सौ. गौरी सुभाष गाडेकर
☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ बालकथा भाषाभगिनींच्या – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆
पुस्तकाचे नाव : बालकथा भाषाभगिनींच्या
अनुवादिका : श्रीमती उज्ज्वला केळकर
प्रकाशक : श्री सुभाष शंकर विभुते /मासिक ऋग्वेद चिल्ड्रेन रिलीफ फंड, आजरा
पुस्तक परिचय – बालकथा भाषाभगिनींच्या
नुकतंच ‘बालकथा भाषाभगिनींच्या’ या सौ. उज्ज्वला केळकर यांनी अनुवादित केलेल्या कथासंग्रहाचं प्रकाशन झालं. हे पुस्तक मासिक ऋग्वेद चिल्ड्रेन रिलीफ फंड, आजरा या प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं आहे.
वेगवेगळ्या राज्यांतील, वेगवेगळ्या भाषांमधील बालकथा संकलित करून त्यांचा मराठी अनुवाद उज्ज्वलाताईंनी केला आहे. विविध राज्यांतील पर्यावरण भिन्न असलं, तसंच वेगवेगळ्या आर्थिक स्थरांतील लोकांच्या गरजा भिन्न असल्या तरी या सर्वांच्या मुळाशी असणारी मूल्यसंस्कृती एकच असते, या विविधतेतील एकतेशी मुलांचा परिचय करून द्यायचं मोलाचं काम हा कथासंग्रह करतो.
यात एकंदर नऊ कथा आहेत. ‘खरी खुशी ‘मधून भूतदयेचे,इतरांच्याही आनंदाचा विचार करण्याचे धडे मिळतील . ‘चांगली अद्दल घडली’मधून पंचतंत्रासारखं व्यावहारिक शहाणपण मिळेल . ‘छोटा मास्तर’ ही कथा आर्थिक भेदभाव नष्ट करून इतरांच्या खऱ्या गरजा ओळखायला शिकवेल. ‘आजीचं गणित’ नीतिमत्तेच्या मौल्यवान धड्यांबरोबर मुलांना तोंडी गणिताचं महत्त्व समजावेल . ‘एलियन्सशी भेट ‘ पर्यावरणाविषयी, एलियन्सविषयी खूप माहिती देऊन विज्ञानात रस निर्माण करेल .
लोकटक सरोवरातील एका फुमडीवर राहणारी ‘इबेथोई’ जंगल बूकच्या मोगलीशी साधर्म्य साधते. त्यातील तिची प्राण्यांविषयीची, विशेषतः माशांविषयीची आत्मीयता मुलांना खूप काही शिकवून जाईल .
‘बिपाथुचं गोष्टीचं पुस्तक ‘ तर खूपच सुंदर आहे. त्यातल्या त्या पाढ्यांच्या परीमुळे आजची मुलंही पाढे पाठ करू लागतील.बिपाथुला असणारी आपल्या आर्थिक परिस्थितीची जाणीव, अंध आजीबद्दल वाटणारी सहवेदना, तिची वाचनाची आवड या गोष्टींचा बालवाचकांवर परिणाम होईलच. शिवाय समोर दिसणाऱ्या गोष्टींचं बिपाथुने केलेलं तपशीलवार वर्णन वाचून मुलांनाही पर्यावरणाचं निरीक्षण करण्याची खास नजर मिळेल.
‘कर्जाची परतफेड ‘मधील पैशांऐवजी सेवा या कल्पनेमुळे मुलांच्या मनातील ‘पैशा’च्या धारणेतही बदल होईल.
‘एक गोड अशी लाच ‘ ही कथा चुकीची कबुली देणं व त्या टाळण्याचा प्रयत्न करणं, हे नवसापेक्षा श्रेष्ठ आहे, हे मुलांच्या मनावर बिंबवेल.
श्रीमती उज्ज्वला केळकर
भाषिक प्रांतरचनेनंतर भाषिक अस्मिता वाढून राष्ट्रीय एकात्मतेला तडे जाऊ नयेत, म्हणून साने गुरुजींनी ‘आंतरभारती’चं स्वप्न पाहिलं. या कल्पनेतील महत्त्वाचा धागा म्हणजे प्रत्येक प्रांताचं साहित्य. जीवनाची संकुचित दृष्टी नाहीशी होऊन, व्यापक दृष्टीने जीवनाचा अर्थ समजावून घेण्याची क्षमता निर्माण होणे, हे, साने गुरुजींच्या मते शिक्षणाचं उद्दिष्ट असतं. या पुस्तकाने ते उद्दिष्ट नक्कीच साधलं आहे.
पुस्तकाचं मुखपृष्ठ आकर्षक व अर्थपूर्ण आहे. वरच्या भागात मुलांना आवडणाऱ्या प्रतिमांचं कोलाज आहे, तर खाली विविध राज्यातील स्त्रीपुरुषांचं त्यांच्या-त्यांच्या वेषातील चित्र म्हणजेच भाषाभगिनींचं प्रतिकात्मक रूप आहे.
पुस्तकाचा कागद व छपाई उत्तम आहे.
एवढं असूनही,जास्तीत जास्त बालवाचकांपर्यंत हे पुस्तक पोचावं, म्हणून याची किंमत अतिशय कमी, अगदी नाममात्र म्हणजे स्थानिकांसाठी ₹10/- व परगावासाठी ₹15/- ठेवली आहे.
शाळेच्या अभ्यासक्रमात पुरवणी वाचनासाठी हे पुस्तक लावावं. तेवढी या पुस्तकाची नक्कीच योग्यता आहे.
अशाच आणखी कथा उज्ज्वलाताईंनी अनुवादित केल्या आहेत. त्यांचीही पुस्तकं श्री. सुभाष शंकर विभुते /मासिक ऋग्वेद चिल्ड्रेन रिलीफ फंड, आजरा यांनी प्रकाशित करावीत व अशीच अत्यल्प दरात बालवाचकांना उपलब्ध करून द्यावीत, अशी अपेक्षा आहे.
© सौ. गौरी सुभाष गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈