श्री नंदकुमार पंडित वडेर
प्रतिमेच्या पलिकडले
☆ “स्वामी निष्ठा…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
… काय रे श्वाना तू इथं माणसांच्या गावात!… एव्हढ्या रात्रीत एकट्याने जोर जोराने भों भों करत भुंकत का म्हणून राहिलास?… आधी तुझं ते केकाटणं बंद कर पाहू… मी कोण आहे ओळखंलस का मला?… अरे शेजारच्या जंगल राज्यातील शेर सिंग प्रधानजी आहे मी नव्हे का? आपल्या सिंह महाराजांनी या गावातील माणसाची एक तरी शिकार घेऊन येण्याची आज्ञा केलीय… अरे तिकडं आपल्या जंगलात काही काहीही खायला मिळेनासं झालंय गड्या… जंगल खाद्या बरोबरच आपणच आपल्या दुर्बल रयतेची शिकार करत करत इतके दिवस तग धरला होता.. पण अलिकडे असं लक्षात आलयं कि हळूहळू आपलीच रयतेची संख्या खूपच कमी कमी होऊ लागलीय… रोडावलीय… म्हणून आपल्या महाराजांनी आता आपल्या रयतेची शिकार इथून पुढे बंद असा फतवा काढला आहे.. तुला काय हे ठाऊक कसे असणार म्हणा… तिथं जंगलातल्या आपल्या माणसांची भुके कंगाल झालेले हाल काय असतात ते… तू इथं या माणसांच्या घोळक्यात माणसळाला गेला आहेस ना त्याच्याच एक दुष्परिणाम असाही झालाय की हि निर्दयी माणसांची जात राजरोसपणे जंगलात घुसून दिसेल त्या प्राण्यांची शिकार करत सुटलेत.. जंगलतोड तर अहोरात्र करत असतातच शिवाय त्यात अशी सावज शिकार करत फिरतात.. आपली स्तिथी न घर का न घाट का करून टाकलीय… जरा कुठे बंदूकीच्या गोळ्यांचा ठो ठो आवाज जंगलात घुमतो न घुमतो तोच झाडावरचे पक्षीगण जसे पंख फडफडवीत नि भीतीच्या कलकलटाने अख्खं जंगल भिरभिरत राहतात नि सगळ्यांना धोक्याची सुचना देतात.. तेव्हा सिंह महाराजांसकट आमची सगळ्यांची कि रे चड्डी पिवळी पडते… थरथर अंग भीतीने कापत जाते आणि आधी स्वताचा बचाव करण्यासाठी संरक्षित जागा शोधत बसावी लागते.. मग उरलेल्या जनतेकडे लक्ष देण्याची बुद्धी येते… अरे जंगलातले हिंस्र प्राण्यांचा समुह कळीकाळालाही कधीही न भिणारा.. तर आपल्या भीतीने इतरांच्या जीवावर शक्तिशाली हल्ला करणारे आपण आता असे गलितगात्र होऊन गेलोय… आता आपण नाही तर हा माणूस नावाचा प्राणी आपल्या पेक्षाही दसपटीने हिंस्र झालाय… आपल्या अस्तित्वाचा प्रश्नच ऐरणीवर आलाय… त्यामुळे आर या पार मग जशाच तसं लढा करताना या गनिमी काव्याचा आधार घेऊन अश्या अंधारातून त्या माणसांच्या गावात शिरून एक तरी शिकार करायचीच आणि त्या भुकेलेली, दुर्बल झालेल्या जनतेच्या भुकेची व्यवस्था करायची… असा एव्हढा मोठा जीवावर उदार होऊन धोका स्वीकारायला माझ्या शिवाय दुसरं कोण तयार होणारं… म्हणून मीच तो विडा उचलला आणि आज पहिल्यांदा इकडच्या माणसांच्या गावाकडे वळलो.. काल परवा पर्यंत त्या पलिकडे च्या माणसांच्या गावाकडे आठवड्यातून दोन तीनदा जात होतो.. पण माझ्या येण्याने त्यांच्यातील दोनचार जणं नाहीशी झालेली त्यांना त्यांच्या कसल्याशा यंत्रात दिसलं आणि जी त्याच्यांत घबराट निर्माण झाली म्हणतोस… आता रात्र रात्रभर खडा पहारा ठेवून एक दोन बंदूकधारी त्यांनी तैनात ठेवले की… अशी ती डोकेबाज माणसांची जात… पण आपणही काही कमी नाही बरं.. तल्लख बुद्दीचं दान आपल्यालाही मिळालयं… मग दिला सोडून तो माणसांचा गाव नि आजपासून दूसरा नवा गावाकडे मोर्चा वळवला… माणसांना जसं जंगलाची कमतरता नाही तशी आपल्याला माणसांच्या गावाचीही कमतरता नाही बरं… अरे तु बघितंल नसशील पण आजही माणसांच्या मनात आपल्या बद्दल खूप खूप भीती आहे बरं… आता त्यांनी रात्री अपरात्री शिकारीसाठी जंगलाकडे येणं हळूहळू बंद केलयं पण आपण आता जंगल सोडून त्यांच्याच गावातच हल्ला करायला येत असतो.. करावं तसं भरावं असते रे… आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आम्हालाच सोडवायला लागणार नाही का… आता कशी नवी नवी युक्त्या काढून आम्हाला पकडून जेरबंद करायला धावू लागलेत… आम्ही असे तसे त्यांना सापडतोय होय वाट बघ… ते जाऊ दे… हे नंतरही तू जंगलात परत आलास की समजेलच.. या बोलण्यात आता जास्त वेळ नको घालवायला… हं तर तू मला मदत कर कुठल्या घरात माणसांची संख्या कमीत कमी आहे आणि डरपोक स्वभावाची आहेत. ती घरं ती माणसं मला दाखवशील.. मी मग दोन तीन दिवसाड येऊन एकेकाची शिकार करून घेऊन जाईन… या कामी तू मला मदत केल्याबद्दल आपले सिंह महाराज सैन्याचा सेनापती पद तुला बहाल करतील… आणि आपलं जंगल राज्य अधिक सुरक्षित राहील त्याचा विस्तार वाढत जाईल… हं मग श्वानमित्रा करतोस ना मदत मला.. म्हणजे माझं काम फारच सोयीचं होईल… चल चल बघू.. “
” हे पहा जंगलराज प्रधानजी महाशय तुम्ही आला तसे मुकाट्याने परत फिरा… तुम्हाला इथं माणसांची शिकार बिलकुल करता येणार नाही.. कारण मी इथला त्यांचा रखवालदार आहे… आमचा तुमच्या त्या जंगल राजशी सुतराम संबंध नाही.. आमच्या कैक पिढ्या इथं या माणसांच्या गावात राहून माणसाळाल्या आहेत.. आम्ही त्याचं मीठ खाल्लेल आहे.. तेव्हा इमानी पणाला जागणं हेच आमचं कर्तव्य ठरतं… सारं गावं माझ्यावर विश्वास ठेवून गाढ झोपेत असतं तेव्हा कोणी एक तस्कर किंवा तुमच्यासारखे जंगलातले हिंस्र प्राणी या गावात येण्याची हिंमत धरत नाहीत… आणि कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल मी असा तसा जंगली शिकारी कुत्र्या पैकी नसून जर्मन शेफर्ड कुत्र्याच्या वंशातला आहे… मलाही गावात वट आहे.. मी पहाऱ्याला असताना इथं वाकड्या मार्गाने येण्याची कुणाची माय अजून तरी व्यालेली नाही… तेव्हा मला वाटतं तुम्ही आता फारवेळ हिथं न घालवता ताबडतोब दुसऱ्या ठिकाणी निघून जावं हेच बरं.. यात तुमचेच हित आहे.. तेव्हा माझं ऐका… “
” अरे जर्मन शेफर्ड असलास तरी शेवटी तू एक य:कश्चित् श्वान आहेस.. आणि तुझ्या असल्या पोकळ धमकीला मला घाबरण्याचं काही एक कारण नाही… हे पहा तुला जर मला मदत करायची नसेल तर तु मुकाट्याने बाजूला हो.. मला माझ्या सावज टिपून शिकार करण्यास अटकाव करू नकोस.. आणि त्याहूनही जर तू माझ्या वाटेत अडथळा करणार असशीलच तर सगळ्यात आधी मला तुझीच शिकार करावी लागेल… एकदाचा तुझाच कायमचा बंदोबस्त केला म्हणजे माझा मला मार्ग निर्वेध होईल.. कसं.. त्या माणसांनी तुला पाळून तुझी खरी ओळख च विसरायला लावली आहे.. चारपायाचां पशू तू आणि दोन पायांच्या माणसांपुढे आपलं शेपुट हलवतं आपल्या एकनिष्ठेची टिमकी वाजवून दाखवतोस आणि ते ही का तर तुझ्या पुढे टाकलेल्या त्या चतकोर भाकर तुकड्या साठी.. का कशासाठी इतकी लाचारी… का तुझ्या अंगात धमक नाही का तुझ्या तंगड्यात चपळपणा नाही… स्वताची भुक स्वता भक्ष्य शोधून आणण्याची स्वावलंबी वृत्ती नाही.. परावलंबित्व स्विकारून इतकं भिंधेपण तुझ्या रोमारोमात भिनलयं पहा कसं.. आधी स्वताची नीट ओळख करून घे.. त्या मतलबी ढोंगी आणि दगाबाज माणसाच्या नादाला लागू नकोस.. माझं ऐक.. अरे शेवटी आपलं जंगल राज्य हेच सुखाचं आणि सुरक्षित असतयं बरं.. तेव्हा यावर मी शिकार करून येईपर्यंत गंभीरपणे विचार कर आणि मग आपण जंगलाकडे जाऊया… कसं… “
” नाही नाही ते कदापि शक्य होणार नाही.. आता आम्हा कुत्र्याचं जगणं हे जीना यहां मरना यहा इसके सिवा जाना कहा.. असं कायमस्वरूपी ठरलेलं आहे.. जिथलं मिठं खाल्लं तिथे एकनिष्ठ राहायचं हेच आमच्या वाडवडिलांच्या पासून शिकवण मिळाली आहे.. आणि घेतलेल्या वसा प्राणपणाने जतन करायचा.. मग भले त्यात आपल्या जीवनाची आहूती पडली तरी चालेल.. ते जीवन सार्थकी लागले म्हणून समजलं जाईल.. तेव्हा आपण इथं निष्कारण बडबड करण्यात वेळ न दवडता तुम्ही आलात तसे परत जा.. आणि या गावातली शांतता अढळ राहू द्या… “
” मी इतका वेळ तुला बऱ्याबोलानं समजावून सांगितलं तरी तुला आपल्या या प्रधानजीच ऐकायचं नाही ठरवलसं तर ठिक आहे आज तुझ्या शिकारी पासूनच शुभारंभ करतो… ” जबरदस्त ताकदीच्या वाघाने त्या जर्मन शेफर्ड कुत्र्याच्याअंगावर झेप घेतली दोघांनी झुंज देण्यास उलटं पालटं होत एकामेंकाच्या उरावर बसत हाताच्या पंजाने एकमेकाला ओरबाडत आणि तोंडाने मोठ मोठ्याने चित्कारत झटापट करत राहिले… त्यांच्या या गदारोळाने अख्खा गाव जागा झाला.. आ वासून जो तो समोरचं दृश्य पुतळ्या सारखा स्तब्ध होऊन बघत राहिला.. पण पुढे जाण्याची एकाचीही शामत नव्हती… त्या वाघाच्या आणि शेफर्ड कुत्र्याच्या झटापटीत शेफर्ड कुत्र्याने जीवाची बाजू लावून लढत दिली पण अखेर त्या वाघाच्या ताकदीपुढे त्याचा टिकाव लागला नाही.. त्याचे त्राण संपत आले तसे तो ढिला पडला… ते पाहताच वाघाने त्याला आता आपल्या कराल दाढेत धरून त्याचे तंगडे ओढत नेऊ लागला.. पण तिथं जमलेल्या माणसांची गजबज पाहून त्या वाघाने तिथून लवकर बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.. शेफर्ड कुत्र्याच्ं तंगड तोंडात घट्ट धरून तो धावत सुटला… पण त्याच वेळी त्या शेफर्ड कुत्र्याच्या अंगात एक विज सळसळत गेली आणि त्यानं तेव्हढ्याच जोरजोराने आपल्या अंगाला असे काही हिसडे दिले कि त्या पळणाऱ्या वाघाला ने डरकाळी फोडताना त्या शेफर्डचं धरलेलं तंगड सोडून दिल्याचं त्याच्या लक्षात आलं नाही.. तो तसाच आधी जंगलाकडे पळत सुटला… वाघ गेलेला पाहून सगळे गावकरी त्या शेफर्ड भोवती जमा झाले आणि मग जो तो त्याचं कोडकौतुक करू लागला… शेफर्ड च्या अंगावर काही जखमा झाल्या होत्या त्याच्या कडे त्याने लक्ष दिलं नाही.. त्याला ठाऊक होतं आता माझी काळजी घेणारी माझी माणसं ते सारं पाहतील असा विश्वास त्याला होताच… आज आपण स्वामीनिष्ठेला जपलो याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर झळकत राहिलं…
© श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈