सौ. अमृता देशपांडे

 ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ वाकळ – लेखिका मीनाक्षी सरदेसाई ☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

 

लेखिका मीनाक्षी सरदेसाई यांच्या अनेक कथा, ललित लेख दिवाळी अंकातून प्रसिद्ध झाले आहे. त्यातीलच निवडक 26 लेखांचा संग्रह म्हणजे ‘ वाकळ ‘.

वाकळ म्हणजे गोधडी, आजच्या काळात quilt. पूर्वी स्त्रिया दुपारचा वेळ सत्कारणी लावणे, जुनी लुगडी, धोतरे, यांचा वापर करून उबदार पांघरूणे हातानी शिवणे,  अंथरूण पांघरुण घरीच बनवून संसाराची एक गरज पुरी करण्यासाठी हातभार लावणे, असा साधा सरळ मानस. तो पूर्णं करायच्या प्रयत्नातून गोधडीचा जन्म झाला..त्यात वापरलेले तुकडे हे वापरणा-याच्या प्रेमाची,  आणि वात्सल्याची प्रचिती देतात,  असा प्रेमळ समज.

लहान मोठे,  रंगबिरंगी तुकडे जोडून त्याला चारी बाजूंनी नेटकीशी किनार लावून शिवलेली वाकळ घरच्यांना प्रेमाची,  आपलेपणाची ऊब आणि भावनिक सुरक्षिततेची हमी देत असे.

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

लेखिकेने अनेक अनुभवांच्या, अनेक व्यक्तींच्या व अनेक आठवणींचे लिखाण एकत्र करून ही  संग्रहाची ‘वाकळ’  निर्मिली आहे.

संग्रहातील प्रत्येक रचनेला  स्वतःचे वेगळेपण आहे. चपखल अशा वैविध्यपूर्ण शब्दांतून प्रसंग डोळ्यासमोर हुबेहूब उभे रहातात.

सुरवातीच्या, म्हणजे वाकळीचा पहिला तुकडा “केशरचनेची गुंतावळ” . ऋषी मुनि,  देव-दानव, यांच्या केशरचनेपासून,  अत्याधुनिक शाॅर्ट कट असे दहा विविध प्रकार सामावले आहेत. शेवटी स्त्री सुलभ स्वभावानुसार त्या केसांचं कौतुकही करावं, अशी लाडिक मागणीही केली आहे. ‘ गुंतावळ’ म्हणण्यापेक्षा “कुंतलावली” असं नाजुक नाव द्यावं,  इतकं छान लेखन.

“लाडक्याबाई,” “अनाथांची आई”, ” गृहिणी”, “गुरुविण”, यातील व्यक्तिरेखा इतक्या सुंदर रेखाटल्या आहेत की त्या ओळखीच्या नसल्या तरी जवळच्याच वाटू लागतात. त्यांच्याच सारख्या आपल्या परिचित व्यक्ती मनात रुंजी घालू लागतात.

“सुवर्णमध्य”, “कागदी घोडे”, “विहिणी विहिणी”, “मूल्यशिक्षणाचे धडे”, तसेच  “डाॅक्टर तुम्ही सुद्धा”, “कामवाली सखी”,  “ओम् नमो जी आद्द्या”, “आलंय ते घ्यायला हवं”, या लेखनामधून सामाजिक परिस्थिती, घराघरातून थोडेसे अवघड झालेले प्रश्न, शिक्षण संस्था, वैद्यकीय व्यवसाय,  नातेसंबंधातली गुंतागुंत  आणि त्यातून समाजमनावर, कुटुंब व्यवस्थेवर होणारे परिणाम यावर लेखिकेने प्रकाश टाकला आहे. व त्यावरचे उपायही समजावले आहेत.

“घडलंय बिघडलंय” हा छान खुमासदार लेख. वाचताना मनात खुदुखुदु हसू येतं. आपले पण असे घडलेले प्रसंग आठवतात. स्वयंपाक हे शास्त्र आहे. प्रयोग करता करता येणा-या अनुभवातून लागलेले शोध व त्यासाठी वापरलेल्या क्लृप्त्या यांचं शब्दांकन तंतोतंत पटतं.

माणसांव्यतिरिक्त असणारा प्राण्यांचा सहवास इतका जवळचा असतो कि त्यांना  आपण सोयराच मानतो.  “वाघाची मावशी”, आणि ” वानर”  त्यानाही समाविष्ट केले आहे.

“आईबाबा”, “बहिणी बहिणी”, “अनुभव”, “जामातो दशमग्रहृ”, या लेखांमधून अनुभव,  आप्तसंबंधातील प्रेम, तसेच न रूचणा-या गोष्टी तून स्वभावाचे अनेक कंगोरे उलगडतात.

” सख्खे शेजारी “, आणि

” मायबोली ची लेणी ” हे या वाकळीचे सर्वात जुने तुकडे.  त्यांचा पोत, त्यांचा गाभा किंवा गर्भितार्थ आजच्या काळात ही लागू पडतो.

” येस बाॅस” हा एकदम नवीन तुकडा.

अशी ही ” वाकळ ” अनुभवांच्या तुकड्यांची.  पूर्वीच्या स्त्रियांच्या जीवनातील अव्यक्त जाणीवांवर प्रकाश टाकणारी, कष्ट,  दुःख,  सल, अपमान यांत भिजलेले तुकडे सांभाळणारी,  पतीचे प्रेम,  वडीलधा-यांचे वात्सल्य,  एकमेकींसह, जुळवलेल्या तुकड्यांबरोबर  जुळलेली मने, या सर्वांचा अनोखा पट उलगडणारी  ” वाकळ”.

स्थलकालाच्या सीमारेषा पार करणारी,  स्त्रीचे अंतरंग जपणारी, आधुनिक स्त्री च्या स्वावलंबनाचा व आर्थिक सक्षमतेचा मानदंड असणारी ही गोधडी म्हणजेच ” वाकळ “.

” वाकळ ” वाचता वाचता आपण ती कधी अंगावर घेतो, आणि  वाचन संपता संपता त्या उबदार दुलईत कधी शिरतो, कळतंच नाही.

 

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सुहास रघुनाथ पंडित सांगली

वाकळ:
या पुस्तकाचा सौ.अमृता देशपांडे यांनी करून दिलेल्या परिचय आवडला.शब्दमर्यादा लक्षात घेता, त्यांनी या लेखात पुस्तकातील सर्व लेखांचा उल्लेख केला आहे हे विशेष.
मी हे पुस्तक वाचलेले आहे.त्यांनी म्हटल्याप्रमाणे
‘वाकळ’ खरोखरच उबदार आहे. प्रत्येकाने एकदा तरी अनुभव घ्यावाच असे सांगावेसे वाटते.