श्री नंदकुमार पंडित वडेर
प्रतिमेच्या पलिकडले
☆ अभ्यंग स्नान… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा. अंगे भिजली जलौघाने सुस्नात झाली वसुंधरा. वारीचे ओहळ धावती मुक्तांगणी सैरावैरा. खळखळ नाद घुमवित जल निघाले भेटाया सागरा. कडाड चा थरार झंकारला तडितेचा… दुहितेची शलाका चमकली भेदून गेली अभंग नभाला… बावरले सारे चराचर भयकंपित तनमन झाले… कुर्निसात करती तरु लता त्या होऊनी नतमस्तक वर्षा पुढे, सांगती फक्त तुझीच सत्ता आम्ही कोण ते बापुडे… आडदांड खटयाळ दगड गोटे पथा पथावरी येती वाट ती आडविती… असमंजास त्या वळसा घालून प्रवाह दावितो चातुर्यगती. आले नवे नवे पाणी गाती गाणी बाकिबाबा… तृषार्त झाली धरित्री तृणपातीचा कोंब लवलवे इवला इवलासाबा. शाखा पल्लव तरू लतांचे सचैल न्हाऊन निघाले, हरित लेणीचें दीप उजळले… आज दिवाळीचे साऱ्या सृष्टीला अभ्यंगस्नान घडले…
© नंदकुमार पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈