सौ. उज्ज्वला केळकर
पुस्तकांवर बोलू काही
☆ “डायरीतील कोरी पाने ” – लेखक : श्री अरविंद लिमये ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर ☆
पुस्तक- डायरीतील कोरी पाने (कथासंग्रह)
लेखक – अरविंद लिमये
प्रकाशन – अमित प्रकाशन
पृष्ठे – २००
मूल्य – ३८० रु.
नुकतीच डायरीतील कोरी पाने ‘ पाहिली ‘. पण, ती कोरी होतीच कुठे? त्यावर नानाविध कथांचे नाना रंग उधळले होते. प्रत्येक ठिपका म्हणजे जीवनाचा एकेक तुकडाच. हा कथासंग्रह आहे सुप्रसिद्ध कथालेखक अरविंद लिमये यांचा. साधी-सोपी भाषा, सहज संवाद, उत्कटता, गतिमानता अशी काही वैशिष्ट्ये या कथांची सांगता येतील. संस्कारक्षमता हे मूल्य बहुतेक सगळ्या कथेतून व्यक्त होत असलं, तरी कुठे कुठे हे संस्कार उघडपणे व्यक्त होतात, कुठे कुठे ते सहजपणे नकळत व्यक्त होतात. या १७ कथांमधील बहुतेक कथा नायिकाप्रधान आहेत.
श्री अरविंद लिमये
पहिलीच कथा आहे ‘हँडल विथ केअर’. ही कथा सविता, तिचे वडील अण्णा, तिचे दादा-वाहिनी यांच्याभोवती गुंफलेली. आई गेल्यावर तिचे दादा-वहिनी अण्णांना त्रास देतात, कष्ट करायला लावतात, असा तिचा समज. ती जाब विचारायला म्हणून गावी येते. त्यानंतर संध्याकाळी ती अण्णांबरोबर देवाला जाते. तिथे अण्णा तिचा समज हा गैरसमज असल्याचे पटवून देतात आणि म्हणतात, ‘नाती जवळची-लांबची कशीही असोत, ती नाजूकच असतात. त्यांना ‘हँडल विथ केअर’ हे लेबल मनोमन लावूनच टाकायचं. तरच ती हलक्या हाताने जपता येतात. कथेचा शेवट अर्थातच गोड. कसा? त्यासाठी कथा वाचायलाच हवी.
‘अक्षयदान’ मधील वैभवीची आई आणि ‘त्या दोघी’ मधील सुवर्णाची आई.. दोघीही ग्रामीण, दरिद्री, कष्टकरी, ज्यांना आपण सर्वजण अडाणी म्हणतो अशा. पण त्यांचं शहाणपण लेखकाने वरील कथांमधून मांडले आहे. केलेल्या चुकीचं प्रायश्चित्त घ्यायला हवं, असे संस्कार वैभवीची आई रुजवते. तर ‘त्या दोघी’ मधील ‘मी इतक्यात लग्न करणार नाही. खूप शिकणार आणि स्वत:च्या पायावर उभी रहाणार’ असे म्हणणाऱ्या निग्रही सुवर्णाच्या मागे तिची आई ठामपणे उभी रहाते. सुवर्णा पैसे मिळवायला लागल्यावर घरी पैसे पाठवते, तेव्हा मात्र तीच आई निग्रहाने सांगते, ‘एकदा पैशाची चव चाखली आमी, तर नंतर कष्ट नको वाटतील. ’ आपल्या दोन्ही मुलांनाही ती म्हणते, ‘ताईचे पैसे घ्यायचे नाहीत. तिच्यासारखे कष्ट करा आणि तुम्ही मोठे व्हा. ’
‘आनंद शोधताना’ कथेचा नायक रोहन. त्याची बँकेच्या रूरल ब्रँचमध्ये मॅनेजरच्या पदावर बदली होते. नव्या वातावरणाशी तो जुळवून घेत असताना, त्याला दिसतं, की एक वयस्क पेन्शनर ३ नंबरचे टोकन दिले की बिथरतात. स्टाफ मग मुद्दामच त्यांना ३ नंबरचे टोकन देऊन बिथरवतात आणि आपली करमणूक करून घेतात. रोहन मात्र तसं न करता ते कारण समजून घेतो. त्यांच्या व्यथा-वेदनांची कहाणी ऐकतो. त्यांना सहानुभूती दाखवतो. ते कारण कोणतं, हे कथेतच वाचायला हवं. त्याला निघताना आईचं बोलणं आठवतं. ’आनंद मिळवण्यासाठी मुळीच आटापिटा करू नकोस. मनापासून आणि जबाबदारीने तू तुझं काम कर. ते केल्याचाही एक वेगळाच आनंद असतो. ’ हा आनंद रोहन, त्या आजोबांना मदत करून मिळवतो.
‘काही खरं नव्हे’ ही गूढ कथा आहे. याची सुरुवातच बघा… ‘मृत्यूचं काही खरं नाही. तो चकवा दिल्यासारखा चोर पावलांनी कसा, कुठून येईल आणि कधी झडप घालेल, सांगताच येत नाही. ज्या क्षणी तो येतो, त्याच क्षणी होत्याचं नव्हतं करून टाकतो. ’.. माधवराव आणि मालतीबाईंची ही कथा. त्यांचं वानप्रस्थातलं रखरखीत सहजीवन. एक दिवस माधवरावांना कांद्याची भजी खायची तीव्र इच्छा होते. दोघांच्या या विषयावरील बोलाचालीनंतर दुपारी चहाच्या वेळी भजी करायचं मालतीबाई मान्य करतात. जेवण करून माधवराव झोपतात आणि त्यांना अनेक भास होऊ लागतात. पत्नी मेलीय. शेजाऱ्यांच्या मदतीने अंत्यविधी केले, रात्री मुलगा-सून आले. त्यांच्या बोलण्यातून आई आहे असं जाणवतं. माधवराव चक्रावतात. आणि कथेचा शेवट – अगदी अनपेक्षितसा. वाचायलाच हवा असा. लेखकाचं कौशल्य हे की, प्रत्यक्ष लेखनात ते माधवरावांचे भास न वाटता वास्तव प्रसंग आहेत, असंच वाटतं. एक उत्तम जमलेली कथा असं या कथेचं वर्णन करता येईल.
‘आतला आवाज’ ही कथा, अभि, समीर आणि अश्विनी या तीन मित्रांची. ते तिघे कॅम्पस इंटरव्ह्यूतून निवड होऊन ‘कॅम्बे’ ही आय टी कंपनी जॉईन करतात. इथे त्यांच्या बरोबरीचाच असलेला सौरभ त्यांचा बॉस आहे. त्याचेही यांच्याशी मित्रत्वाचे संबंध जुळतात. समीर तर त्याचा खास जवळचा मित्र होतो. पण पुढे प्रमोशनसाठी नावाची शिफारस करायची असते तेव्हा तो समीरऐवजी अश्विनीची शिफारस करतो. का? ते कथेत वाचायला हवं. समीर बिथरतो, अश्विनीने प्रमोशन नाकारावं म्हणून तिला गळ घालतो. त्यासाठी अनेक खरी-खोटी कारणे देतो. अश्विनी मान्यही करते, पण त्याने सांगितलेले एकेक कारण खोडत म्हणते, ‘तू जे बोलतोयस, त्याच्यामागे स्वार्थातला ‘स्व’ आहे की ’स्व’त्वातला ‘स्व’ आहे? तुझा ‘आतला आवाज’ काय सांगतोय? मी तुझ्या उत्तराची वाट पाहीन. ’ समीरला आपला आतला आवाज क्षीणपणे कण्हतोय, असं वाटू लागतं. या कथेत चौघांचेही मनोविश्लेषण करणारे संवाद लिहिणं आव्हानात्मक होतं, पण लेखकाने ते लीलया पेलले आहे.
‘झुळूक’ या कथेमध्ये, डॉ. मिस्त्रींचं, तर ‘निसटून गेलेलं बरंच काही’ मध्ये पेईंग गेस्ट ठेवून चरितार्थ चालवणाऱ्या आणि दीड-दोन वर्षे लेखकाला जेवूही घालणाऱ्या काकूंचे शब्दचित्र रेखाटले आहे. या दोघांचा आणि लेखकाचा सहवास अल्पच, पण या दोन्ही व्यक्ती आठवणीत रेंगाळत रहाणाऱ्या. त्या तशा का, हे कथा वाचूनच कळेल.
‘डायरीतील कोरी पाने’ कथेची सुरुवात अशी …. नंदनाला डायरी लिहिण्याची सवय असते. सासरी गेल्यावर ती एकच दिवस डायरी लिहिते. नंतर तिला वाटतं, ‘आपण खरं खुरं लिहिलेलं राहूलच्या वाचनात आलं तर?’ मग ती डायरी लिहिणंच बंद करते. सासरी सगळं आलबेल आहे असं तिला वाटतं, पण तसं ते नसतं. तिला तिची मोठी जाऊ प्रभा आक्रस्ताळी, विचित्र वागणारी-बोलणारी वाटते. एकदा नंदना आणि ती मोकळेपणाने बोलताना, प्रभाच्या वागण्या -बोलण्यामागचं कारण तिला कळतं. ‘या घरात हिसकावून घेतल्याशिवाय काही मिळणार नाही’, असा आपला अनुभव प्रभा तिला सांगते. तिला आनंद मिळेल, असं घरात कुणी कधी वागलेलंच नसतं. ती आपली कर्मकहाणी नंदनाला ऐकवते. त्यांच्या कुटुंबाला वेगळं काढायचं घरात घाटत असतं. नंदना रात्री राहूलशी प्रभावहिनींबद्दल सविस्तर बोलते आणि म्हणते, ‘आपण त्यांना वेगळं करण्यात सहभागी व्हायला नको’ राहूल मान्य करतो. त्याला तिचं हे रूप विशेष भावतं. नंदनाला वाटतं, ‘डायरीतील मधली कोरी पाने’ मनासारखी लिहून झालीत. ’
‘ पत्र ’ आणि ‘फिनिक्स’ कथांमधील नाट्यमयता विशेष लक्ष वेधून घेते.
खरं तर यातील सगळ्याच कथांमधील संवाद वाचत असताना आणि प्रसंगांचे वर्णन वाचत असताना असं वाटतं, की यात नाट्य आहे. याचं नाटकात माध्यमांतर चांगलं होईल. यापैकी पत्र, अॅप्रोच, काही खरं नव्हे, या कथांवर लेखकाने एकांकिका लिहिल्या आहेत, व त्यांचं सादरीकरणही लवकरच अपेक्षित आहे. ‘वाट चुकलेले माकड’ या कथेवर बालनाट्य लिहिले आहे व ते सादरही झाले आहे.
‘देव साक्षीला होता’ ही महार जातीच्या बबन्याची करूण कहाणी हृदयद्रावक. ऑपरेशन करून घरी परतताना अचानक मोठा पाऊस येतो. इतरांप्रमाणे त्याला शाळेपर्यंत पळवत नाही, म्हणून तो जवळच्या देवळात आश्रय घेतो, तेव्हा लोक ‘म्हारड्याने देव बाटवला’ म्हणून त्याच्यावर दगडांचा वर्षाव करतात आणि त्याचा जीव घेतात.
‘एकमेक’ ही १७ वी आणि शेवटची कथा. यातील नायिका साधी, सरळ, समाधानी. कसलाच आग्रह नसलेली, आणि निर्णयक्षमताही नसलेली.. पण जेव्हा तिच्यावर संकट कोसळते, तेव्हा ती कशी खंबीरपणे उभी रहाते, संकटाचा मुकाबला करत रहाते, सगळं कसं धीराने घेते, आणि त्याचं श्रेयही मुलांना आणि शय्येवर पडून राहिलेल्या अपंग नवऱ्याला देते, हे सगळं सांगणारी ही कथा.. नेमकी प्रसंगयोजना आणि उत्कट संवाद यामुळे चांगलीच लक्षात रहाते.
यातील अनेक कथा पूर्वप्रसिद्ध आहेत. ‘अक्षयदान’, ‘हॅण्डल विथ केअर’, अॅप्रोच’ या तीन कथांना ‘विपुलश्री’ या दर्जेदार मासिकाच्या कथास्पर्धांमधे पुरस्कारही मिळालेले आहेत.
सर्वांनी आवर्जून वाचावा आणि कथावाचनाचा आनंद घ्यावा, असाच हा संग्रह …. ‘डायरीतील कोरी पाने !’
परिचय – सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈