श्री नंदकुमार पंडित वडेर
☆ “अकेला हूॅं मैं…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
होय मी तुला या किनाऱ्यावर आणून सोडलंय!… आता येथून पुढे तुझा तुला एकट्यानेच प्रवास करायचा बरं!… काही साधनं , सोबती मिळतीलही जर तुझ्या भाग्यात तसा योगायोग असेल तर.. नाही तर कुणाचीच वाट न पाहता, कुणी येईल याच्या भ्रामक अपेक्षेत न राहता पुढे पुढे चालत राहणे हेच तुला श्रेयस्कर ठरणार आहे… जसा मी बघ ना जोवर तू सागराच्या जलातून ऐलतीरावरून पैलतीरी जाण्यासाठी आलो तुझ्या सोबतीला मदतीला… आणि या किनाऱ्यावर तुला उतरवून दिले… मलाही मर्यादा असतात त्याच्या पलीकडे मला जाता यायचं नाही.. जाता यायचं नाही म्हणण्यापेक्षा जमिनीवर माझा काहीच उपयोग नसतो… हतबल असतो..मनात असलं अगदी शेवटपर्यंत साथ द्यावी पण पण तसं तर कधीच घडणार नसतं मुळी… आता आपल्या त्या प्रवासात किती प्रचंड वादळं येऊन गेलेली आपण पाहिली की.. खवळलेला समुद्र, त्याच्या महाप्रचंड काळ धावून आल्यासारख्या प्रलयंकारी अजस्त्र लाटांचे मृत्यूतांडवाशी केलेला संघर्ष…तो माझ्या तशाच तुझ्याही जिवनाचा अटळ भाग होता… आणि तसं म्हणशील तर जीवन म्हणजे तरी काय संघर्ष असतो कधी आपला आपल्याशी नाही तर दुसऱ्याशी केलेला… साध्य, यश तेव्हाच मिळते.. विना संघर्ष काही मिळत नसते… मग सोबतीला कुणी असतात तर कुणी नसतातही… एकट्याने लढावा लागतो हा अटळ संघर्ष…अंतिम क्षणापर्यंत… आभाळाएव्हढी स्वप्नं दिसतील तुला या तुझ्या जीवन प्रवासात… जी हाती पूर्ण आली तेव्हा म्हणशील याच साठी केला होता हा अट्टाहास..तेव्हा आपसूकच ओठांवर हास्य येते आपल्या… आणि आणि दूर कुठेतरी संगीताची धुन वाजत असलेली कानी पडते… अकेला हूॅं मैं. इस दुनिया में… कोई साथी है तो…
© नंदकुमार पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈