प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ नाचून गेल्या चिमण्या…! ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆

सकाळी अंगणातल्या चिवचिवाटानं जाग आली.चिमण्यांचा थवा अंगणात गलका करत होता.चटचट चटचट किड्या मुंग्या वेचण्यात सगळ्या गुंग होत्या.आईनं शेणानं सारवलेल्या अंगणाला नुकताच लखलखीतपणा आला होता.त्या शेणातल्या किडया अळ्या आणि धान्य वेचण्यात रममाण झालेल्या चिमण्या माझी चाहूल लागताच भुरकन उडून लिंबांच्या झाडावर बसल्या आणि अंदाज घेऊन काही क्षणात पुन्हा सारवलेल्या अंगणभर पसरल्या.चिमणा चिमणीचे ते चिवचिव करत,चटचट अन्न वेचत आणि टूणटूण उड्या मारत अंगणभर हुंदडणं डोळ्यात साठवत मी बाजूला बसून पहात होतो.काही अगदी माझ्या जवळ येऊन मला निरखून पहात होत्या.मीही कुतुहलानं त्यांच्या डोळ्यात एकटक पहात त्यांचं निरागसपण टिपून घेत होतो.आपल्याच तालात नाचणाऱ्या चिमण्यांनी अंगण सजून गेलं होतं.मध्येच शेळ्यामेंढ्यांचं ओरडणं,गाईगुरांचं हंबरणं आणि कावळ्यांचं कारकारनं ऐकत..एकटक त्या अंगणाचं जीवंतपण अनुभवत होतो.बाजूला आईनं पाणी भरून ठेवलेली दगडी काटवटीत चिमण्यांची अंघोळीसाठीची धडपड आणि उडणारं पाणी कोवळया उन्हात अंगणाला सोनेरी झालर लावून जात होतं. तिथंच टपून बसलेली मनी आणि चिमण्यांचं हुंदडणं  पहात दोन्ही पायावर तोंड ठेवून शांतपणे पहुडलेला काल्या होता. मध्येच अंड्याला आलेल्या करडया कोंबडीचं देवळीत उडी मारण्यासाठी चाललेली धडपड आणि फांदीवर लक्ष ठेवून टपलेले कावळे सारे काही माझ्या बनपुरीच्या घराच्या अंगणाची शोभा वाढवत होते.नुकत्याच चार पाच दिवसापूर्वी जन्मलेल्या शेळ्यांच्या करड्यांनी अंगणभर उड्या मारत चालवलेला धिंगाणा आणि सारवलेल्या अंगणात बारीक बारीक पडलेल्या लेंड्याचा अंगणभर सडा पसरलेला होता.अंगणातल्या चूलीवर काळ्याकुट्ट अंगानं डिचकीत पाणी तापत होतं.दुसऱ्या बाजूला काट्याकुट्यात भक्ष शोधणारी पंडी मांजरीन तिच्याच तालात होती.पाणी तापवत डोळं चोळत,फुकणीनं फुकत शेकत गप्पा हाणित बसलेली पोरं.असं गावाकडचं घरदार भरलं की अंगणात नाचणाऱ्या चिमण्यांनी रोजच्या सकाळचं अंगण असं उजळून  निघतं…..

आज चिमण्यांचं चिवचिवनं क्वचितच ऐकायला मिळतं.लहानपणी माळवदी घराच्या किलचानात चिमण्या घरटं करायच्या.घरटं बनवताना त्यांची चाललेली धांदल सारं घर उघडया डोळ्यानं बघायचं.कधी कधी घरात पसरलेला कचरा, त्यातच पडलेलं एखादं फुटलेलं अंडं आणि कधीतरी उघडया अंगाचं पडलेलं चिमणीचं पिल्लू पाहून मन हळहळायचं. चिमण्यांचं सुख आणि दुःख अनुभवत बालपण कधी सरलं समजलच नाही.चिमण्यांनी मात्र घरात आणि मनात केलेलं घरपण हटता हटलं नाही.

आज मात्र अंगणात नाचणाऱ्या चिमण्यांनी मनाचं अंगण पुन्हा हरखून गेलं…..अशा अंगणभर पसरलेल्या चिमण्या पुन्हा पुन्हा मनात नाचत रहाव्यात..आणि घराचं अंगण पुन्हा सजीव होत रहावं..!

(आज अंगण हरवलेली घरं आणि चिमण्यांचं ओसाडपण मनाची घालमेल वाढवत राहते अगदी माझ्या आणि तुमच्याही.)

© प्रा.अरुण कांबळे बनपुरीकर

मु.पो.बनपुरी ता.आटपाडी जि.सांगली

९४२११२५३५७…

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments