पुस्तकाबद्दल बोलू काही
☆ वेगळ्या वाटेवरचा डॉक्टर – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
नववर्षाच्या आगमनाबरोबरच एक सुवार्ता ऐकायला मिळाली. ई- भिव्यक्तीच्या संपादिका मंजुषा मुळे यांचे नवे पुस्तक, ‘वेगळ्या वाटेवरचा डॉक्टर’ हे पुस्तक प्रकाशित झाले. हा एका इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद असून पुस्तक मेहता पब्लिशिंग हाऊस ने प्रकाशित केले आहे. मंजुषा मुळे यांचे हे बारावे पुस्तक. एक ऑस्ट्रेलियन डॉक्टर डॅमियन ब्राऊन यांच्या ‘Band-Aid For A broken Leg ’ या पुस्तकाचा हा अनुवाद. हे पुस्तक म्हणजे लेखकाचे आत्मकथन आहे. पण हे काही परिपूर्ण आत्मकथन नाही. जीवनाचा एक तुकडा इथे प्रकाशीत झालाय. मेडिसिन्स सान्स फ्रॉंटिअर्स या सेवाभावी सस्थेमार्फत डॅमियन ब्राऊन हा ऑस्ट्रेलियन डॉक्टर स्वयंसेवक म्हणून मोठ्या आत्मविश्वासाने आफ्रिकेत पोचतो. त्याची नेमणूक एका दूर, चहूबाजूंनी भू-सुरुंग पेरलेल्या, सर्वत्र निव्वळ मातीच्या झोपड्या असलेल्या शहरात, माविंगा येथे झालेली असते. या नव्या डॉक्टरांसाठी सगळीच परिस्थिती अपरिचित असते. अंगोलन वॉरचा प्रत्यक्ष अनुभव असणारे, त्याच्या दुप्पट वयाचे, इंग्लिश बोलू न शकणारे आणि पाहिल्याच दिवसापासून वितंडवाड घालणारे आरोग्यसेवक त्याच्या सोबत असतात.
श्रीमती उज्ज्वला केळकर
डॅमियन तिथल्या सर्व आव्हानांना तोंड देतो. तीन स्वयंसेवकांच्या मदतीने तिथल्या समाजातला असमंजस, तर्कविसंगतता अशा गोष्टींशी लढत राहतो. कधी चित्त्याच्या हल्ल्यात जखमी होणारी माणसं, कधी भू – सुरुगाचा स्फोट, तर कधी चुलीवर हत्यारं उकळून कराव्या लागणार्या शस्त्रक्रिया अशी आव्हाने सतत त्याच्या पुढ्यात असतात. तरी स्थानिकांशी मैत्री जुळवत तो परिस्थितीवर मात करतो. तिथली परिस्थिती आणि तिथले अनुभव एवढ्यापुरतेच हे आत्मकथन आहे.
अंगोला, मोझॅंबिक आणि दक्षिण सुदान इथल्या वैद्यकीय दुरावस्थेवर प्रकाश टाकणारे प्रभावशाली असे हे पुस्तक आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील मानवहितवादी गट आणि त्यांच्यासाठी काम करणारी विक्षिप्त, पण असामान्य अशी माणसं, यांच्याबद्दलची प्रामाणिक मते लेखकाने इथे मांडली आहेत.
लेखकाच्या आठवणी आणि अनुभव यावर हे पुस्तक आधारेले आहे. लेखक म्हणतो, ’अतिशय कठीण परिस्थिती आणि त्या परिस्थितीत राहणारे लोक याबद्दल लोकांना माहिती व्हावी, एवढाच हे पुस्तक लिहिण्यामागचा हेतू आहे. ‘
लेखन करणारा आणि अनुभव सांगणारा डॉक्टरच आहे. म्हणून पुस्तकाचे शीर्षक ‘वेगळ्या वाटेवरचा डॉक्टर’ हे काही योग्य वाटत नाही. त्या ऐवजी ‘वेगळ्या वाटेने चालताना’ हे शीर्षक अधीक समर्पक वाटलं असतं. वेगळ्या वाटेने चालताना आलेले अनुभव आणि आठवणी डॉक्टरांनी कथन केल्या आहेत. कुणी तिसर्या व्यक्तीने त्यांच्याबद्दल लिहिले असते, तर हे शीर्षक योग्य ठरले असते.
प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈