प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ हरवत चाललंय बालपण… ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆

सिग्नलचे हिरवे लाल पिवळे दिवे नियमाने बंद चालू होत या धावणाऱ्या जगाला शिस्त लावत उभे आहेत.आपल्याच तालात शहरं धावताहेत .सुसाट धावणाऱ्या शहरात पोटासाठी धावणारी माणसंही रस्त्यारस्त्यावर धावताहेत .जगणाऱ्या पोटाला भूक नावाची तडफ रस्त्यावर कधी भीक मागायला लावते तर कधी शरीर विकायला लावते.कितीतरी दुःख दर्द घेऊन शहरं धावताहेत.त्यात सिग्नलवरचं हे हरवत चाललेलं बालपण वाढत्या शहरात जिथं तिथं असं केविलवाण्या चेहऱ्यानं आणि अनवाणी पायांनी दिसू लागलंय .

जगण्याच्या शर्यतीतलं हे केविलवाणं दुश्य मनात अनेक प्रश्नांच मोहोळ होऊन भोवती घोंघावू लागलंय.तान्हुल्या लेकरांना पोटाशी धरून सिग्नल्सवर पाच दहा रुपयांची भिक मागत उन्हातान्हात होरपळत राहणाऱ्या माणसातल्याच या जमातीला येणारे जाणारे रोजच पाहताहेत .गाडीच्या बंद काचेवर टक टक करणाऱ्या बाई आणि लेकरांना कुणी भिक घालत असेलही कदाचित पण अशा वाढणाऱ्या संख्येवर कुणी काहीच का करू शकत नाही असा अनेकांना प्रश्नही पडत असेल.बदलेल्या जगात हा झपाट्याने बदलत जाणारा पुण्यामुंबई सारखा हा बदल आता सवयीचा बनू लागलाय असं प्रत्येकाला वाटत राहते .

शाळकरी वय असणारी कितीतरी बालकं आता सांगलीतही अशी सिग्नल्सवर काहीतरी विकत आशाळभूत नजरेने येणाऱ्या जाणाऱ्याकडे हात पसरून विनवण्या करताना दिसत आहेत .

आजही अशीच एक चिमुकली कॉलेज कोपऱ्याच्या सिग्नलवर हातात गुलाबी रंगाचे त्यावर Love लिहलेले फुगे  विकत असताना नजरेस पडते .मागच्या महिन्यात प्रजासत्ताक दिन साजरा झाला.आठवडाभर हिच मुलं बिल्ले,स्टिकर्स आणि झेंडे विकत होती. त्यानंतर पेन्स विकू लागली.आता व्हेलेंटाईन डे येतोय.प्रेमानं जग जिंकायला निघालेल्या तरुणाईच्या हातात हे गुलाबी फुगे आशाळभूत नजरेने विकताना या चिमुकल्यांच्या भवितव्याकडे खरंच कोण पाहील काय ?

धावणाऱ्या जगाला याचं काय सोयरसुतक ते आपल्याच तालात धावतंय.सांगली मिरज कुपवाड शहराच्या बाहेर अशी कितीतरी माणसं माळावर पालं ठोकून आनंदात नांदताहेत . मिरजेला जाताना सिनर्जी हॉस्पिटलच्या पुढं त्यांचं अख्खं गाव वसलंय .पोटासाठी शहरं बदलत जगणारी ही अख्खी पिढी भारतातल्या दारिद्रयाची अशी रंगीबेरंगी ठिगळं लावून भटकंती करतेय. त्यांचं जग निराळं ,राहणीमान निराळं आणि एकंदर जगणंही निराळंच .

शहराच्या पॉश फ्लॅटच्या दारोदारी भाकरी तुकडा मागत वणवण फिरणारी ,सिग्नल्सवर हात पसरणारी,जिथे तिथे लहान सहान वस्तू विकत भटकणारी आणि रस्त्यावर भिक मागत ही लहान लहान पोरं आपलं बालपण हरवत चाललीएत. ना शिक्षणाचा गंध,ना जगण्याची शाश्वती,ना कोणतं सोबत भविष्य. सोबत फक्त एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर जगण्यासाठी धावण्याची कुतरओढ. त्यांचे पालकही असेच. विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर घेऊन जगणाऱ्या या वस्त्या अनेक प्रश्न घेऊन जगताहेत.आणि तिथे वाढणारी,भारताचं भविष्य असणारी बालकं अशी रस्त्यावर भटकत आपलं बालपण हरवत चाललीएत.सामाजिक आणि शैक्षणिक क्रांती नेमकी होतेय तरी कुठे ? खरंच कुणी सांगेल का ?

© प्रा.अरुण कांबळे बनपुरीकर

मु.पो.बनपुरी ता.आटपाडी जि.सांगली

९४२११२५३५७…

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments