सौ. उज्ज्वला केळकर

?पुस्तकावर बोलू काही?

☆ आफ्रिकी आतषबाजी… श्री उमेश कदम ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर ☆

पुस्तकाचे नाव- आफ्रिकी आतषबाजी

लेखक – उमेश कदम

पृष्ठे – २१४

मूल्य – २५० रु.

प्रकाशन – ग्रंथाली

‘आफ्रिकी आतषबाजी’ हा उमेश कदम यांच्या खुसखुशीत कथांचा अतिशय वाचनीय असा संग्रह आहे. उमेश कदम हे सुप्रसिद्ध कथा-कादंबरीकार बाबा कदम यांचे चिरंजीव. आपल्या वडलांच्या लेखनाचा वसा त्यांनी जपला, जोपासला आहे.

आंतरराष्ट्रीय कायद्याचा पदव्युत्तर अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला. त्यानंतर १९९८पासून ते  आंतरराष्ट्रीय रेड क्रॉसमध्ये वरिष्ठ कायदा सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. जानेवारी २००९पासून ते नोहेंबर २०१५पर्यन्त ते नोकरीनिमित्त आफ्रिकेत राहिले. इथल्या वास्तव्याच्या आणि प्रवासाच्या दरम्यान, तिथल्या लोकांशी बोलताना, त्यांची जीवनशैली अनुभवताना त्यांना आलेल्या अनुभवावर त्यांनी,’ दूरची माती जवळची नाती’, ‘केवळ मैत्रीसाठी’, ‘एक होता मित्र’, ‘शापित भूमी’, ‘दृष्टीपलीकडची सृष्टी इ. कथासंग्रह लिहिले. या कथासंग्रह मालिकेतला ‘आफ्रिकी आतषबाजी’ हा आणखी एक कथासंग्रह.

आफ्रिका हा वेगळा प्रदेश. इथलं भैगोलिक- संस्कृतिक वातावरण वेगळं, विचार-आचार-चालीरिती, श्रद्धा- अंधश्रद्धा वेगळ्या. तिथे घेतलेले प्रत्यक्ष अनुभव, तिथल्या लोकांशी झालेल्या बोलण्यातून उमजलेलं त्यांचं जीवन आणि त्याला दिलेली कल्पनेची जोड यातून ‘आफ्रिकी आतषबाजी’मधील कथा सिद्ध झाल्या आहेत. यातील नविन्यामुळे या कथा अतिशय मनोरंजक झाल्या आहेत.

या संग्रहातील सुरुवातीच्या तीन कथा वगळता, कथांचा निवेदक मी आहे, मात्र काही ठिकाणीच तो कथांचा नायक आहे. सर्वच कथांचा नायक तो नाही. इतरत्र तो साक्षीदाराच्या भूमिकेतून निवेदन करतो.

‘आफ्रिकी आतषबाजी’ म्हणजे दिवाळी, ख्रिसमस च्या वेळेला होणारी नयनरम्य आतषबाजी नव्हे. आफ्रिकेमध्ये टोळीयुद्ध ही नित्यश: घडणारी घटना. एकदा लेखक जुबामध्ये असताना अचानक टोळीयुद्ध सुरू होतं. मग लेखक मनसुबे रचू लागतो. ‘आता आपल्याला बंडखोर ओलीस ठेवतील, मग धमाल येईल. टी. व्ही, बातम्या, सर्व प्रसार माध्यमातून प्रसिद्धी मिळेल. राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळ्यांवरून आपल्या सुटकेचे प्रयत्न होतील. कुटुंबियांच्या मुलाखती घेतल्या जातील. मित्र, आपण सुटकेसाठी पाठीशी असल्याचं सांगतील. एकदम आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळेल.’ प्रसंग खरं तर अतिशय गंभीर पण लेखकाने त्याला मोठं गमतीदार वळण दिलय. त्याचे मनोराज्य अर्थातच पूर्ण होत नाही. पण त्यामुळे तिथे अडकून पाडलेल्या, अन्य देशातल्या जुजबी ओळख असलेल्या व्यक्तींशी कसे जिव्हाळ्याचे नाते जडले, आयुष्यात कसा निवांतपणा अनुभवता आला, याचेही वर्णन शेवटी येते. अखेर जखमींना जबाला आणणार असल्याचे कळते, तेव्हा लेखकाला जाणीव होते, जी आतषबाजी पहाण्याचा आपण हव्यास धरला होता, त्यामुळे देशात केवढा हाहा:कार उडाला आहे. हे युद्ध थांबायलाच हवे. अखेर युद्ध थांबते आणि नियोजित स्थळी जाण्यासाठी लेखकाला विमानात बसण्याची वेळ येते, इथे कथा संपते. इथे कथासंग्रहाचं नाव याच कथेशी निगडीत आणि मुखपृष्ठही वर रोखलेली वेपन्स, मशीनगन्स असे आहे.

यातली पहिली कथा ‘बबलू, बबी आणि बबून.’ ही बबलू आणि बबी या काटकसरी जोडप्यावरची आहे. काटकसरी काय, कंजूषच म्हणता येईल. हे दंपत्य ‘व्हिक्टोरिया फॉल’ बघायला जातं. बाहेर जेवणा-खाणाचा खर्च होऊ नये, म्हणून घरातून काही पदार्थ करून घेऊन ते जातात. ‘व्हिक्टोरिया फॉल’च्या प्रवेश द्वाराशी पार्कमध्ये जाताना चौकशी होते. बॅगेत खाद्यपदार्थ नाहीत ना? बबलू ‘नाहीत’, असं बिनदिक्कत खोटं बोलतो. त्यात फक्त पासपोर्ट आणि पाण्याची बाटली असल्याचे सांगतो. आतमध्ये गेल्यावर बॅगेतील खाद्यपदार्थांचा वास एका बाबून जातीच्या धिप्पाड मकडाला लागतो. ते त्यांची बॅग पळवते. मग ती बॅग मिळवण्यासाठी दोघांची कशी पळापळ होते, याचे मोठे रंजक वर्णन यात येते. बबून खाऊ खाऊन बॅग नदीत टाकून देते. त्याबरोबर पासपोर्टही जातात. मग पुन्हा पासपोर्ट मिळवण्यासाठी तिथे रहाणं, या सगळ्यासाठी मित्राकडून पैसे मागवणं, पासपोर्ट मिळवण्यासाठी करावी लागलेली यातायात, या सगळ्यामुळे ही ट्रीप किती तरी जास्त खर्चिक, ३४५३ डॉलर्स म्हणजे २ लाख, ७ हजाराच्या वर कशी जाते, याचं मोठं खुसखुशीत वर्णन यात येतं.

आफ्रिकन राष्ट्रांची संघटना स्थापन व्हावी, यासाठी बोलणी करण्यासाठी, ३२ राष्ट्रांची इथिओपियात एक शिखर परिषद होते. संघटना स्थापन करण्याचे निश्चित होते. या संघटनेचे मुख्यालय आदिस आबाब इथे व्हावे, ही इथिओपियन सम्राटाची इच्छा, तर सोयी-सुविधांचा विचार करता ते नैरोबीत व्हावे, असे अनेक राष्ट्रप्रमुखांचे म्हणणे. त्यांना आपले मत बदलायला लावण्यासाठी इथिओपियन सम्राट आणि परराष्ट्र मंत्री काय युक्ती लढवतात त्याचा अफलातून किस्सा ‘आफ्रिकी युती ( की युक्ती)’ या कथेत नेहमीच्याच खुसखुशीत शैलीत येतो. परराष्ट्र मंत्री सांगतात, येथील हमेर आदिवासीत अशी प्रथा आहे की टोळीचा प्रमुख टोळीतील तरुणींना अतिथींसोबत शय्यासोबत करण्याची आज्ञा देतो, कारण या बाबतीत जिचा अनुभव जास्त, ती तरुणी अधीक विवाहयोग्य. शिखर परिषदेसाठी जमलेल्या राष्ट्रप्रमुखांना इच्छा असल्यास हे आतिथ्य स्वीकारण्याची व्यवस्था करता येईल, असेही ते सांगतात. बहुतेक

राष्ट्रप्रमुख हे आतिथ्य स्वीकारतात. दुसर्याह दिवशी परराष्ट्र मंत्री साळसूदपणे म्हणतात, ‘ इथे संघटनेचे मुख्यालय झाले असते, तर असा अनोखा अनुभव, मिटींगच्या निमिताने आला असताना वारंवार घेता आला असता पण हरकत नाही. नैरोबीत मुख्यालय व्हायला आमची काहीच हरकत नाही. दुसर्यात दिवशी मतदान होते, तेव्हा २४ राष्ट्रप्रमुखांनी आदिस आबाबला मुख्यालय व्हावे, या बाजूने मतदान केलेले असते.

‘अपहरण (होऊ घातलेल्या) बायकोचे!’ या कथेचा नायक बिर्हानू इथिओपियन आहे. अतिशय बुद्धिमान आहे. लंडनला तो सूक्ष्मजीवशास्त्रात एम. ए. सी. करायला येतो. तिथे त्याचं दिसणं, वागणं, इंग्रजी उच्चार यामुळे तो टिंगल टवाळीचा विषय बनतो. त्याची बुद्धीमत्ता, अभ्यासू वृत्ती, संशोधन यामुळे तो प्राध्यापकांच्या मात्र कौतुकाचा विषय बनला आहे. त्याच्या वर्गातील स्टेफी मात्र त्याच्याकडे, सहानुभूतीने, कौतुकाच्या आणि मित्रत्वाच्या भावनेने पहाते. हा पठ्ठ्या मात्र तिचे आपल्यावर प्रेम आहे, असे गृहीत धरून चालतो आणि आपल्या आफ्रिकन जमातीतील प्रथेप्रमाणे तिचे अपहरण करतो. आता तिच्या आई-वडलांनी लग्नाला संमती दिल्याशिवाय तिची सुटका नसते. ती आई-वडलांना फोन लावते. आई – वडील लग्नाला संमती देण्यासाठी येत आहेत, असं त्याला सांगते. आई – वडील पोलिसांना घेऊन येतात. तिची सुटका होते. त्याला अटक होते. त्याने अपहरण केलं, असं तिने सांगितलं असतं, तर त्याचं सारं भविष्यच काळवंडून गेलं असतं. ती खोटा जबाब देते . म्हणते, आपल्याला दारू जास्त झाल्यामुळे आपण घरी जाणे शक्य नसल्याने आपणहून त्याच्याकडे राहिलो. त्याची सुटका होते. आता तो कानाला खडा लावतो. मान मोडून अभ्यास करतो. संशोधन करतो. त्यावर आधारित लेख लिहितो. परीक्षेत सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होतो. ब्रिटिश बोटॅनिकल सोसायटीच्या वार्षिक अधिवेशनात त्याचा प्रिन्स चार्लसच्या हस्ते सत्कार होतो. यावेळी त्याला स्टेफीची तीव्रतेने आठवण येते. त्या प्रित्यर्थ दिलेल्या मेजवानीला तो स्टेफीला बोलावतो, पण ती येत नाही. बिर्हानू इथिओपियाला जायला निघतो. विमानतळावर स्टेफी त्याला दिसते. त्याला आश्चर्य वाटते. ती म्हणते, ‘बिर्हानू कृपा करून मला इथिओपियाला पळवून ने ना! मी इथे आल्याचे कुणाला ठाऊक नाही. मी आदिस आबाबचं तिकीट काढलं आहे. मग करशील ना माझं अपहरण? ‘ गोष्ट इथे संपते.

सिंह आणि बकरी या कथेची सुरुवातच अफलातून आहे. राजा म्हणतो, ‘चल राणी, तयार हो. बेन नव्या गि-हाईकाला घेऊन येतोय.’ राणी निषेधाच्या सुरात म्हणते, ‘ते जवळ येतील . माझ्या सौंदर्याची स्तुती करतील. अंगाशी चाळे करतील. कधी कधी वाटतं, आशा लोकांना कडकडून चावावं. त्यांना नखांनी ओरबाडून त्यांचं रक्त काढावं… या बंदिवासातून कधी सुटका होणार कुणास ठाऊक? ‘ हा संवाद वाचताना वाटतं, कुणा स्त्रीला बंदिवासात ठेवून तिचं शोषण चाललय. इथेही शोषणच आहे, पण ते स्त्रीचं नव्हे, तर सिंहिणीचं. राजा-राणी या सिंह-सिंहीणीच्यामधील हा संवाद आहे. त्यांना अगदी लहानपणीच त्यांच्या नैसर्गिक परिवेशातून बाहेर काढून माणसाळवलं जातं. अगदी जवळ गेलं, त्यांना थोपटलं, अंगावरून हात फिरवला तरी ते काही करणार नाहीत, याचं शिक्षण दिलं जातं. असं एक केंद्र मार्था चालवते. जगभरचे पर्यावरणवादी जनावरांच्या अशा शोषणाला विरोध करतात. मार्था राजा-राणीला सोडून द्यायचं ठरवते. पण ती जगणार कशी? मग ती त्यांच्या पिंजर्याात बकरीला सोडते. पण शिकारीची सवय नसलेली राणी, तिला पाठीवर घेऊन ‘कोकरू घ्या कोकरू’ म्हणत फिरते. आता त्यांच्या बछड्यांना बंदिवासात किळसवाणं जीवन जगावं लागणार नसतं. मग राजा राणीला सूचकपणे म्हणतो, ‘चल, आता घाणेरीच्या झुडुपामागे जाऊ.’

यातील प्रत्येक कथेवर लिहिण्यासारखं आहे, पण ते शक्य नाही. यातील प्रत्येक कथेचा रंग वेगळा. पोत वेगळा. नक्षीकाम वेगळे, पण सगळ्याच कथा चित्ताकर्षक. ज्यांना नवीन काही वाचण्याची, समजून घेण्याची आवड आहे, त्यांनी आवर्जून वाचायला हवे, आफ्रिकी आतषबाजी

परिचय – सौ. उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments