सुश्री मंजिरी येडूरकर
स्व-परिचय
मी सौ. मंजिरी येडूरकर, MSc, BEd असून मिरज येथे माध्यमिक शिक्षिका म्हणून कार्यरत होते. त्या काळात रोजच्या सांगली – मिरज बस प्रवासात मिळणाऱ्या वेळेत काव्य निर्मिती सुरू झाली. पण त्या प्रसंगानुरूप! कुणाचा वाढदिवस, सहस्त्र चंद्र दर्शन, निरोप समारंभ, लग्न मुंज अशा समयोचित कविता करायला सुरुवात झाली. मी निवृत्ती जरा लवकरच घेतली. त्यामुळं वेळ मिळत होता. सुचलेलं लगेच लिहायला बसू शकत होते. मग कथा ललित लेख लिहायला सुरवात झाली. ‘जाहल्या तिन्हीसांजा’ हा कवितासंग्रह व ‘मर्म बंधातली ठेव ही’ हा कथा, ललित लेख यांचा संग्रह मुलाने प्रकाशित केला. अर्थात फक्त घरगुती वितरणासाठी. स्वरचित कवितांना चाली लावून, त्या विविध कार्यक्रमात सादर करत होते. पण खरी सुरवात झाली ती कोविड मध्ये आम्ही भावंडांनी सुरू केलेल्या साहित्य कट्ट्या पासून. त्याच्या थोडं आधी महावीर वाचनालयाच्या साहित्य कट्ट्या मध्ये सहभाग घेत होते. त्यामुळेच साहित्यिक मैत्रिणी मिळाल्या. कांहीतरी लिहिण्याची उर्मी निर्माण झालीच होती, त्यात भावंडांनी भर घातली.आता थांबायचं नाही असं ठरवलंय. बघू!
पुस्तकावर बोलू काही
☆ “कालिंदी” – लेखिका : श्रीमती अनुराधा फाटक ☆ परिचय – सौ. मंजिरी येडूरकर ☆
पुस्तक – कालिंदी (लघु कादंबरी)
लेखिका – सुश्री अनुराधा फाटक
प्रकाशक – नवदुर्गा प्रकाशन
पृष्ठ संख्या – 136
किंमत – 250 रु
परिचय – मंजिरी येडूरकर.
मुखपृष्ठ खूपच बोलकं आहे. कालिंदी मातोश्री या वृद्धाश्रमाचा आधार घेण्याचा विचारात आहे.असं दृश्य चित्रित केलं आहे.
श्रीमती अनुराधा फाटक
या लघुकादंबरीत एका स्त्रीची विविध रूपं फुलवली आहेत. आपला मुलगा लहान असतांना रणांगणावर निघालेल्या पतीच्या मनातील चलबिचल पाहून, कठोर होऊन त्याला स्वतःचं कर्तव्य बजावण्याचा आग्रह धरणारी वीरांगना, पती निधनानंतर मुलाचं संगोपन करणारी, त्याच्या विकासासाठी, उन्नतीसाठी झटणारी आई, मुलानं न सांगता लग्न केल्यानंतर ही त्याला समजून घेणारी शांत आई, एका रात्रीत पूर्णपणे बदललेला मुलगा बघून कांही न बोलता त्याच्या आयुष्यातून बाजूला होऊन वृद्धाश्रमाचा आधार घेणारी संयमी आई, अर्थात तीच नंतर त्या वृद्धाश्रमाचा आधार बनते. आपला मुलगा अडचणीत आहे व त्याला अडचणीत आणणारी त्याची पत्नीच आहे हे माहीत असूनही त्याला त्याच्या नकळत मदत करणारी हळवी आई, मुलाला कफल्लक करून त्याची बायको सोडून गेली व तो पूर्णपणे दारूच्या आहारी गेला हे समजल्यावर आपली सर्व मिळकत त्याच्या नावावर करणारी वत्सल आई, मुलानं दिलेली हीन वागणूक विसरू न शकलेली व त्यामुळे पुन्हा त्याच्या समोरही जायचं नाही असं ठरवणारी स्वाभिमानी आई, मुलाची वाताहात सहन न झाल्यामुळे प्राणत्याग करणारी आई! ही कालिंदीची सारी रूपं आपल्या काळजाला स्पर्श करून जातात.कालींदीचं भावविश्व, समाजासाठी झटण्याची वृत्ती, दुःखीताच्या हृदयात प्रवेश करून त्याचे डोळे पुसण्याची ताकद या गुणांनी या व्यक्तिरेखेला आणखीनच झळाळी आली आहे. असं हे बहुआयामी व्यक्तिमत्व उलगडत नेण्याचं शिवधनुष्य लेखिकेने लीलया पेलले आहे.निराधार झालेला मुलगा आईला शोधत येतो.तोपर्यंत आईनं वैकुंठाचा रस्ता धरलेला होता. तो विचारतो,” आई कुठे गेली?” याचं उत्तर डॉ सुनील देतात,” मुलाचं बालपण शोधायला गोकुळात गेली.” अशा सुरेख कल्पना तुम्हाला या लघुकादंबरीत वाचायला मिळतील. आवश्य वाचा.
© सौ.मंजिरी येडूरकर
लेखिका व कवयित्री
मो – 9421096611
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈