श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ जेव्हा शेतात नागीण सळसळली… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

डांबरी रस्त्याची सडक  जेव्हा गावत नवी नवी आली.. वाटलं काळी नागीणच सळसळ करत चालली…जसा बळीराजाच्या गळ्यात बांधलेला काळा गोफाचा गंडा…तसा गावाच्या गळसरीला चकचकीत काळ्या नागिणीचा कंडा..दोन्ही कडेच्या उभ्या पिकांनी थरथर भीतीने आपली अंग आकसून घेतली.. आणि जी पिकं, तृणपाती नागीणीला मधेच आडवी आली त्यांना आपला फणा उभारून क्षणात आडवे करून गेली… उरलेली लव्हाळी जरळी माना मोडून शरणागती पत्करून भुईसपाट झाली…आडमार्गाचा गाव आला हमरस्ताशी हातमिळवणी करायला… कधीतरी दिवसभरातून एकदा येणारी एस. टी.च्या लागल्या ना चकरा वाढायला… फटफट ती पोलीस पाटलाची नि तलाठ्याची मिजाशीत पळायची तेव्हा.. आता  घराघरातली डौलाने दुडदूडू धावत असते हिरोहोंडावरची नवयौवना…बाजारहाट आठवड्याचा तालुका भरायचा तोच आता ऑनलाईन ऑर्डर करा   माल येईल तुमच्या घरा असं सांगू लागला… शाळा कालेज शिक्षणाची वणवण संपली…घराघरात पदव्यांची प्रमाणपत्रांची तसबिरी लटकली…निशाणी डावा अंगठा निळ्या शाईत साक्षर झाला.. गावाचा विकासाचा सूर्य आता अस्ताला जाण्याचा विसरला…जग आले जवळ किती मुठीत सामावले प्रत्येक हाती… विज्ञानाने साधली प्रगती. .. गावा गावाने आता कात टाकली…आधुनिक वैचारिकतेचे उदंड वारे चोहोबाजूंनी वाहू लागले… सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे…एकदा येणारी संधी आता दारातच ठाण मांडून बसली…यशाच्या पहिल्याच पायरीने अपयशाच्या पायरीला पायतळीच गाडली… यशा सारखे यशच त्याला नाही क्षिती कुणाची… माध्यान्हीचा सूर्य तळपता तळपता पश्चिम दिशेला झुकू लागला…

हळूहळू हळूहळू यशाची धुंदी मनामनावर गारूड करत गेली… अधिक प्रगतीचा सूर्य दुसऱ्या देशात दिसू लागला… आणि आपल्या कतृत्वाचा हिथला वावच संपला…  विमानं डोई  भरभरून उडून गेली परदेशात… ओस पडत गेले गाव आणि डोळ्यातले  दु:खाश्रु माईना  घरा घरात.. विकासाची रोपं पिवळी पडत सुकत गेली कोळपून भुईवर पडली…कधीतरी येतो आंब्याचा मोहर घेऊन वसंताचा ऋतु…अन सारा गाव लोटतो त्याला समजून घालण्यास अरं बाबा ईथं  थांबशील तरी तू… विकास झालाय पोरका तुमच्या शिवाय त्याला कोण विचारणारं तरी आहे का…आता सुखाला चटावलेली मन माघारी फिरणारी असतात का… आणि गावातलं जुनं हाडं गावाची नाळ कापून घ्यायला तयार नसते… अखेरची कुडी या मातीत मिसळून जावी हिच एक इच्छा मनात तिची असते… मागचं सारं सारं एकेक आठवतयं.. पाऊलवाटा, माळरान, मारूतीचं देऊळ, शेताचा बांध, पांदणं…नि आपुलकीची घट्ट माती… जोवर हे सगळं अबाधित होतं  तेव्हा तेव्हा   अन आता डांबरी रस्त्याची सडक  जेव्हा गावत नवी नवी आली तर तर… एखादा चुकार अश्रूचा टिपूस ओघळून जातो…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments