरा नाही.”
अशा अनेक सुंदर विचारांची शाब्दिक रोपटी, फुलं या कथासंग्रहात जागोजागी फुललेली आहेत. अर्थपूर्ण संवाद, चपखल उपमा ही सौंदर्यस्थळे यात अनुभवता येतात. वाचताना मन कधी व्यथित होतं, कधी उद्युक्त होतं, प्रोत्साहित होतं, आनंदी समाधानी होतं. कथासंग्रह वाचताना वेगवेगळ्या मानसिक पातळ्यांवरचा सुरेख आणि उद्बोधक प्रवास घडतो.
या पुस्तकाचं मुखपृष्ठही खूप बोलकं आहे. कृष्णधवल रंगातलं हे चित्र परिणामकारक आहे. शीर्षक कथेशी संबंध दर्शविणारं आहे. मुठीतून दिसणारी खिडकी, खिडकीच्या बाहेरचं जग पाहणारा एक किशोरवयीन मुलगा आणि उडत जाणारा मुक्त पक्षी. कुणाच्यातरी मनमानी मुठीत अडकलेल्या त्या मुलाच्या भविष्याला खिडकीच्या बाहेरच्या जगात स्वतंत्र जगण्याची वाट मिळाल्यावर तो अथांग आभाळात विहरणार्या पक्ष्यासारखा मुक्त होतो. अतिशय अर्थपूर्ण, आकर्षक मुखपृष्ठ भरत यादव यांनी रेखाटलं आहे. जे या संपूर्ण कथासंग्रहासाठी समर्पक आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन.
शेवटी इतकेच म्हणेन”मानसिक पातळ्यांवरचा सुरेख आणि उद्बोधक प्रवास घडविणार्या या कथा आहेत.” थोडक्यात प्रत्येकाने एक सुंदर पुस्तक वाचनाचा आनंद घ्यावा. विशेष म्हणजे हिंदी साहित्यातले सौंदर्य वाचकांपर्यंत तंतोतंत पोहोचवणाऱ्या मा. उज्वलाताई यांचे मनापासून आभार आणि अभिनंदन. त्यांच्या या साहित्य वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा !
© सौ. राधिका भांडारकर
ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७ मो. ९४२१५२३६६९ [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
उज्वला ताईंनी पुस्तकाच सौंदर्य अनुवादित केलं. आणि राधिकाताई तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलं तुम्ही दोघीही मोठ्याच.