श्री नंदकुमार पंडित वडेर
प्रतिमेच्या पलिकडले
☆ “काहूर मनी दाटले…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
या निर्जन निवांत स्थळी, आणि अश्याच रोजच्या कातर वेळी, वाट पहात बसते तुझी प्रेमात बुडालेली वेडी खुळी. तू हवा हवासा असतोस जवळी..दिनवासर दिनकर निरोपाचे काळवंडलेले अस्तराचे पालाण घालून आसंमाताला जातो अस्ताला डोंगरराजीच्या पलिकडे दूर दूर. ते पाहून हूरहूर मनातील उमटते तरंग लहरी लहरी ने तडागाच्या जलाशयावर. आता क्षणात येशील तू अवचित जवळी अशी मनास माझ्या समजूत घालते आभासमय आशेवर. निराशेच्या काळ्या मळभाने गिळून टाकतात डोंगर, तलावाचे काठ, नि पाते पाते तरूलताचे, तृणपातीचे माझ्या मनासहीत..चाहूल पदरवांची येईल का , आतुर झालेले कान नि दाटून गेलेल्या चोहिकडेच्या अंधकाराने भयकंपिताचे आलेले भान. आजची आशा निराशेत नेहमीप्रमाणे लुप्त झाली, तसे उठून निघाले पाय ओढीत तनाचे मण मण ओझे घराकडे.चुचकारीले कितीतरी परी हटवादी मनास जोजवेना ते आढेवेढे..
.. अशी रोजच संध्याकाळी कातर वेळी, वाट पहात बसते तुझी प्रेमात बुडालेली वेडी खुळी. काहूर मनी दाटले नेत्रातून पाझरले.
© नंदकुमार पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈