☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘माझा गाव माझा मुलूख’ – श्री मधु मंगेश कर्णिक ☆ श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर ☆
पुस्तक – माझा गाव माझा मुलूख
लेखक – मधु मंगेश कर्णिक
परिचय – गुरुनाथ ताम्हनकर
प्रकाशक – मैजेस्टिक पब्लिशिंग हाउस
पृष्ठ संख्या – 292
मूल्य – 300 रु
मैजेस्टिक रीडर्स लिंक – >> माझा गाव माझा मुलूख
‘कोकण’ हा देवदेवतांच्या वरदहस्ताने पावन झालेला मुलुख. या मुलुखाप्रमाणेच येथील कोकणी माणूस आपल्या वेगवेगळ्या गुणांनी संपन्न. डहाणूपासून वेंगुर्ल्यापर्यंत पसरलेली कोकणपट्टी ही परमेश्वराने जन्माला घातलेली अद्भूत भूमी आहे. कोणाचाही मुलाहिजा न ठेवणे, कोणालाही फार उंचीवर न चढविणे, तरीही कोणाच्याही ख-याखु-या गुणवत्तेची मनापासून कदर करणे, ही इथली खासीयत.
या सर्वांवर प्रकाश टाकलाय “माझा गाव माझा मुलुख” या मधु मंगेश कर्णिक यांच्या पुस्तकातून. मॅजेस्टिक प्रकाशनाच्या या पुस्तकाचे मुखपृष्ठ सतिश भवसार यांनी निसर्गचित्राने छान सजविले आहे तर मलपृष्ठावर पुस्तक लेखनामागील लेखकाचा दृष्टीकोन सांगितला आहे. कोकणचे, विशेषत: सिंधुदुर्गातील विविध गावांचे कला, संस्कृती व नैसर्गिक वर्णन तसेच या मुलुखातील परंपरांवर प्रकाशझोत टाकला आहे.
प्रस्तावनेच्या सुरुवातीलाच लेखक बॅ. नाथ पै यांच्या स्मृतीस अभिवादन करतात. गावाच्या बदलत्या वास्तवाबद्दल विविध प्रसंगांचा उल्लेख करुन प्रस्तावनेतच लेखक संपूर्ण कोकणभूमीच्या वैशिष्ट्यांवर प्रकाशझोत टाकतात.
पुस्तकाचे दोन भाग केलेले असून ‘माझा गाव’ या भागात सिधुदुर्गातील 22 गावांचे प्रवासवर्णन आहे. तर ‘माझा मुलुख’ या दुस-या भागात मालवणी मुलुखाची लोकसंस्कृती सतरा प्रकरणांमध्ये मांडली आहे. एकूण 292 पृष्ठांचे हे पुस्तक म्हणजे साहित्याची एक मेजवाणीच म्हणायला हरकत नाही, असे मला वाटते.
काळाच्या ओघात कोकण भूमी व कोकणी माणूस बदलला. हा मुलुख आता पूर्वीसारखा दरिद्री राहिलेला नाही. रोजगार संधी निर्माण झाल्या आहेत. अनेक क्षेत्रात बदल घडला आहे. मात्र कोकणची प्राचीन संस्कृती तशी आमूलाग्र बदलणारी नाही. नव्यातील सारे पचवून ‘जुने ठेवणे’ ही इथल्या माणसाची खासीयत. जुन्या ट्रंकेच्या तळाशी जपून ठेवणारा हा जगावेगळा मुलुख आहे.
पहिल्या भाग़ात सिंधुदुर्गातील प्रत्येक गावाचे वर्णन वाचताना आपण त्या गावच्या रस्त्याने प्रत्यक्ष फिरतोय, नदी-ओहोळ भटकतोय, नारळी फोफळीच्या, आंब्या-फणसांच्या झाडांचे दर्शन घेतोय, बकुळ- प्राजक्त फुलांचा सुवास अनुभवतोय असाच जणू भास होतो. लेखकाच्या लेखणीतला जीवंतपणा वाचकांच्या नजरेत भरतो. जे गाव आपण पाहिलेत, ते डोळ्यासमोर उभे राहतात. तर जे पहायचे राहिलेत, ते पाहण्याची इच्छा निर्माण होते.
प्रत्येक गावाच्या निसर्गाचे वेगळेपण वर्णन करताना लेखकाच्या साहित्यप्रतिभेची कल्पना येते. आपल्या जन्मगाव ‘करुळ’ बद्दल वर्णन करताना लेखक लिहितात, “या चिमुकल्या गावाने मला भरभरुन दिले. ऋतुचक्राचे सारे फेरे मी या माझ्या गावात बालपणापासून नजरेत साठवले. मान्सुनचे वारे झाडांना कसे मुळांपासून हलवतात आणि आषाढातला पाऊस कौलारांवर कसा ताशा वाजवतो, ते मी इथे अनुभवले.”
लेखक पुढे वर्णन करतात – ‘करुळ गावच्या माळावर उभे राहिले की ‘नाथ पै वनराईच्या क्षेत्रावरुन जरा पुर्वेकडे नजर टाकावी, सह्याद्रीचे निळे रुप असे काही दृष्टीत भरते की, तिथून डोळे बाजूला करु नये. चित्रात मांडून ठेवावा, तसा अवघा सह्याद्री इथून दिसतो.’
कोकणात अनेक देवस्थाने आहेत, त्यातील आचरे संस्थानचा श्री देव रामेश्वर, कुणकेश्वर, वेतोबा, सातेरी, भराडी अशा अनेकांची महती या पुस्तकात वर्णन केली आहे.
कोकणी माणसाच्या स्वभावावर पूर्ण प्रकाशझोत टाकला आहे. मालवणी मुलुखातल्या माणसाजवळ हापूसचा स्वादिष्ट गोडवा आहे, कर्लीचा काटेरीपणा आहे, तिरफळीचा मिरमिरीत झोंबरेपणाही आहे. शिवाय फुरशातला विखारही आमच्या वागण्या बोलण्याट आढळतो. याशिवाय अडसराचा कोवळेपणा, गोडपणा, फणसाचा रसाळपणा, कातळाचा खडबडीतपणा आणि आबोली – सुरंगीचा रसिकपणाही आहे. असे कितीतरी गुणदोष लेखकाने पुस्तकात मांडले आहेत.
या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गावचे वर्णन करताना वेगवेगळे राजकिय, सांस्कृतिक, ऐतिहासिक दाखले लेखक देतात. प्राचीन परंपरांवर अभ्यासपूर्ण विवेचन लेखकाने केले आहे. गावांच्या नावांची फोड करुन सांगितली आहे.
पुस्तकाच्या दुस-या भागात मालवणी मुलुख, येथील गावरहाटी व तिचे महत्त्व, मालवणी माणसांचे चित्रण, ऋतुचक्र व पारंपारिक उत्सव आणि ते कसे साजरे होतात याची सुंदर माहिती दिली आहे. मुंबईतील चाकरमानी व घरची ओढ या गोष्टींचे मनोहारी वर्णन केले आहे.
एकंदरीत हे पुस्तक वाचून एकदा तरी संपूर्ण कोकण भ्रमंती करावी असे मला वाटते. आपणही हे पुस्तक जरुर वाचा. कोकणचा बाहेरुन काटेरी पण आतून रसाळ माणूस नक्कीच आवडेल !
© श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर
सदस्य, अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈