श्री सुहास रघुनाथ पंडित
पुस्तकावर बोलू काही
☆ ‘काळजातल्या जाणीवांची सोनोग्राफी’ – डाॅ. विजयकुमार माने ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
पुस्तकाचे नाव : काळजातल्या जाणिवांची सोनोग्राफी
कवी: : डाॅ. विजयकुमार माने
प्रकाशक : अक्षरदीप प्रकाशन
मूल्य : रू.150/.
वैद्यकीय क्षेत्रात काम करताना ,डोळ्यांना किंवा कोणत्याही उपकरणाना न दिसणा-या मनातील जाणीवांचा शोध घेऊन त्या शब्दबद्ध करणा-या डाॅ. विजयकुमार माने यांचा ‘काळजातल्या जाणीवांची सोनोग्राफी’ हा काव्यसंग्रह नुकताच वाचनात आला.भोवतालचा समाज,निसर्ग,वास्तव या सगळ्याचे भान ठेवून त्याच्या नोंदी मनात करता करता त्याना शब्दामध्ये उतरवून आपल्यासमोर ठेवताना विजयकुमार माने यांच्यातील एक डाॅक्टर आणि संवेदनशील माणूस या दोघांचेही दर्शन होते.हा त्यांचा दुसरा काव्यसंग्रह.काव्यक्षेत्रातील त्यांचे हे दुसरे पाऊल अधिक दमदारपणे पडले आहे यात शंकाच नाही.
विषयांची विविधता हे या संग्रहाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.समाज, देश, निसर्ग, प्रेम, स्त्री, अशा विविध विषयांवर कविता आहेतच पण त्याशिवाय अभंग, गझल, देशभक्ती, वैचारिक, लावणी असे विविध प्रकारही त्यांच्या काव्यातून वाचायला मिळतात. अशा या विविधांगी संग्रहाचा थोडासा परिचय.
कविता संग्रहातील पहिली कविता काळजातल्या जाणीवा व पुढे आलेल्या मूळ,बाप किंवा गुरू या कविता श्री.माने यांना गझल रचनेची वाट सापडली आहे हे दाखवून देतात.पहिल्या कवितेच्या शेवटी ते म्हणतात”माणसाला वाचण्याचा,लेखणीला वाव आहे”. म्हणूनच त्यांच्या लेखणीला कसा वाव मिळत गेला हे पाहण्याची उत्सुकता निर्माण होते आणि आपण संग्रह पुढे वाचत जातो.
आस, गुरुकृपा आणि रमाई माऊली या कविता मध्ये अभंग रचनेचा प्रयोग केला आहे व तो यशस्वी झाला आहे. पांडुरंग, गुरू, आणि रमामाता आंबेडकर या तिघांविषयी त्यांना असलेला आदर व प्रेम या काव्यातून व्यक्त होतो.
गृहिणीची कैफियत, साऊ, स्वतःशी बोल या त्यांच्या कविता स्त्री प्रश्नांना वाचा फोडणा-या आहेत.
विशेषतः ‘स्वतःशी बोल ‘ या कवितेत त्यांनी स्त्रीला तिच्या स्वतंत्र व्यक्तीमत्वाची जाणीव करून दिली आहे हे विशेष महत्त्वाचे.
अशाच त्यांच्या काही आशावादी विचार मांडणा-या कवितांचा विचार करता येईल.नैराश्य,आशा,लढा शत्रूंशी या कवितांतील आशावाद जगण्याची उमेद देणारा आहे.
त्याच वेळेला परस्पर प्रेम, नातेसंबंध, बंधुभाव यांची जपणूक करणा-या कविताही वाचायला मिळतांत. विशेषतः प्रेम, राख, ती, कधी कळणार तुला, पाऊस खेळत होता, भरलेला रिकामा वाडा, प्रेमानं जपलयं या कविता वाचनीय आहेत.
या भावनांबरोबरच कविने वैचारिक किंवा काही संदेश देणा- या रचना ही लिहील्या आहेत.दान या कवितेतून त्यानी नेत्रदान,अवयवदान,देहदान यांचे महत्त्व पटवून देऊन आपल्या व्यवसायाशी असलेली बांधिलकी दाखवून दिली आहे.आभाळमाया,माणूस व्हायचं ठरलयं,अस्तित्वाचा शोध,तुरुंग या कविता यासाठी वाचल्या पाहिजेत.’माणसं वाचता वाचता माणूस व्हायचं ठरलयं’ आणि पुढे देवमाणूस व्हायचं ठरलयं अस ते म्हणतात.त्यानी हे जे ठरवलंय ते आजच्या काळात खरोखरच लाख मोलाचं आहे.
वास्तवाची जाणीव असणं हे तर साहित्यिकाचं मुख्य लक्षण! ही जाणीव माने यांच्या कवितेतूनही दिसून येते.महापुराची त्यांनी घेतलेली नोंद,भाडोत्री आई ही सेरोगेट मदर या विषयावरील कविता,मानवी दुग्धपेढी,चिमणी,गणपती पुरातला ,सैनिक,समाज आणि एकता या सर्वच कविता आजच्या समस्या आणि वास्तव याची नोंद घेणा-या आहेत.महापुरात सांगली नगर वाचनालयवर आलेल्या संकटाने ते अस्वस्थ होतात आणि त्याच्या पुनर्उभारणीचे चित्र ही ते रंगवतात.
नोकरी, देवाची क्षमा मागून, कवायत, पानगळ, पायवाट, या त्यांच्या कवितांतून वेगळा विचार मांडलेला दिसतो, तर तिरंगा, बापू, बाबासाहेब या कविता त्यांच्या मनातील आदरभाव व्यक्त करणा-या आहेत. मी पाऊस,नदीच्या काठावर यासारख्या कवितांतून निसर्गाचे विलोभनीय दर्शन घडते. कंबर, शेकोटी, नजरेचा बाण, झाडावरचे पोळे अशा कवितांच्या निमित्ताने ते आपल्या शृंगारीक कल्पनांचे पोळे आपल्यासमोर रिकामे करतात. याच्या जोडीलाच हास्यधन, शर्विलक या कविता हसत हसत
मानवी गुणदोषांविषयी बोलून जातात.
त्यांच्या काही काव्यपंक्तिंचा येथे आवर्जून उल्लेख करावासा वाटतो.
सूर माझा कोकिळेचा, अंतराला छेडणारा
गोडबोल्या पोपटांना,आज येथे भाव आहे. किंवा
*
आज चिमण्या शोधतो आहे
उद्या झाडे शोधावी लागतील
काॅन्क्रीटच्या जंगलात घरटी
प्लॅस्टिकचीच बांधावी लागतील.
*
सापडेना राम कोठे वानप्रस्थी शोधताना
मारलेल्या श्रावणाच्या कावडीचा शाप आहे .
*
कल्पनेच्या लेखणीत, प्रपाताची शाई
काळ्या धरतीवर, लिहिते ही वनराई
शब्दांचा सुटला वारा, कविराजा तू डोल
यासारख्या अनेक ओळींचा उल्लेख करावासा वाटतो.पण शब्दमर्यादा लक्षात घेता ते शक्य होत नाही.
वेगवेगळ्या औषधांची मात्रा देऊन डाॅक्टरने पेशंटला ठणठणीत बरे करावे त्याप्रमाणे
डाॅ.विजयकुमार माने यांनी वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या पद्धतीच्या काव्यरचना करून वाचकाचे मन निरोगी व प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला आहे.त्यांनी अशा पद्धतीची सोनोग्राफी करून आम्हाला ‘ट्रीटमेंट’ देत रहावे , एवढीच अपेक्षा आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
© श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈