सुश्री तृप्ती कुलकर्णी
पुस्तकांवर बोलू काही
☆ विश्वस्त…वसंत वसंत लिमये ☆ परिक्षण – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆
लेखक – वसंत वसंत लिमये
प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे
किंमत : रु. ५५०/-
इतिहास म्हणजे मनुष्याला कधीही टाळता न येणारा आणि बदलताही न येणारा असा काळाचा एक अवशेष होय. हा अवशेष वर्तमान आणि भविष्याशी कुठंतरी अदृश्यपणे बांधलेला असतो. त्यामुळे तो कधी अभिमानाचा विषय समजला जातो तर कधी अवमानाचाही. याचाच प्रत्यय ‘विश्वस्त’ ही वसंत वसंत लिमये यांची कादंबरी वाचल्यावर प्रकर्षानं येतो.
लेखक वसंत वसंत लिमये हे मूलतः आयआयटी इंजिनियर आणि उत्तम गिर्यारोहक आहेत. अनेक अवघड, अनवट अशा डोंगरदऱ्यांवर, गड-किल्ल्यांवर भ्रमंती करणं हा त्यांचा छंद आहे. या छंदातूनच त्यांची इतिहासाशीही घट्ट नाळ जोडली गेली असल्याचं या कादंबरीतून प्रतीत होतं.
ही कादंबरी म्हणजे इतिहासातील काही अज्ञात घटना आणि वर्तमानातील वास्तव घटना तसंच सत्य आणि कल्पना यांचा मेळ साधणारी एक रहस्यमय, गुंतागुंतीची रचना आहे. या कादंबरीत उत्पत्ती-स्थिती-लय या चक्रात फिरत असलेली ही ज्ञात-अज्ञात सृष्टी अजूनही ‘संभवामि युगे युगे’ म्हणणाऱ्या विश्वस्ताच्या प्रतिक्षेत असल्याचं दर्शविलं आहे. यातील विश्वस्ताची भूमिका म्हणजे सत्पात्री आणि निर्मोही अशा वारसदाराला बिकट परिस्थतीत आधार देणारा, मार्गदर्शक अशी आहे. यात महाभारताच्या शेवटच्या काळात श्रीकृष्णानं विश्वस्ताची भूमिका बजावली तर उद्धवनं सत्पात्र आणि निर्मोही वारसदाराची. परंतु हीच भूमिका पुढील युगात साकारण्यासाठी विस्मृतीत गेलेल्या या आगळ्यावेगळ्या परंपरेचं जतन करताना, काळाच्या तडाख्यात सापडलेल्या विश्वस्ताची आणि वारसांची खडतर पण आश्वासक वाटचाल हा या कथानकाचा गाभा आहे.
या कादंबरीची अनेक वैशिष्ट्यं आहेत. मुख्यतः कादंबरीचा विषय आणि पट यांची नाविन्यपूर्ण मांडणी आहे. ऐतिहासिक रहस्यांचा मागोवा घेणारा जेएफके नावाच्या पुण्यातल्या कलंदर ग्रुपला गडावरच्या एका भटकंतीत एक ऐतिहासिक ताम्रपट मिळतो. त्या ताम्रपटावरच्या संदेशातून इतिहास जाणून घेण्याच्या दृष्टीनं शोध चालू होतो. हाच शोध पुढे एका गुप्त खजिन्याच्या अनामिक वळणार येतो. आणि मग सुरु होतो एक थरार… अनेक चढ-उतार असलेलं हे वळण राजकीय, सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय घटनांतून विस्तारत जातं. यात जेएफके टीमच्या काही सदस्यांना प्राणही गमवावे लागतात.
इतिहासाच्या प्रेमापोटी कुठल्याही प्रकारची अभिलाषा मनात न बाळगता या गुप्तधनाचा शोध करताना जेएफके टीमला दोन संघटनांच्या प्रचंड विरोधाला तोंड द्यावं लागतं. फॉक्स इन्कार्पॉरेटेड ही ऑईल एक्सप्लोरेशन करणारी बलाढ्य अमेरिकन कंपनी आणि अच्युतानंद आश्रमातला अवधूत संप्रदाय. या दोन्ही संस्थाचे वैयक्तिक स्वार्थ जेएफके टीमच्या संशोधनामुळे धोक्यात येत असतात. त्यात या टीमचा एक सदस्य मारला जातो. नेमका त्यावेळेसच वासुदेवजी या राजकीय सत्ताधाऱ्याचा वरदहस्त जेएफके टीमला मिळतो तोही या गुप्त धनाच्या इच्छ्नेच. संभ्रमात सापडलेल्या जेएफके टीमला संशोधनापेक्षाही निर्मोही आणि सत्पात्र वारसदार आजही उपलब्ध नसल्याचं जाणवतं आणि या संशोधनाचा शेवट अगदी अकल्पनीय होतो.
.कादंबरीचा पट पाहता युगांच्या या वाटचालीत विश्वस्ताची आणि वारसांचीही बदलणारी विविध रूपं आपल्याला पाहायला मिळतात. ती विविध रूपं आपल्याला महाभारतातला उत्तरकाळ, मध्ययुगीन काळ आणि सध्याचा वर्तमानकाळ अशी भ्रमंतीही घडवून आणतात. यातून काळाच्या प्रभावात बदलणारी मूल्यं आणि काळावर मात करणारी स्थिर मूल्यं यांचं ही दर्शन वाचकाला होतं.
कालानुरूप भाषाशैलीचा वापर हेही एक वैशिष्ट्य आहे. घडत असलेल्या प्रत्येक घटनेचा संबंध भूत आणि भविष्य यांच्याशी कसा नकळतपणे जोडला जाऊ शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही कादंबरी आहे. इतिहासातील सत्य आणि वर्तमानातील वास्तव यांचा मेळ साधण्यासाठी कल्पनेचा केलेला तर्कसुसंगत वापर हे सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचकाला गुंगवून ठेवणारी, विचारप्रवृत्त करणारी ही कादंबरी आहे.
विश्वस्ताची ही संकल्पना समजून घेणे हे आजच्या काळातही तितकेच उपयुक्त आहे. ही संकल्पना देश, भाषा या साऱ्यां चौकटीपलीकडची आहे. त्यामुळे या संकल्पनेची माहिती इतर भाषांतून आणि माध्यमांतून होणे हे आवश्यक आहे.
परिक्षक- सुश्री तृप्ती कुलकर्णी
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈