श्री विश्वास देशपांडे
पुस्तकांवर बोलू काही
☆ “भारतीय स्वतंत्रता संग्राम के अनदेखे समरांगण” – मराठी लेखक : प्रा. हेमंत सामंत – हिन्दी अनुवाद : डॉ. मीना श्रीवास्तव ☆ परिचय – श्री विश्वास देशपांडे ☆
पुस्तक : “भारतीय स्वतंत्रता संग्राम के अनदेखे समरांगण”
मूळ मराठी लेखक : प्रा. हेमंत सामंत
अनुवादित लेखन (हिंदी) – डॉ. मीना श्रीवास्तव
पृष्ठसंख्या – १५२ पाने
प्रकाशक – श्री विद्या बुक डिस्ट्रिब्युटर्स, पुणे
या महिन्यात १७ नोव्हेंबर २०२४ या दिवशी डॉ. मीना श्रीवास्तव यांनी प्रा. हेमंत सामंत यांच्या मराठी लेखांच्या केलेल्या हिंदी अनुवादाची दोन पुस्तके प्रसिद्ध झाली. त्यातील एक होते ‘भारतीय स्वतंत्रता संग्राम के अनदेखे समरांगण’. आपल्या वयाचे शतक पूर्ण केलेल्या मुंबईतील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक डॉ. जी. जी. परिख यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले ही विशेष आनंद आणि अभिमानाची गोष्ट. ज्येष्ठ साहित्यिक हेमन्त बावनकर यांनी या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे.
डाॅ. मीना श्रीवास्तव
आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण नुकताच साजरा केला. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, आपल्या सुखावर तसेच घरादारावर तुळशीपत्र ठेवले. ज्यांनी ज्यांनी या स्वातंत्र्यासाठी त्याग केला, त्यांची आठवण ठेवणे, त्यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करणे आणि त्यांनी केलेल्या बलिदानाची जाणीव ठेवून आपल्या देशाप्रती आपले कर्तव्य बजावणे हे प्रत्येक जागरूक नागरिकाचे कर्तव्य आहे. स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले आयुष्य पणाला लावले असे महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री, पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासारखे नेते आणि स्वा. सावरकर, भगतसिंग, चंद्रशेखर आजाद, राजगुरू यांच्यासारखे महान स्वातंत्र्य सैनिक आपल्याला परिचित असतात, परंतु आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अशा हजारो तरुणांनी बलिदान दिले आहे की ज्यांची नावेही आपल्याला माहिती नसतात.
अशाच अनेक ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीरांची माहिती करून देण्याचे मोलाचे कार्य या पुस्तकाने बजावले आहे. आपल्या स्वातंत्र्यवीरांनी केलेला त्याग आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हे पुस्तक मोलाची भूमिका बजावेल यात शंकाच नाही. या पुस्तकात ३८ ज्ञात अज्ञात अशा स्वातंत्र्यसैनिकांचा परिचय थोडक्यात परंतु अत्यंत माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी अशा भाषेत करून देण्यात आला आहे. मूळ मराठी लेखन जरी प्रा. हेमंत सामंत यांचे असले तरी हिंदी भाषेतील हे पुस्तक अनुवादित आहे असे कुठेही जाणवत नाही हेच डॉ. मीना श्रीवास्तव यांच्या अनुवादाचे कौशल्य आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या उर्मीने संपूर्ण देश जागृत झाला होता. देशांमध्ये ठिकठिकाणी स्वातंत्र्यासाठी लढा सुरू होता. अशा ठिकाणांची आणि तिथे सुरू असलेल्या लढ्यांची प्रेरणादायी ओळख ‘भारतीय स्वतंत्रता संग्राम के अनदेखे समरांगण’ हे पुस्तक आपल्याला करून देते. जेथे स्वातंत्र्याचे धगधगते आंदोलन पेटले होते अशा ३८ ठिकाणांची माहिती हे पुस्तक आपल्याला करून देते. यामध्ये कित्तूर येथील राणी चेन्नम्मा, बराकपूर येथे मंगल पांडे यांनी केलेला विद्रोह, नरगुंड येथे भास्करराव भावे यांनी केलेला विद्रोह, मलेरकोटला येथील कुका विद्रोह, कलकत्त्यातील गुप्त बैठकींचे असलेले माणिकटोला बाग हे स्थान, त्याचप्रमाणे सॅन फ्रान्सिस्को येथील युगांतर आश्रम, चंपारण्य आंदोलन, फिजी येथील इंडियन इंपिरियल असोसिएशन, अमृतसर येथील जालियनवाला बाग हत्याकांड, चौरी चौरा येथील असहकार आंदोलन आदी स्वातंत्र्यासाठी झालेल्या विविध आंदोलनांचा, लढ्यांचा आणि संघर्षाचा रोमहर्षक परामर्श या पुस्तकात घेण्यात आला आहे.
या पुस्तकाच्या आपल्या प्रस्तावनेत डॉ मीना श्रीवास्तव म्हणतात की आज ज्या स्वातंत्र्याचा आपण आनंद उपभोगतो आहोत ते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी त्यांच्या प्राणांचे बलिदान दिले. यामध्ये स्त्रीपुरुष, तरुण, वृध्द, लहान मुले कोणीही मागे राहिले नाही. त्यांच्या अतुलनीय त्यागामुळेच आज भारत स्वतंत्र प्रजासत्ताक राष्ट्र झाले आहे. परंतु अशा स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाला आपण विसरत चाललेलो आहोत. त्यांच्या जयंती आणि पुण्यतिथी आपण साजऱ्या करतो, त्या दिवशी त्यांच्यावर भाषणे करतो, त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतो आणि नंतर दुसऱ्या दिवशी त्यांना आपण विसरून पण जातो. आपल्या भागामध्ये कोणते स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले आहेत, त्यांनी स्वातंत्र्यासाठी कोणते बलिदान दिले आहे हे सुद्धा आपल्याला माहिती नसते अशी खंत त्या व्यक्त करतात. हे पुस्तक शाळाशाळातील मुलांपर्यंत पोहोचले पाहिजे आणि त्यांना स्वातंत्र्याचा हा धगधगता इतिहास माहिती झाला पाहिजे असे आपल्या मनोगतात हेमन्त बावनकर यांनी म्हटले आहे. डॉ. मीना श्रीवास्तव यांनी हे पुस्तक या स्वातंत्र्यलढ्यात ज्यांनी ज्यांनी बलिदान दिले आहे अशा क्रांतिकारकांना अर्पण केले आहे. यातून त्यांनी आपली या क्रांतिकारकांप्रती असलेली तळमळ आणि देशभक्तीचा परिचय करून दिला आहे. त्यांचे हे त्यांचे हे पुस्तक आबालवृद्धांपर्यंत पोहोचावे, विशेषतः तरुणांनी हे पुस्तक वाचून प्रेरणा घ्यावी अशा प्रकारच्या शुभेच्छा व्यक्त करतो.
यज्ञी ज्यांनी देऊनि निजशिर
घडिले मानवतेचे मंदिर
परी जयांच्या दहनभूमिवर
नाहि चिरा नाही पणती । तेथे कर माझे जुळती ।।
… असे म्हणून थांबतो. या पुस्तकाच्या उपलब्धतेसाठी डॉ. मीना श्रीवास्तव यांच्याशी ९९२०१६७२११ या व्हाट्सअप क्रमांकावर संपर्क साधावा.
पुस्तक परिचय : विश्वास देशपांडे
चाळीसगाव.
मोबाईल क्र. ९४०३७४९९३२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈