सौ. वीणा आशुतोष रारावीकर

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “नात्यांचे सर्व्हिसिंग” – श्री विश्वास जयदेव ठाकूर ☆ परिचय  – सौ. वीणा आशुतोष रारावीकर ☆ 

 

पुस्तक – नात्यांचे सर्व्हिसिंग

लेखक –  श्री विश्वास जयदेव ठाकूर

पुस्तकाचे नाव : ‘नात्यांचे सर्व्हिसिंग’

लेखक : श्री विश्वास जयदेव ठाकूर

प्रकाशक : शब्दमल्हार प्रकाशन

किंमत : ९९ रुपये

पुस्तकाची पाने : १३९

‘कामा पुरता मामा’ ही म्हण आपल्या सर्वांनाच माहित आहे. आपण जसं जसे मोठे होत जातो, तेव्हा अशाप्रकारचे कडू अनुभव कधी कधी घेत असतो. ऐन अडचणीच्या वेळी एखादा जवळचा नातेवाईक किंवा  मित्र आपल्याकडून पैसे उसने घेऊन जातो आणि नंतर सहजपणे आपल्याला विसरून जातो. अशावेळी आपले पैसे गेल्यापेक्षा आपण फसवलो गेलो याचे दुःख आपल्याला जास्त होते. समाजाप्रती भान ठेवून चांगल काम करणारी जशी निस्वर्थी माणसं असतात, तशीच कधी कधी कळत-नकळतपणे आपल्याच लोकांना त्रास देणारी माणसं असतात. तो कधी द्रव्यरूपाने असेल, तर कधी भावनिक.

लेखक विश्वास जयदेव ठाकूर यांना त्यांच्या व्यवसायामुळे अशा सर्व प्रकारची असंख्य माणसे भेटली. पण ‘शक्य असेल तितकी नाती जपली पाहिजेत, आपल्याकडून ती टिकवली गेली पाहिजेत’ हे लेखकाचे  तत्व. नाते कोणतेही असो, “नात्यात सर्व्हिसिंग करून घेणे गरजेचे असते” हे लेखकाने आपल्या ‘नात्यांचे सर्व्हिसिंग’ या पहिल्याच पुस्तकात सांगितले आहे.

पंचवीस वेगवेगळी लोकं. त्यांचे पंचवीस प्रश्न. केंद्रबिंदू विश्वास ठाकूर. या लोकांचे प्रश्न सोडवतानां आलेल्या प्रसंगातून मांडलेल्या या पंचवीस लघुकथा. नात्यांमध्ये कर्ज न येतां, त्यांच्या मधील भावनांचे व्याज कसे वाढविता येईल, यावर लेखकाने भर दिला आहे. भेटलेल्या व्यक्तिंच्या अनुभवातून सिध्द झालेले हे पुस्तक.

कोणताही व्यवहार हा पारदर्शक असला पाहिजे. हे सांगणारी दोन भावामधील कथा. तर फ्लॅटचा मोह न आवरल्याने मैत्रीणीची फसवणूक करायला जाणारी कथा. राग नेहमीच आपली उर्जा कमी करत असतो. निदान ‘एकाचा राग दुसऱ्यावर काढू नये’ एवढी किमान अपेक्षा आपण पाळली पाहिजे. हे ‘चित्रपटाचा फ्लॅशबॅक’ या कथेतून पटवून दिले आहे. ‘गरज सरो वैद्य मरो’ हे सांगणारी प्रकशची कथा. शेवटच्या प्रकरणात मात्र स्वतःकडून राहून गेलेल्या नात्याच्या सर्व्हिसिंग बद्दल लेखक प्रांजळपणे कबूली देतात.

माणसांचे असे अतर्क्य, अगम्य, अनाकलनीय वागणे या सर्व कथा प्रसंगातून प्रकट होतात. वेळोवेळी नात्यांना उजाळा दिला नाही की मग आपल्याला प्रश्न पडतो की ‘हा माणूस असा का वागला?’. हे जर टाळायचे असेल तर माणसांनी संवाद, मैत्री, आदर, कृतज्ञता, सह्रदयता यांचे वंगण वेळोवेळी नात्यांमधे घातले पाहिजे. थोडक्यात ‘नात्यांचे सर्व्हिसिंग’ करत राहिले पाहिजे. म्हणजे नात्यांमधील व्यावहारिक हिशोब आपोआप कमी होऊन, नात्यांचे भावनिक बंध चालू राहतील. आयुष्याचा हिशोब मांडताना, जमा आणि खर्च याचा  ताळेबंद जुळवायचा असेल, तर नात्यात हिशोब न आणता, फक्त आणि फक्त प्रेमाचा विचार केला पाहिजे, हा मुद्दा लेखकाने मांडला आहे.

मधु मंगेश कर्णिक आणि वसंत डहाके अशा दोन थोर साहित्यिकांची प्रस्तावना लाभलेले हे पुस्तक. मधु मंगेश कर्णिक प्रस्तावनेमध्ये लिहितात, “हे पुस्तक तुम्हाला सहजपणे सहवासी घडवते” तर वसंत डहाके सांगतात, “माणसांकडे पाहताना आपली दृष्टी कशी असावी याची सूचना हे पुस्तक करते”. या दोन्हींचा प्रत्यय पुस्तक वाचताना येतो.

फक्त एकेशे ऐकोणचाळीस पानांचे हे पुस्तक एका बैठकीत सहज वाचून होते आणि नकळतपणे आपणही विचार करू लागतो, आपल्याकडून कोणाचे असे नात्यांचे सर्व्हिसिंग करायचे राहून गेले आहे का?

लेखकाचे हे पहिलेच पुस्तक असले तरी ‘शुभास्ते पंथानः’ या प्रस्तावनेत सांगितल्याप्रमाणे वाचक देखील विश्वास ठाकूर यांच्याकडून पुढील कथा संग्रहाची वाट बघतील, याची मला नक्की खात्री आहे.

©️ सौ. वीणा आशुतोष रारावीकर

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
3.5 4 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments