सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
पुस्तकावर बोलू काही
☆ गाणा-याचं पोर… राघवेंद्र भीमसेन जोशी ☆ परिचय – सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
पुस्तकाचे नाव- ‘गाणाऱ्याचे पोर’
लेखक – राघवेंद्र भीमसेन जोशी
प्रकाशक- यशोधन पाटील
प्रथम आवृत्ती- 22 नोव्हें. 2013
पंडित भीमसेन जोशी, राघवेंद्र यांचे वडील. राघवेंद्र यांच्या आईचे नाव सुनंदा, भीमसेन जोशींची पहिली पत्नी. भीमसेन जोशी यांचे लहानपणी चे वास्तव्य गदग मध्ये गेले. 1944 मध्ये भीमण्णा यांचे लग्न सुनंदा कट्टी यांच्या बरोबर झाले. त्यानंतर त्यांचे गाण्याचे दौरे चालू झाले. कुटुंबाबरोबर घराबाहेर पडून नागपूर येथे बिर्हाड केले.
औरंगाबादमध्ये त्यांची वत्सला मुधोळकर यांच्या शी गाठ पडली आणि कार्यक्रम करता करता ते त्यांच्या प्रेमात पडले. वत्सला यांचा उल्लेख राघवेंद्र यांनी ‘त्यांचा’ अशा शब्दात केला आहे. भीमसेनजींचा दुसरा विवाह ही गोष्ट च सर्वांना खटकणारी होती. पहिली पत्नी आणि मुले यांना भीमसेनजीनी पुण्यातील डेक्कन जिमखान्यावर वेगळे बिऱ्हाड करून दिले.
भीमसेन जोशीं बद्दल आदर बाळगूनही त्यांच्या स्वभावाची अनेक वैशिष्ट्ये दिसून येतात. प्रेमळ तितकेच लहरी, बेफिकिरीने राहणारे होते, त्याचबरोबर गाण्यातील तन्मयता अशा अनेक गोष्टी राघवेंद्र यांच्या लिखाणातून दिसून येतात. सवाई गंधर्व महोत्सवातील त्यांची हजेरी हा एक गौरवास्पद प्रसंग असे. त्यांच्या बादशाहीच्या बोर्डातील घरी पैसे आणण्यासाठी आई ज्यांना पाठवत असे. तेव्हाचे त्यांचे रूप राघवेंद्र यांच्या मनात ठसले होते. ‘भरदार छाती, बलदंड बाहू, असे मर्दानी रूप, कुरळे केस, देहाला एक विशिष्ट देह गंध होता, तो नुसत्या घामाचा वास नव्हता, तर त्यात तुळशी तल्या मातीच्या वासाचाही अंश आहे असं वाटे.’ अशा शब्दात त्यांनी भीमसेन यांचे वर्णन केले आहे.
त्यांच्या पैशावर त्यांच्या दुसऱ्या पत्नीचा हक्क असे. त्यामुळे त्यांचे पहिले कुटुंब व मुले यांना त्यांचा सहवास मिळून नये असा ‘त्यांचा’ प्रयत्न असे. राघवेंन्द्र म्हणतात,’ आई-भीमण्णा-त्या-… या त्रिकोणात पिंगपाॅंग चेंडूसारखी माझी त्रिशंकू अवस्था होई! एकीकडे पैशाची बरसात,तर सुनंदा च्या घरी पैशाची ओढाताण!’असे काही वाचले की मनात येते, एवढ्या मोठ्या व्यक्तीमत्वाला हा कसला डाग!
एकदा राघवेंद्र यांच्या घरी आई पुरणाच्या पोळ्या करीत असताना भीमसेनजीनी एका बैठकीत चार पाच पोळ्या संपवल्या याचेही राघवेंद्र ना कौतुक! एकदा लहानपणी साखर झोपेत असतानाच तंबोर्याच्या सूर राघवेंद्र यांच्या मनात चैतन्य निर्माण करून गेले’ ही बदामीची आठवण अजूनही त्यांच्या मनात घर करून आहे!
लहानपणीच्या अनेक आठवणी सांगता सांगतानाच राघवेंद्र भीमसेनजींच्या अनेक गोष्टी व स्वभाव वैशिष्ट्ये सांगत जातात. त्यावरून त्यांचे गाणे, त्यांचे खाणे, कलंदर स्वभाव, गाण्यातील एकतानता, राघवेंद्र स्वामी वरील श्रद्धा अशा अनेक गोष्टी आपल्या ला दिसून येतात. त्यांना कार ड्रायव्हिंग ची खूप आवड होती आणि काय संबंधी सखोल ज्ञान त्यांनी मिळवले होते असे दिसून येते.
भीमसेनजीनी मुलांची शिक्षणं पुण्यात केली.
दुसऱ्या घरी भीमसेनजीनी खूप खर्च केला, पण पहिल्या कुटुंबाला मात्र गरीबीत ठेवले याची राघवेंद्र यांच्या मनात खूप खंत होती. पण तरीही त्यांनी वडिलांचा मोठेपणा जाणून शेवटपर्यंत त्यांना साथ दिली. त्यांची कीर्ती आणि समृद्धी जगभर पसरली होती. मोठा मुलगा म्हणून वडिलांची काळजी घेतली. भीमसेनजीनी आपल्या पहिल्या पत्नीला कधीच मानाने वागवले नाही.
मनात येईल ते करण्याची भीमण्णांची वृत्ती अनेक प्रसंगातून दिसून येते असेच माझे मत झाले. त्यांना पांढराशुभ्र रंग फार आवडे.’ सात स्वर रंग सामावलेला शुभ्र प्रकाश हेच या स्वरभास्कराचे वैशिष्ट्य होते.
राघवेंद्र यांच्या लिखाणातून मला असे जाणवले की सुरांच्या पलिकडे असणारे भीमसेन वेगळेच होते!त्यांना ‘पद्मश्री’ मिळाली, त्या प्रसंगाचा फोटो भीमाण्णांनी त्यांना दिला.
भीमसेन जींचा मुलगा म्हणून राघवेंद्र यांनी स्वतः चा फायदा करून नाही घेतला. राघवेंद्र नी आपली व्यावहारिक प्रगती स्वतः च केली. पाणी शोधण्याचे तंत्र त्यांना कसे सापडले, धायरीला त्यांनी घर केले, भीमाण्णांनी त्यांच्या’सह नवीन घराला भेट दिली.
भीमाण्णांना भारत रत्न हा बहुमान मिळाला.
‘त्यांच्या मैफिलींच्या आठवणी काढणे म्हणजे मोत्याची थैलीच मोकळी सोडण्यासारखे आहे. प्रत्येक मोती गोळा करताना परत मनात तोच आनंद!’ अशा शब्दात राघवेंद्र यांनी भीमसेनजींचा सन्मान केला आहे!
त्यांचे व्यक्तिमत्व उलगडून दाखवण्यात राघवेंद्र यशस्वी झाले आहेत असे मला वाटते.
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
वारजे, पुणे.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈