सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ होलिकोत्सव विशेष – होलीकोत्सव…दोलोत्सव…. ☆ प्रस्तुति – सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
वाचताना वेचलेले:
अरुणा ढेरे यांच्या ‘अर्ध्या वाटेवर’ या विविध ललित लेखांच्या संग्रहातील जीवन – मृत्यूचा दोलोत्सव —
वसंत यायचा आहे आणि शिशिर सरलेला आहे. काळाच्या लयबद्ध गतीतून अगदी स्पष्ट जाणवतो आहे हा सांधा!जणू एक पाऊल उचलले आहे, दुसरं टेकायचं आहे- यांच्यामधला एक अधांतरी तरी क्षण!
अरुणा ढेरे यांनी या होळीच्या सणाची सांगड मातीशी जोडली आहे. हा काळ गर्भाधानाचा! एका वर्षातून दुसऱ्या वर्षाचा जन्म!
आपल्यातून नव्हे तर आपली नाळ जिच्याशी जोडली आहे त्या त्या मातीतून बीज रुजते. शिशिराच्या विनाशातून पुन्हा वसंतात फुलून उठणार आहे ही माती! गर्भिणी होणार आहे! सृष्टीची वासनाच जणू पेटलेली! तिचा प्रतीक सरळ उभ्या सोटासारखं झाड आणि वर धान्याची पुरचुंडी, आणि आंब्याचे तोरण!होळीच्या सणाचा संबंध सुफलनाशी आहे! विधीपूर्वक होळी पेटवून तिची पूजा करणे म्हणजे सृष्टीतल्या कामाग्नीचीच पूजा करणे होय. कारण या अग्नीतून सृष्टीची नवनिर्मिती आहे. होळीतील स्त्री-पुरुषांचा एकत्र वावर थोडा सैलावलेला असतो. कोळीणी डोक्यावरच्या मडक्या मध्ये दिवा पेटवून मिरवणुकीने होळी कडे जातात आणि त्या मडक्यांचा आहेर होळीला देतात माहेरवाशीण म्हणून! जणू ते आत दिवा असलेलं मडकं म्हणजे आपलंच गर्भाशय! होळी फाल्गुनात येते. सूर्य पौरुषाचे प्रतीक! हा काळ सृष्टीच्या बीजधारणेचा काळ! हा बीज धारणे चा उत्सव म्हणजे होळीचा उत्सव असतो!
सृष्टीची ही मिलनोत्सुक काम मोहित अवस्था संस्कृतीच्या विकासात आपोआप स्वीकारली गेली. पुढे स्त्रियांच्या वर्चस्वातून पुरुषांच्या वर्चस्वाकडे संस्कृतीचा प्रवास झाला आणि प्रतीकात्मक विधि उरले!
एकीकडे होळीत मिसळत गेला राधा कृष्णाच्या प्रीतीचा एक रंग! कृष्ण विष्णु रूप आहे आणि विष्णू हाच स्वयम् काम आहे! म्हणून प्रणयाचा खेळ कृष्ण खेळतो. तो आमचा लोकसखा आहे. नाना रूपांनी तो प्रकट होतो. सगळे प्रापंचिक सुखदुःख विसरून प्रेमाच्या एका विराट रंगपंचमीत कृष्णानं सर्वांना भिजवून टाकलं! राधेला भिजवलं पण मनोमन राधा होणाऱ्या प्रत्येकाला भिजवलं! व्यक्तिगत आणि सामूहिक प्रेमाचा एक अद्भुत रंग कृष्ण सहजतेने खेळला! बालपणीच दुष्ट पूतना राक्षसीचा त्याने प्राण घेतला, त्या प्रसंगाची आठवण म्हणजेच होळी! अभद्रावर भद्रा ने केलेली मात म्हणजे होळी!
होळी हा अमंगलाच्या मरणाचा उत्सव आहे. जीवनाच्या जयाचा उत्सव आहे. बंगाल मध्ये झोपाळ्यावर झुलतो कृष्ण आणि होळीचा ‘दोलोत्सव’ होतो हे जीवनाचं आंदोलणं आहे. उत्तर भारतातील रंगाची होळी राधा कृष्णाच्या प्रेम रंगाची आठवण म्हणून खेळली जाते.
जन्म आणि मृत्यूच्या मध्ये जीवनाने घेतलेला एक सुंदर झोका म्हणजे होळी! शिशिर आणि वसंताच्या मध्ये काळाने घेतलेला झोका म्हणजे होळी! वासना आणि प्रीती यांच्यामध्ये संस्कृतीने घेतलेला झोका म्हणजे होळी!
अरुणा ढेरे यांनी होलिकोत्सवाच्या संदर्भात लिहिलेले ‘होळी’ सणाचे रूप मनोमन पटले! म्हणून त्यांच्या लेखाचा हा संक्षिप्त शब्दरूप भाग!
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈