☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ कथा संग्रह – “माय नेम इश ताता” – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ सौ. राधिका भांडारकर ☆ ☆

पुस्तकाचे नांव : कथा संग्रह – “माय नेम इश ताता”

मूळ लेखिका : डॉ सूर्यबाला 

अनुवाद : श्रीमती उज्वला केळकर

प्रकाशक : सुकृत प्रकाशन

प्रथम आवृत्ती : ०३ डीसेंबर २०१७

किंमत : रु ३१०

सौ. उज्ज्वला केळकर

“माय नेम ईश ताता “या  कथा संग्रहात २० कथा आहेत. सौ. ऊज्वला केळकर यांनी  मूळ हिंदी कथा,अनुवादित केल्या आहेत.

उत्कृष्ट कथांचा ऊत्कृष्ट अनुवाद  हीच या कथासंग्रहावरची पहिली छाप!!

या वीसही कथांमधून निरनिराळ्या प्रकारची माणसं, त्यांची संस्कृती, त्यांच्या भोवतालचं वातावरण, त्यांचं जगणं, त्यांचं भावविश्व, त्यांची सुख दु:खं,आशा निराशा   यांचा अनुभव येतो. प्रत्येक कथा वाचत असताना,सतत असं वाटत राहतं,आपण यांना भेटलोय्!

आपल्या भवतालचीच ही माणसं आहेत.. त्यांच्या जीवन पद्धतीशी, त्यांच्या जगण्याशी आपलं नातं जमतं..

कथेतल्या व्यक्ती आपल्या मनात रेंगाळत राहतात. रूतून बसतात.

सौ. राधिका भांडारकर

सरकारी यंत्रणेतून, अरुण वर्मा सारखी, प्रामाणिक व्यक्ती, सस्पेंड झाल्यावर म्हणते, “मला काही क्रांती’ विद्रोह घडवून नव्हता आणायचा, पण आज लोकं खर्‍याला खरं म्हणण्यासाठीही घाबरतात याचा खेद वाटतो.” हे वाचताना मन चिरुन जातं..

“माय नेम ईश ताता “या शिर्षक कथेत आई वडीलांच्या स्पर्धात्मक इर्शेला विद्रोह करणारी एक छोटी बालिका केवीलवाणी होऊन भेटते. पण तिच्यात आणि तिच्या आजीत निर्माण होणारं विश्वासाचं, भरवशाचं नातं मन भारावून टाकतं.

“कागदी नावा चांदीचे कुंतल” आणि “काय माहीत” या दोन्ही कथांमधलं, बाळपणीचं अव्यक्त प्रेम वाचताना मन हळुवार बनतं….!!

“हे घे किन्नी..” या कथेत, किन्नी, किन्नीचे लाचार बाळपण, मावशीची वर्चस्व गाजवणारी, उपकाराची माया, तिचं ऊध्वस्त प्रेम आणि एकंदरच कुणीतरी ताब्यांत घेतलेली तिच्या सुखाची दोरी…. ही किन्नी वाचताना मन विदीर्ण होतं.. या कथांमधून स्रियांच्या मनातले,जगण्यातले बारकावे जाणीवपूर्वक टिपले आहेत. शब्दरचना इतकी भक्कम आहे की कथेतलं अवास्तव वास्तवही विचार करायला लावतं…. कथा कुठेही घसरत नाही. पसरत नाही.

ती घडत जाते. जशी आहे तशी. कथा कशी सजीव भासू शकते, याचाच अनुभव हा कथा संग्रह वाचताना मिळतो.

“….ना सौंदर्य,ना सुघडपणा, ना कोमलता, ना विभ्रम… बाईपण शोधायचंच झालं तर दिसतात काळ्या ढुस्स मनगटात दोन चार मळकट बांगड्या, आणि नाकात सुंकली… संपली बाईपणाची मर्यादा…” “ती” या कथेची सुरवातच मनाची पकड घेते. कथा वाचत असताना वाचकाच्याच मनाची पडझड होते…. आयुष्यभर संघर्ष… पण तरीही ती म्हणते, “डोंगरासारख्या ऊरावर पडलेल्या आयुष्याची पर्वा नाही. माझ्यात कुवत आहे. माझं एक घर आहे. दोन हात आहेत. आई मुलाचं पोट भरायला ते समर्थ आहेत….”

“ती” या कथेतली ही ठिणगी अंधारातली दिवटीच वाटते.,,,!,

“आशिर्वादाचे व्यापारी…” ही कथा तर मानवी मनाचे सुंदर दर्शन घडवते. धर्म, जात पंथ या पलिकडचा माणूस बघणारा सय्यद, स्वत:ला “आशिर्वादाचे व्यापारी ” म्हणून

संबोधणारा सय्यद, कथेच्या अंतीम टप्प्यावर “मानवतेचा पुजारीच “भासतो.

“गजाच्या आरपार..” या कथेत शेवटी एक सुंदर संदेश दिलाय्.

“…..मुक्त कोण आहे? कदाचित कुणीच नाही. न पुरुष.. न स्त्री.. पूर्ण मुक्ती एक स्वप्न आहे. आणि जगणं एका यथार्थात असतं. यथार्थ म्हणजे मुक्त होण्याचं  एक रंगीत स्वप्नं… जीवनांत निम्म्यापेक्षा जास्त आनंद हे स्वप्नच देतं..”

या कथासंग्रहाबद्दल प्रामुख्याने म्हणावसं वाटतं की, या सर्वच लहान रुंदीच्या कथांमधून आभाळाला व्यापतील, इतकं मानवी जीवनावरचं भाष्य दडलेलं आहे.. ते वाचकापर्यंत परिणामकारक रीतिने पोहचतं, त्याचं  श्रेय केवळ ऊज्वलाताईंच्या प्रभावी लेखनशैलीला आहे. अचूक शब्द, भाषेचा ओघ आणि लावण्य याचा अखंड झरा वाचकाला  एका सुंदर कृतीचा महान आनंद देतो.. जाणीव आणि वैचारिक ऊंची त्यांच्या लेखनात नेहमीच जाणवते. अनुवादाचं एक सुंदर तंत्र त्यांच्याजवळ असल्यामुळे, तसेच हिंदी भाषेतलं सुंदर साहित्य, मराठी वाचकांपर्यंत पोहचवण्याची त्यांची प्रामाणिक तळमळ प्रशंसनीय आहे…

ऊज्वलाताई खूप खूप धन्यवाद….!!!

(या लेखांत मी काही कथांवरच विचार मांडले. मात्र या कथा संग्रहातील प्रत्येक कथा सुंदर,अर्थपूर्ण आशयसंपन्न आणि विचार करायला लावणारी आहे…)

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments