सौ. अलका ओमप्रकाश माळी
पुस्तकावर बोलू काही
☆ “वयात येताना” – लेखिका – सौ. अर्चना मुळे ☆ परिचय – सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆
पुस्तकाचे नाव.. वयात येताना
लेखिका.. सौ. अर्चना मुळे
पहिल्या उकळीचा कडक चहा, मोगऱ्या ची कळी नुकतीच उमलताना त्याचा येणारा सुगंध.. तप्त धरेवर पडणाऱ्या पहिल्या पावसाच्या सरी नंतर येणारा मृद्गंध.. ह्या सगळ्या पहिल्या गोष्टींची मजा, चव काही निराळीच असते.. तसचं ह्या वयात येताना ह्या पुस्तकाबद्दल मला वाटतं.. कालच ह्या पुस्तकाविषयी माहिती होणं, त्यानंतर माझं पुस्तकं ऑर्डर करणं आणि त्याची वाट बघत असतानाच दस्तुरखुद्द लेखिकेकडून ते ताज ताज नवं कोर पुस्तकं आपल्याला मिळणं हे म्हणजे भाग्यच म्हणावं लागेल..आणि मग अशावेळी ते पुस्तक एका बैठकीत नाही वाचून काढलं तर आपल्यासारखे करंटे आपणच म्हणावं लागेल..असो.. वयात येताना हे पुस्तक म्हणजे प्रत्येक आई ने आईनेच कशाला बाबाने ही वाचलंच पाहिजे असं पुस्तकं आहे..
छोटंसं अगदी फक्त 80 पानांचं हे पुस्तकं म्हणजे.. आदर्श पालक होण्याची गुरुकिल्ली आहे.. मासिक पाळी हा तसा दबक्या आवाजात बोलला जाणारा विषय पण लेखिकेने एका मध्यम वर्गीय कुटुंबात घडलेला प्रसंग इथे मांडून अनेक कठीण प्रश्नांची उत्तर सोप्पी करून सांगितली आहेत.. अवनी शाळेत जाणारी एक मुलगी आई, बाबा आणि आजी यांच्या सोबत राहणारी.. अचानक आई बाबा ऑफिस मध्ये असताना तिची पाळी येते आणि आजी तिला ज्या प्रकारे समजावून सांगून आईला बोलवून घेते.. आई आजी मिळून तिला पडलेल्या प्रश्नांना योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करतात पण देवपूजा धार्मिक विधी इथे मात्र थोडीफार अंधश्रद्धा येतेच.. पण मग तिच्या शाळेच्या टीचर आणि शुभाताई मिळून एक कार्यशाळा घेतात आणि मुलींच्या मनातील भिती, लाज, अंधश्रद्धा ह्या सगळ्या प्रश्नांना अगदी खेळाच्या रूपातून उत्तर देतात आणि अवनी ला तिच्या प्रश्नांची उत्तर मिळतात..ह्याचं बरोबर आहार, व्यायाम या गोष्टींबद्दल असलेले समज गैर समज अतिशय सोप्पे करून मांडलेले आहेत.. पुढे येणारा विषय म्हणजे मैत्री, प्रेम आणि आकर्षण ह्यातील फरक.. ह्या टॉपिक मधे दोन तीन प्रसंगातून हा कठीण वाटणारा प्रश्न अगदी साधी साधी उदाहरण देऊन समजावून सांगितला आहे.. कॉलेज वयीन मुलींमध्ये तारुण्यसुलभ असणारे भाव आणि त्यांना मुलांबद्दल वाटणारे आकर्षण हे सगळं खरतर नैसर्गिक आहे त्यात गैर काहीच नाही पण ह्या आकर्षणालाच प्रेम समजण्याची केलेली घाई मुलींना कशी अडचणीत आणू शकते हे दोन मैत्रिणी सरिता आणि गायत्री ह्यांच्या संवादातून अतिशय छान शब्दात इथे मांडलेली आहे.. दुसऱ्या एका भागात सुरेखा आणि एक मुलगा फक्त बोलताना दिसतात त्यातून घरी होणारे गैर समज.. समाजाने दिलेली वागणूक ह्यातून सुरेखा आणि आई मध्ये आलेला दुरावा.. मग त्यांना समजावून देणाऱ्या डॉक्टर मॅडम क्षणभर आपल्या ताई सारख्याच भासतात.. प्रेम आणि आकर्षण हा विषय हाताळताना लेखिकेने मांडलेले विचार प्रत्येकाने वाचलेच पाहिजेत असे आहेत..
खर तर मुलगी मोठी होते वयात येते ह्याच्या चर्चा होतातच पण मुलगा वयात येताना त्याच्या शरीरात होणारे बदल ह्यांचा फारसा कोणी विचार करताना दिसत नाही.. खर तर अशा वयात मुलांना ही समजावून सांगण्याची समुपदेशनाची गरज असते अन्यथा कुठून तरी काहीतरी पाहून ऐकून ह्या वयातील मुलांवर फार गंभीर परिणाम होतात.. मुलं एकाकी एकटी बनातात स्वभाव विचित्र बनत जातो.. मुलींना फार आधी पासूनच आई आजी ह्यांच्याकडून थोडीफार कल्पना असते आईला, ताईला बोलताना ऐकलेल असत पण मुलांच्या बाबतीत सगळचं नवीन कुठल्याच घरात मुलगा वयात येताना त्याच्याशी चर्चा गरजेची आहे ह्याचा विचार केलेला मी तरी पाहिला नाहीय.. पण ह्या पुस्तकात ह्याचा विचार करून मुलगा वयात येताना ह्या शेवटच्या टॉपिक मधे तो अतिशय वेगळ्या प्रसंगातून पण समर्पक शब्दात मुलांच्या वडिलांसोबत दोघांना एकत्र समजावून सांगताना खूप छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून लेखिकेने आपले मुद्दे समजावून दिलेले आहेत.. मी प्रत्येक टॉपिक मधले अगदी सगळे डिटेल्स इथे देत नाही कारण अगदी 10 वर्षा पुढील सगळ्यांनी हे पुस्तक किमान एकदा तरी वाचावच असं मला वाटतं.. आणि ज्यांच्या घरात चौथी पाचवी मध्ये शिकणारी मुलगा मुलगी आहेत त्यांनी तर हे पुस्तकं संग्रही ठेवावे असे पुस्तकं आहे.. सो चला तर मग वयात येताना काय काय घडलं, घडू शकतं हे आपल्या मुलाबाळांना लेखिकेच्या शब्दात समजावून सांगू जेणे करून आपल्यातील आई ला आपल्या मुलांशी बोलणं संवाद साधणं सोप्प होईल..
© सौ. अलका ओमप्रकाश माळी
मोब. 8149121976
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈