श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ कुटुंबातील सुसंवाद… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

“माझं अडलंय खेटरं!…मीच का म्हणून सारखं सारखं करायचं ? दादाला का सांगत नाही !”इति घरातलं कन्यारत्न.

“कारट्या दिवस आसरात्र गावभर उंडगत असतोस! घरात इकडची काडी तिकडे करत नाहीस!अभ्यासाच्या नावांने कायमची बोंबाबोंब..”इति घरातले बाबा. 

“मी म्हणून या घरात टिकले ! आणखी कुणी असती तरी केव्हाच हे घर सोडून गेली असती!तेव्हा कुठे कळली असती बायकोची किंमत!…”इति घरातली आई.

“अगं सुनबाई!आज घरात चहा अजून झाला नाही काय? माझ्या बीपीच्या गोळ्या राहिल्यात अजून घ्यायच्या! चहा मागितल्याशिवाय आपणहून कधीच नाही द्यायची बापडी! आम्हा म्हातार्‍यानचं नशीबचं फुटकं हो..म्हणून असली सून मिळाली..”इती घरातले आजोबा आजी( विशेषकरून तोंडाळ आजी)

“सरोजा वहिनी!आमची किल्ली तुमच्याकडे ठेवून देते बरं.त्या कामवालील्या दुपारी एव्हढी द्याल तेव्हढी. आणि केर भांडी स्वछ करून जा म्हणावं..”इति सखी शेजारीण.

“ वसंता ! नुसता पेपर डोळ्यासमोर धरून लोळत काय पडलास  ? आज अजून आंघोळ वगेरे आटपून कचेरीला कधी निघणार?”इती नातसुनबाई आपल्या पतीदेवांना…

आणी आणि आणि …या सारखे विविध विषयावरचे अगणित संवाद घरा घरात आणि दारा दारात घडत असतात. नवीन त्यात काय! घरोघरी त्याच मातीच्या चुली हो की नाही?बरे हे संवाद आजकालचे वाटत असले तरी फार पूर्वापार चालत आलेले आहेत.. हो आमच्या वेळी असं नव्हतं हे पालुपद मात्र त्यावेळी नसावं एव्हढाच काय तो फरक… पण पण संवाद घडत होते, होत होते,चालत होते. त्याशिवाय का घरं चालणार होत! कुटुंबाची जडणघडण होत वंश परंपरा पुढे पुढे गेली असणार ? जिथं कुटुंब तिथे संवाद आणि जिथे संवाद तिथे किमान दोन व्यक्ति तरी असायलाच हव्या.अपवाद मात्र आपुलाची वादु,संवादु आपुल्याशी करणारा तुर्‍याव्यवस्थेतला विरळाच कोणी…पण तिथे देखील तो संवाद आत्माचा परत्म्याशी चालेला असतोच…असो आपला तो विषय नाही.

वसुधैव कुटुंबकम अशी श्री ज्ञानदेवांनी या अखंड विश्वगोलालाच संबोधले आणि जो जे वांच्छील तो ते लाहो असे पसायदानात मागणे केले तेव्हा देखील संवाद अपेक्षित होताच..आत्म्याचे परत्म्याशी संवादरूपी बोलणं मग ते प्रत्यक्ष असो वा मौनातलं..अगणित कुटुंबानी मिळून होणारा समाज,अनेक समाज मिळून होणारे राज्य,राष्ट्र..आणि अशी अनेक राष्ट्रमिळून बनलेलं ते वसुधैव कुटुंबकमात जेव्हा सौहार्दपूर्ण सुसंवाद घडतो तेव्हा स्वर्गीय आनंद या भूमंडलावर अवतरलेला असतो.प्रेम,माया,आपुलकी,वात्सल्य,ममता,मैत्री,नातं गोतं…सारं सारं काही तिथे उपजत असत…अर्थात संवादाशिवाय या गोष्टीना जाणवता आले असते काय ?

एकाच घराच्या छताखाली अनेक नात्यागोत्याची माणसं एकत्र राहत होती,राहत असतात आणि पुढेही राहत असणार..अविभक्त कुटुंब पद्धती अस  याला म्हणतात.. यात पणजोबा,आजोबा,आजी (हयात असे धरून बरं)आई बाबा,काका काकू,मुले सुना,नातवंड,पतवंड,चुलत,मावस,लांबच्या नात्यातले जवळीकतेने राहणारे,अशी रक्ताची आपली म्हणवणारी घरची दारची असा नात्यांचा सोहळा असणारं घर…पाळण्यातल्या नवजात शिशु पासून ते नाबाद शतकीचे ज्येष्ठ वयोवृद्धा पर्यन्तची वेगवेगळ्या वयाच्या लहानथोरांनी गजबजलेले घर…अनेक शारीरिक वैशिष्ट्याने परिलुप्त असलेले.विविध स्वभावाच्या कंगोर्‍याने बनलेले,रंग रूपाने वेगळेपण जपणारी,आणि आणि उपजत मनुष्य स्वभावाला साजेशी असणारी…घरातल्या प्रत्येकाशी कस बोलत असतील,वागत असतील,आणि याचा सर्वाचा परिपाक त्या अवाढाव्य घरातून कसा प्रत्ययाला येत असेल..संवाद आहे तिथे वाद असणारच…घर म्हटलं म्हणजे भांड्याला भांडे लागणारच..हे तर ओघानेच येणार आहे. अहो हाताची पाच बोट कुठे एक सारखी असतात…हे  विश्वमान्य सत्य आहे ते नाकारून कसे चालेल नाही का?..त्या त्या घरा घरातले पूर्वापार चालत आलेली संस्कृती,परंपरा,घराणे चालीरिती…सर्व मागुन पुढे नेण्याच काम दर पिढी करत जाते..आदरयुक्त बोलणं ही त्यातली पहिली पायरी.गोड मृदु बोलणं दुसरी पायरी.ह्या दोन गोष्टी कटाक्षाने पाळल्या जातात तिथे वादाला वावं नसतोच मुळी..अरे ला का रे भाषा आली की संवाद संपुष्टात येऊन वादाची ठिणगी पेटू लागते.हसरं खेळत्या घरातली शांती बिघडायला वेळ लागत नाही. मग अवमान, अपमान,अपमर्द,सारखे अविवेकी चरे त्या घराच्या आजवरीच्या अभेध्य भिंतीला हळूहळू चरे पाडून,घराला उधवस्त करू पाहतात..घराची शकलं  शकल होण्यास वेळ लागत नाही. मग वादाचा विषय कुठला असो त्याचा परिणाम असाच होणार असतो.मग पश्चात बुध्दिने काय मिळवले आणि काय गमावल याचा लेखाजोखा करण्यात काही मतलबही नसतो.मतलबींचे मनसुबे साध्य झाल्या सारखे वाटतीलही पण त्यासाठी त्यांनी अनमोल नात्यांची किंमत मोजलेली असते हे उशिराने लक्षात येते.तोवर परतीचे मार्ग बंद करून बसलेले असतात..केवळ सुसंवाद घडला नाही म्हणून..वयाने ज्येष्ठ असणारे अनुभवाने समृद्ध असतात.चार पावसाळे,उन्हाळे त्यांनी पचवलेले,सोसलेले असतात त्यांचा सल्ला योग्यरीत्या विचारात घेऊन पुढील वाटचाल केली तर,पुढच्यास ठेच मागचा शहाणा चा फार तर फायदाच होणार असतो.पण हे केव्हा तर त्यांच्याशी सुसंवाद असेल तर.त्यांच्या या उतार वयात त्यांची ममतेने,आपुलिकेने केलेली विचारपूस,शुश्रूषेला थोडा दिलेला वेळ या सुसंवादातून त्यांनी मनापासून दिलेले आर्शिवाद पुढील वाटचालीत मोलाचे ठरतात. जसे पेरावे तसे उगवते या न्यायाने आपले हे वर्तन आपल्या भविष्यातही सुखाचेच अनुभवाला येते.जी गोष्ट ज्येष्टांबाबत तीच वडीलधारी करत्यांबाबत असणे तितकेच गरजेचे ठरते. त्यांचे कष्ट,श्रम,अनमोल असतात.कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवताना होणारी त्यांची न दिसणारी दमछाक नजरेआड करण्याचा करंटेपणा करू नये.शक्यतो होता होईल तो आपला भार आपणच उचलण्याची मदत केली तर त्यांना किती हुरूप येईल.सुसंवादाची गरज इथे फार असते.अत्यंत संवेदनशील विषय पैसा,मिळकत,खर्च,या केंद्राभोवती घर फिरत असते. घरातल्या प्रत्येकाची आवड निवड,मागणी इथ पुरविली जाते.अर्थात काहींची कारणपरत्वे मागे राहते..मग रूसवे फुगवे यांचे कोंब उगवतात..उणिदुणी काढली जातात..विसंगतीचा पंचनामा चव्हाट्यावर येतो…संवाद संपतो नि वाद सुरू होतो..वाटण्या कोर्टाचे दार ठोठावतात.. प्रेम आपुलकिचा गळा घोटला जातो.. स्वार्थापुढे नाती गोती ,मैत्री गाडली जाते.. विषय संवादाने सामोपचारने मिटवता आला असता पण मनातले कटुतेचे  भिनलेले विष तस करू देत नाही…

जी गोष्ट घरातली पुरुषवर्गाची ती तशीच घरातल्या स्त्री वर्गाची एक पायरीने वरचढ ठरणारी. नव्याने येणार्‍या सूनबाईला सासुरवासेचा छळवाद हाच पहिला विसंवादाचा पाया पक्का करतो.कितीही सुशिक्षित घर असो सासू सुनेतला विस्तव एनकेन प्रकारे पेटता राहतोच.धुसफूस,माजघरातले हुंदके,स्वैपाक घरातली आदळआपट बोलू लागतो तेव्हा सुसंवादाची ऐशी की तैशी होऊन जाते..घरभर फिरणारा गृहलक्ष्मीचा हात,तिचा हसतमुख असणारा वावर घराला घरपण देणारं तिचे कष्ट सुसंवादाने घरात आनंद,सुख,शांती ओतप्रोत भरून बाहात असते. पण जर का विसंवाद झालाच तर अख्या घराची उधवस्त धर्मशाळाच झाली म्हणून समजा.मग नात कुठलही असो,जाऊ,ननंद,आत्या,मावशी,काकी,आजी,सगळे एथून तिथून सारखेच..घरकामापेक्षा वाटणीचीच अपेक्षा जास्त..लेकी बोले सुने लागे असल्यावर संवादाचे धिरडे होईल नाही तर काय ?

घरातले शेतातले गडीमाणसं यांच्याशी घरातल्या सगळ्यांनी साधलेला संवाद तर खूप काही सांगुन जातो.नोकर चाकर म्हणून हीन दिन लेखून जर बोलणं केल तर त्याना तरी मालकाच्या बद्दल आणि त्याच्या घराबद्दल जिव्हाळा कोठून बरे येणार.त्यांची विचारपूस,हवं नको,वेळ प्रसंगी मदतीचा हात पुढे केला तरच जिवाला जीव देणारी आणि माया लावणारी माणस कामाची जोडली जातात..केवळ ओठावर गोड बोलण ठेवल्यान…अर्थात काही वेळा कडक परकड शब्दात बोलणं असण हेही तितकेच महत्वाचे नाही तर आपली मुखदुर्बलतेने आपलाच घात झाल्याशिवाय राहायचा नाही.

कालपरत्वे छोटे कुटुंबाची संख्या वाढीस लागली आहे. यास कारणे जरी अनेक असली तरी कुटुंब आणि संवादाचा ढाचा तसाच राहिला आहे. आजकाल शहरात नोकरी व्यवसायानिमित्ताने घरातील करत्या स्त्री पुरूषांना घडयाळ्याच्या गतीहून जास्त जोरात धावावे लागत असल्याने सूर्य उगल्याबरोबर बाहेर पडून चंद्र उगवल्यावरच घरी येण होत असल्याने घरातील स्ंवादच संकोचला गेला आहे. नेहमीचे ताण तणाव,शारीरिक दगदग,यात उत्साह गळपटून गेला आहे. मानसिक थकवा यातून चार शब्द बोलायला उसंत नसतो. तिथे संवाद कुठे घडावा. लहान मूल असतील तर त्यांची फारच कुचंबणा होते. आई जेउ घालीना बाप भीक मागू देना..मग कुठे तरी वडयाच तेल वांग्यावर निघत. अभ्यास,हट्ट हा सामायिक विषय असतो. तू तू मै मै घरात नवरा बायकोत सुरू होते आणि शेजारी पाजारी गेलाबाजार मित्र,नाते वाईक याना फुकाचा डेलीसोप बघयाला मिळतो.शेवट विसंवादाने घर मोडते…वेळीच प्रेमाने,आपुलिकेने,कळकळीने जर चार गोडीने शब्द पुसले गेले जाते तर ही वेळ टाळता का आली नसती…

देवकृपेने सर्व प्राणीमात्रा मध्ये फक्त माणसालाच देवाने तोंड दिले आहे.. भाषा माणसाने तयार केली.आणि त्या द्वारे तो दुसर्‍याशी बोलू लागला..ऐकण आणि बोलण हा संवादाचा पाया आहे. दुसर्‍याच नीट शांतपणे ऐकुन घेण हेही जास्त महत्वाच आहे. तरच आपल्या बोलण्याला काही अर्थ राहील.या दोन घटकात बोलणं कस असावं तर ऐकत राहावं अस गोड,मृदु नि हस्ता खेळता प्रवाही संवाद असावा.जेव्हढे शस्त्राने घाव घातलेले जातात ते कालांतराने भरून निघतात तरी पण शब्द असे अस्त्र आहे की याच्या घावाची जखम कधीही भरून निघत नाही.माणूस जोडणारा संवाद हवा  माणूस तोडणारा विसंवाद टाळावा. सगळ्या गोष्टीला पैशयाने विकत घेता येत नाही त्यातला सुसंवाद करायला,घडावयाला दाम मोजायची गरज नाही.

अलिकडे  रंगीत भित्तीपत्रके समुपदेशाचे डोस पाजताना मुरकत सांगतात की कुटुंब म्हणजे मायेची पाखर…कुटुंब म्हणजे विश्वासाची झालर..कुटुंब म्हणजे घर असतं… जिवाभावाच मोल असतं…तिथेच नातं समृध्द असतं…तेच खर घर असतं…कुटुंब म्हणजे आशा असते जीवनाची दिशा असते…घर जिथे एकमेंकांच्या भावभावनांचा आदर असतो..ते घर ते कुटुंब मंदिर असतं…आणि आणि या सर्वाला सुसंवादाची मात्र गरज लागते…तर  आणि तरच हे शक्य होतं…

आता वरचं दिलेलं चित्र पाहिलंत ना.. हि दगडाची केवळ एक रचना आहे.. भावनेने एकत्र आलो तर कुटुंब… नाहीतर सगळे दगडचं…

“अहो! किती वेळ अजून तो लेख लिहीत बसणार आहात ? जेवणासाठी आम्ही सगळेच खोळंबुन बसलो आहोत ना ?गारढोण जेवण झालं तर मला बोलायचं नाही ?” स्वयंपाक घरातून सौ. कडाडली आहे.. तेव्हा मंडळी आता इथेच आवरतं घेतो…पण तुम्ही तिकडे लक्षं देऊ नका…आमच्या घरी मात्र हे रोजजचं असतं…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments