श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ कालचा पाऊस… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

काल रात्री गाढ झोपेत असताना अचानक पाऊस बरसून गेला… कळलंच नाही मला… दारं खिडक्या घराची घट्ट बंद होती ना.. कुणास ठाऊक किती वेळ तरी कोसळून गेला असावा.. सकाळी जाग आली तेव्हा खिडकीची तावदाने न्हाऊन निघालेली दिसत होती… थंडीचेही दिवस असल्याने हवेतल्या गारठ्याने खिडक्यांच्या काचेवरील पावसाचे थेंब थेंब थरथर कापत  खाली ओघळून जात होते.. समोरचं आंब्याच्या झाडाने नुकतेच सचैल स्नान केल्यावर पानांपानांतुन  मंत्रोच्चाराची   सळसळ करताना प्रसन्न दिसला… मधुनच वाऱ्याची हलकी झुळूक त्याला लगटून गेलीं. जाता जाता होईल तेव्हढी पानं कोरडी करून गेली.. खिडकी उघाडण्याचं धैर्य मला होईना.. पाऊस पडून गेला असला तरी घरात शिरकाव करायचा होता गुलाबी थंडीला… एक हलकासा हात काचेवरून मी फिरवला.. हाताच्या उबदारपणा मुळे काचेवर जमा झालेल्या बाष्पानं सगळं अंग आकसून घेत काच  मला म्हणाली, “काल रात्री तुला जागं करायचा खूप प्रयत्न केला.. अगदी पावसानं गारांचा तडतड ताशा वाजवून पाहिला.. सरीवर सरी सप सप  चापट्या देत मला सांगत होत्या, अगं उठीव त्याला बघ म्हणावं ऐन दिवाळीच्या मोसमात पाऊस कसा कंदील, फटाके भिजवायला आलायं तो.. पण तू खरचं गाढ झोपेत होतास.. मग पाऊस हिरमुसला होऊन गेला.. हळूहळू थांबत गेला.. जाताना मला म्हणाला त्याला सांग रागावलोय त्याच्या वर.. आतापर्यंत बऱ्याच रात्री उशिराने घरी येत होतास, तेव्हा म माझं कारण घरात  आई, बाबा नि आजोंबाना सांगुन सुटका करून घेत होतास.. तुला तर कधीच मी भिजवलं सुध्दा नाही.. कारण तुझी माझी भेट कधीच झालेली नाही… पण आज अचानक येऊन तुला भेटायचं होतं.. तुला बघायचं होतं.. म्हणून रात्री उशिरानं आलो.. तू बेडरूममध्ये झोपलेला असताना तूला जागं करावं आणि एकदा डोळे भरून पाहावं… पण तू गाढ झोपेतून हलला सुद्धा नाही.. आता माझी कटृटी आहे कायमची असं सांग त्याला.. “. खिडकीची काच हे सारं मला सांगताना खूप हळवी झाली.. भरलेले डोळयांतली आसवं स्यंदन करत गेली…

… मी ही तिला सांगितले कि, ‘रात्री माझ्या स्वप्नात पाऊस आला होता मला भेटायला, आम्ही खूप दंगामस्ती केली.. त्यानं मला खूप खूप भिजवलं.. आम्हा दोघांना भेटून खूप आनंद झाला… बराचवेळ बोलत राहिलो, हसत राहिलो… मला म्हणाला आता त्यावेळी माझं खोटं कारणं सुटका करून घेत होतास ना.. म्हणून आज अचानक आलो तुला भेटायला नि मनसोक्त भिजवायला… ‘आणि तो  नेमकं हेच बोलून गेला.. ‘मला खूप नवल वाटलं पावसाचं.. रात्रभर झोपेत त्यालाच स्वप्नात तर पाहात होतो… आणि आता तर प्रत्यक्षात हिथं येऊन गेल्याच्या ठेवून गेलाय त्याच्या साक्षित्त्वाच्या खुणा… ज्या तू जपून ठेवल्यास मला दाखवायला… काचं आता स्वच्छ झाली होती नि मंद मंद हसत होती…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments