सुश्री अरूणा मुल्हेरकर

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “लव्हाळी” – सौ राधिका भांडारकर ☆ परिचय – सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

 पुस्तक ~  लव्हाळी

लेखिका ~ राधिका भांडारकर

प्रकाशिका ~ डाॅ.स्नेहसुधा अ. कुलकर्णी,  निहार प्रकाशन, पुणे 

मुखपृष्ठ ~ उषा ढगे

मुल्य ₹.२००/—

~~~~~~

आपल्या ई अभिव्यक्ति आॅन लाईन अंकाच्या लेखिका/कवियत्री सौ. राधिका भांडारकर यांचा “ लव्हाळी “ हा स्फुटलेखसंग्रह नुकताच प्रकाशित झाला याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे मनःपुर्वक अभिनंदन करते. हे त्यांचे चार कथासंग्रहानंतरचे पांचवे पुस्तक ! त्यांच्या आतापर्यंतच्या जीवनाशी निगडित विविध विषयांवर वेळोवेळी लिहिलेल्या एकावन लेखांचा हा संग्रह आहे. 

वंशाचा दिवा हा पहिलाच लेख!

समाजातील एक जळजळीत विषय.

काळ कितीही पुढे गेला तरी वंशाचा दिवा म्हणून मुलगा हवाच असा  हट्ट अजूनही आपल्याला दिसतो. या त्यांच्या लेखात बहीण व भाऊ या दोघात भावाला स्वतःलाच तो सर्वतोपरि बहीणीपेक्षा कमी असल्याचे जाणवते.या ठिकाणी राधिकाताई लिहितात,”दिवा काय? मी पणतीपण नाही.तिच्यातच मी पहातो खरा वंशाचा दिवा!

तीच आहे माझ्या आभाळीचा तेजोमय गोल..

मी उरलोय फक्त रीतीपुरता वंशाचा दिवा…!”

अतिशय प्रभावी शब्दात राधिकाताईंनी मुलीचे महत्व समाजाला पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. 

एकेक लेख वाचत असता वाचकाला जाणवते ती लेखिकेची संवेदनक्षमवृत्ति, कल्पकबुद्धि, विविध विषयावरील अभ्यास तसेच त्यांच्या स्वभावाचे अनेकविध पैलू. 

एक सुटी, एक निरोप या लेखात स्थित्यंतर हा निसर्गनियम आहे, तेव्हा प्रत्येकाने ते आनंदाने स्वीकारावे असा त्यांचा आग्रह आहे, वृद्धावस्था म्हणजे एकप्रकारचा निरोपसमारंभच हा त्यांचा विचार मनाला पटतोच!

राधिकाताईंच्या सकारात्मक वृत्तीची आपल्याला ओळख होते. 

लेखिका कावळ्याला पत्र लिहितात.

बर्‍याच दिवसात त्याने कठड्यावर बसून कावकाव केले नाही म्हणून त्या बेचैन होतात.कावळ्याच्या रुपात त्यांना विठोबा भेटतो,वाटीतली खीर खाल्ल्यावर त्यांना स्वतःला नाम्या झाल्यासारखे वाटते.लेखिकेची ही सह्रदयता आहे.कल्पकतातर आहेच. 

समाजातील भीषणतेचे चित्र अतिशय मनोरंजक पद्धतीने केस या लेखात चित्रित केले आहे.

त्यांनी स्वर्गातील चित्रगुप्ताचे कोर्ट वाचकांपुढे उभे करून धरणीवर होत असलेल्या अत्याचाराचा खटला मांडला आहे आणि कोव्हीड १९ आणि लाॅकडाऊन ही न्यायाधिशाने सुनावलेली शिक्षा आहे.

शेवटी त्या लिहितात,पृथ्वी हसली. पक्षी किलबिलले!मोर थुईथुई नाचले! वृक्ष गहिवरले!फुलं नवे रंग ल्यायले! सृष्टी मुक्त झाली! आभाळ मोकळे झाले! पृथ्वी जिंकली!”

हे वाचून आपलेही उद्विग्न मन आनंदून जाते. 

या लेखसंग्रहात “चुकली दिशा तरीही” ह्या विंदांच्या कवितेचे आणि संजीवनी बोकील यांच्या “निःसंग” या दोन कवितांचे रसग्रहण केले आहे.

राधिकाताई वाचनात रंगून जातात.

वाचता वाचता लेखक/कवीला त्यांच्या लिखाणांतून नेमके काय सांगायचे आहे याचा विचार त्यांच्या मनात चालू असतो आणि त्यामुळेच विंदांची कविता वैचारिक प्रतिभेची बैठक असलेली,पुरोगामी विचाराची आणि सच्चेपणाने लिहिलेली अशी दाद त्या देऊ शकतात. 

निःसंग या कवितेत कवियत्रीला नेमके काय सांगायचे आहे हे राधिकाताई त्यांच्या शब्दांत सांगतात. “ना जमिनीची भीति ना आकाशाचा मोह!निःसंग जगण्याची शिकवण अशी निसर्गातूनच मिळते.जगणं महत्वाचं!जगण्यातली स्वीकृती महत्वाची…”

त्यांची अभ्यासू वृत्ती आपल्याला दिसून येते. 

ऊंच माझा झोका या लेखात राधिकाताईंना तळागाळातील स्त्रियांसाठी काहीतरी करण्याची तळमळ,सैनिका तुझ्याचसाठी ह्या लेखांतून त्यांची दिसून येणारी देशभक्ति, गुरूंप्रति त्यांचा आदर!गुरु हे केवळ मोठेच नसून लहानांकडूनहि कित्येक गोष्टी आपण शिकत असतो,तेव्हा त्या बाबतीत लहांनानाही आपण गुरू मानले पाहीजे यातून दिसून येणारे त्यांचे उदात्त विचार. 

त्यांनी बालपणीच्या गाभुळलेल्या आठवणीसांगितल्या आहेत.त्यांच्या शालेय/काॅलेज जीवनाविषयीही लिहिले आहे आणि वयाची साठी गाठल्यानंतरही त्यांचे अनुभव लिहिले आहेत.

यावरून त्यांची बंडखोर,कलंदर पण मिस्कील वृत्ती, स्वतःची ठाम मते, असे त्यांच्या स्वभावाचे प्रतिबिंब  वाचकांना त्यांच्या लेखांत दिसते. 

सर्व एकावन लेखांविषयी लिहिणे शक्य नाही,पण इतकेच सांगावेसे वाटते की संपन्न लेखणीतून उतरलेले  हे लेख वाचकांनी अवश्य वाचावेत. 

पुस्तकाचे लव्हाळी हे शिर्षकही अगदी सार्थ आहे. “वृक्षवल्ली जाती तेथे लव्हाळी वाचती.” उभ्या आयुष्यात नाना बर्‍या वाईट प्रसंगांना आपण सामोरे जाऊन पुढे पुढे जात असतो,त्याचवेळी काही क्षण हे मात्र मनःपटलावर कायमचे कोरले जातात. हे लव्हाळी म्हणजे असेच लेखिकेच्या आयुष्यात कायम स्वरूपी उमटलेले क्षण आहेत. 

शिर्षकाला समर्पक असेच मुखपृष्ठ उषा ढगे यांनी तयार केले आहे.त्यांचेही मी अभिनंदन करते. 

राधिकाताईंच्या या पुस्तकाला भरघोस यश मिळावे अशा मी शुभेच्छा देते. 

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_printPrint
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments