श्री नंदकुमार पंडित वडेर
प्रतिमेच्या पलिकडले
☆ शिलाई यंत्र… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
प्रतिकुलतेच्या सुईने तिच्या हाताच्या बोटांनां कितीतरी वेळा टोचलं, जखमातून रक्ताची थेंबा थेंबाने ठिपक्यांची रांगोळी निघाली, टोचले बोटांना पण कळ निघाली हृदयातून, स्स स्स चा आवाजाची कंपनं उमटली, तरीही तिनं शिवण सोडलं नाही. मायेचा दोरा वापरून हाती घेतलेलं शिवणाचं काम ती पूर्णत्त्वाला नेल्याशिवाय तिला फुरसत ती नसायची. शिलाई तर किती मिळायची म्हणता चार आणे. ती देखिल लोक त्यावेळी रोखीने फारच कमी देत असत. अन पहिला कपडा उधारीवर शिवून घेऊन दुसऱ्यावेळेला शिलाईचे निम्मेच पैसे हातावर ठेवले जायचे..ती पहिली उधारी कधीच वसुल न होणारी असे… कधी मधी मागुन बघितले तर असू दे या वेळेला ,पुढच्या वेळेला सगळी उधारी चुकती करु बरं.. जरा अधिक ताणून धरलं तर, आम्ही काय कुठं पळून जाणार आहे का तुझी शिलाई बुडवून?.. विश्वास नसेल तर राहू दे आम्ही दुसऱ्या शिंप्याकडं कापडं टाकतो.. तुझी भीडभिकंची भन नकोच ती… असा कांगावा आणि वर असायचा. जरा खर्जातला आवाजाने सगळी गल्ली गोळा व्हायची नि ते बघून आणखी चार गिर्हाईकं न बोलताच पसार होत असं… बुडलेली पहिली उधारी भुतालाच जमा होत असे… सकाळ पासून मशीनला मारलेलं पायडलं एकदा दुपारच्या नि रातच्या जेवणाला जरासं ईस्वाटा घ्यायचं.. ते रात्रीचं साडे अकराच्या दरम्यान चिमणीतलं तेलं संपल गेल्यानं घरात मिटृ अंधार पडल्यावरच त्या दिवसाला थांबायचं… मग भूईला पाट टेकली जाईची. सणावारचं तर उसंत ती कसली मिळायची नाही.. कधी कधी वादीच कंटाळून तुटायची तर कधी दोऱ्याची बाॅबीन सारखी निखळून पडायची.. घरात दारिद्र्याचा जाजम कायम अंथरलेला असायचा… कमावता हात एक दादल्याचा असे पण तुटपुंजी मिळकत खर्चाच्या फाटक्या खिशातून घरी येई पर्यंत गळून गेलेली असे…देणेकऱ्यांचं तोरण तर दाराच्या आड्याला कायमच लावून ठेवलं असायचं…ते कधीच उतरलं नाही…चार कच्चीबच्ची आणि मोठी दोन पोटाची खळगी पाठीलाच चिकटलेली…वितभरच्या पोटाला क्षुधाशांतीचा शापच होता जणू..अंगभर लेयाला कपडाच लाजायचा. जर्मनच्या पातेल्यात भात नसलेली पेजेचं पाणी खवळलेल्या भुकेला नुसत्या वासानंचं पोट भरल्याचा आभास वाटायचा… एका हाताची मिळकत पुरत नसायची महणून तिनं आपलं किडूक मिडूक चवलीच्या दामाला आणि सावकाराकडं गहाणवटं ठेवलं आयुष्याच्या काबाडकष्टाला नि शिलाई मशीन आणलंच एकदा चंद्रमौळीत झोपडीला.. जिद्दीचा दिवा आशेचा प्रकाश तिला दाखवत गेला.. हळूहळू शिलाईत जम बसू लागला..बऱ्यापैकी चार पैसे हाती आले नि सुखाच्या झुळूकेने घर हरकले..सावकाराचा जाच संपला. एकाला दोन तर दोनाची चार शिलाई मशीनची संख्या वाढत चालली..कपडे शिवून देण्याचं कंत्राट वर कंत्राट मिळत गेली… पसारा वाढला जागा अपूरी पडू लागली .तिने आता स्व:ताची फॅक्टरी उभा केली..अख्ख घरच मदतीला धावून आलं… गावात नगरात तिचं नाव रुपाला आलं.. चार गरजू बायांना रोजगार मिळाला.. मेहनतीला एक दिवस यशस्वी महिला उद्योगक्षेत्रातला पुरस्कार लाभला… तिने तो मानसन्मान आणि पुरस्कार त्या तिच्या पहिल्या वहिल्या शिलाई मशीनलाच अर्पण केला… आता ते मशीन काचेच्या कपाटात चकचकीत करुन ठेवलेलं असतयं.. फॅक्टरीच्या दर्शनी भागात दिमाखात मंदस्मित करत उभं असतयं..त्याला रोजचं पहिलं वंदन करूनच ती फॅक्टरीत प्रवेश करत असते…
© नंदकुमार पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470.
ईमेल –[email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈