सौ विजया कैलास हिरेमठ

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “गुंफीयेला शेला” – लेखिका – संपदा जोगळेकर, सोनाली लोहार, हर्षदा बोरकर, निर्मोही फडके ☆ परिचय – सौ विजया कैलास हिरेमठ ☆ 

पुस्तक – गुंफीयेला शेला  

लेखिका – संपदा जोगळेकर,सोनाली लोहार,हर्षदा बोरकर,निर्मोही फडके….

अभिप्राय- विजया हिरेमठ, संवादिनी,सांगली

 प्रत्येक व्यक्ती वेगळी असते हे जरी सत्य असले तरी काही व्यक्तींमध्ये काही समान धागे असू  शकतात.. या समान धाग्यांमुळेच त्या व्यक्ती एकत्र येऊन समूहाने एखादे चांगले काम करू शकतात असा विश्वास देणारे हे पुस्तक…

पाहून एकच चित्र

विणला प्रत्येकीने कथेचा धागा

त्या एक एक धाग्यांला घेवून

विणला त्यांनी एक सुंदर शेला.. 

चार मैत्रिणी शरीर, मन, विचार, व्यवसायाने वेगवेगळ्या.. वाचन- लेखन हाच एक समान धागा.. उत्तम भाषाभ्यास, निरीक्षण क्षमता व कल्पनाशक्ती यांच्या जोरावर

त्यांनी आपल्या भेटीसाठी गुंफियेला शेला…

तो हाती माझ्या येता उबदार मज भासला….

हे पुस्तक म्हणजे एक आगळा वेगळा प्रयोग आहे . यामध्ये चारही लेखिका आग्रही,जागरूक आणि संयमाने व्यक्त झाल्याची जाणीव प्रत्येक कथेतून होते. या चौघींनी ही एकाच चित्रकृतीचा आपापल्या दृष्टीकोनातून घेतलेला शब्दवेध आणि त्यातून निर्माण झालेल्या आगळ्या वेगळ्या कथांचा हा संग्रह…

प्रत्येकीची कथा अगदी एका पानाची, वीस वाक्यांची, पण खूप काही सांगून जाणारी, कुठेच अधुरेपण नसणारी.. चित्राचा आकार, रूप, रंग आणि प्रत्यक्ष मतितार्थापलीकडच्या जाणीवांना चार लेखकांनी कथा रुपात बांधले आणि 48 चित्रप्रेरीत कथांचा हा शेला गुंफला गेला. पुस्तकातील डॉ आनंद नाडकर्णी यांची प्रस्तावना, हा शेला गुंफण्यापूर्वीचा लेखिकांचा प्रवास उलगडतो तर अच्युत पालव यांची प्रस्तावना या शेल्यास एक नाजूक किनार म्हणून शोभते. चारही लेखिकांचे मनोगत वाचताना प्रत्येकीच्या कथा वाचण्याची उत्कंठा वाटते तसेच प्रत्येकीकडून एक प्रेरणा नक्की मिळते..

एकच चित्र पाहून प्रत्येकीला कितीतरी वेगवेगळ्या आशयाच्या कथा सुचल्या त्यांची शीर्षके वाचूनच हे लक्षात येत गेलं. खूपदा वाटलं ही या चित्राशी या शिर्षकाचा काही संबंध असू शकतो का?  चित्र पाहून आपल्या भावविश्वात एक कथा निर्माण होते  पण प्रत्येक कथा एका वेगळ्याच विश्वाचा प्रवास घडवते. एकाच चित्राकडे पाहून चार लेखिकामधील निर्माण होणाऱ्या वेगवेगळ्या भाव भावनांचे आणि संवेदनशील मनाचे आपल्याला घडणारे दर्शन खरोखर मन थक्क करते. उदाहरणादाखल सांगायचं तर या पुस्तकात एक चित्र आहे.. एका मुलीने रंगीबेरंगी फुगे हातात घट्ट धरले आहेत आणि त्यावर लेखिका हर्षदाने लिहलेली कथा “पॅलेट” एका सुंदर क्षणी एकत्रच असताना अपघाताने कायमची ताटातूट झालेल्या रसिका आणि पुनीतची कथा.

याच चित्रावरून  लेखिका सोनालीने लिहिलेली कथा-“फुगा” यात भेटते छोटीशी सुमी जी गेली पाच वर्षे आईची माय म्हणून जगत आहे आणि एकेदिवशी तिच्या आईने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्यानंतरचे तिचे आजण भावविश्व आपल्याला हळवं करतं…

लेखिका निर्मोही या चित्रावरून कथा लिहिते “स्टॅच्यू” गंमतीने खेळल्या जाणाऱ्या खेळाची एक हृदयस्पर्शी कथा..

लेखिका संपदा या चित्रावरून कथा लिहिते ” श्वेता” दत्तक बाळ वाढवताना त्याच्या वर्तमान आणि भविष्याचा विचार करायचा भूतकाळ मन गढूळ करत राहील आणि काळाबरोबर त्याचा चिखल होत राहिल. ती आपला अंकुर नसली तरी आपली सावली म्हणून वाढवावी असा सुंदर संदेश देणारी प्रबोधनात्मक कथा… 

शेवटी चारही लेखिकांनी आपल्याला आवडलेलं एक एक चित्र निवडून त्या चार चित्राला एकत्रित अशा समर्पक कथा लिहिल्या. या चार चित्रांना एकाच चौकटीत आणून सलगपणे समोर ठेवून चार चित्रांची मिळून एकच कथा प्रत्येकीने लिहून आणखी एक आगळंवेगळं पाऊल उचललं आणि आत्तापर्यंत विणलेल्या सुंदर शेल्याची शेवटी एकत्रित गाठ बांधून एक सुंदर गोंडा ओवला असंच म्हणावसं वाटतंय.

एखादं चित्र फक्त चित्रच नसतं त्यामागे चित्रकाराच्या भावना दडलेल्या असतात. चित्रकाराव्यतिरिक्त फार कमी जाणकार माणसांनाच त्या जाणवतात किंवा चित्रातून दिसतात.  नाहीतर चित्र म्हणजे नुसताच आकार आणि रंग- रेषांचा खेळ.. कोणी चित्र पाहून नेत्रसुख अनुभवतो. कोणी काही वेळाचं सुख – समाधान शोधतो. कोणी चित्रात असं गुंतून जातो की स्वतःच्या संवेदना मग कथेत शब्दबद्ध करतो. 

‘प्रत्येकीच्या दृष्टीकोनाची न्यारी ही किमया

शब्दांच्या धाग्यांनी,  ” त्यांनी गुंफियेला शेला”

पुस्तकरूपी  भेटीस तो आपुल्या आला’

प्रत्येकाने पुस्तक वाचू या आणि शेल्याचा उबदारपणा अनुभवू या. या शेल्याचा उबदारपणा अनुभवू या.

परिचय – सौ विजया कैलास हिरेमठ

पत्ता – संवादिनी ,सांगली

मोबा. – 95117 62351

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

image_print
5 2 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments