☆ “वीर सावरकर:आठवणी आणि गोष्टी” – संकलन….सु.ह.जोशी ☆ परिचय – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆
पुस्तकाचे नाव: वीर सावरकर:आठवणी आणि गोष्टी
संकलन: सु.ह.जोशी.
प्रकाशक: सु.ह.जोशी.पुणे मो. 9922419210:
मूल्य: रू.180/-
पुस्तकावर बोलू काही :
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अनेक पुस्तकांची निर्मिती झाली आहे.नुकतेच आणखी एक पुस्तक हातात पडले.वीर सावरकर:आठवणी आणि गोष्टी.मागच्या वर्षी म्हणजे 26/02/2021 ला हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.पुस्तकाचे नाव आणि आकार बघता सहज पाने चाळली.पण मग थोड्याच वेळात पुस्तक वाचून पूर्ण केले.
असे वेगळे काय आहे या पुस्तकात? मुख्य म्हणजे हे एखाद्या चरित्रकारने लिहीलेले सावरकरांचे चरित्र नव्हे.या आहेत सावरकरांविषयी आठवणी व त्यांच्या आयुष्यातील काही गोष्टी,घटना यांची घेतलेली नोंद.या सर्व गोष्टींचे,आठवणींचे संकलन केले आहे श्री.सु.ह.जोशी यांनी.
या पुस्तकात स्वा.सावरकरांचे विचार जसे वाचायला मिळतात तसेच त्यांच्या आयुष्यात त्यांना भेटलेली लहान मोठी माणसे,त्यातून घडणारे त्यांच्या स्वभावाच्या विविध पैलूंचे दर्शन,मतप्रदर्शन,विरोध,साधेपणा,नामवंतांचा सावरकरांविषयी असलेला दृष्टीकोन अशा विविधरंगी पैलूंचे दर्शन घडते.प्रस्तावनेत न.म.जोशी यांनी म्हटल्याप्रमाणे हे नुसते संकलन नाही तर हा सावरकरांच्या वीर चरित्राचा कॅलिडोस्कोप आहे.कोणत्याही वयोगटातील व्यक्तीने वाचावे असे हे पुस्तक आहे.अनेक पुस्तकातील उतारे,वृतपत्रातील वृत्ते,सहवासातील व्यक्तींचे अनुभव असे विविध प्रकार वाचायला मिळत असल्याने पुस्तक रंजक व माहितीपूर्ण झाले आहे.स्वा.सावरकरांना समजून घेण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल यात शंकाच नाही.
परिचय:सौ.बिल्वा शुभम् अकोलकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈