श्री नंदकुमार पंडित वडेर
प्रतिमेच्या पलिकडले
☆ “बाप्पा मोरया रे…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
बाप्पा तुझा आमच्याकडे यायचा टाईम कि रे झाला…
दरवर्षाला सांगत असतो ना लवकर येशील पुढच्या टायेमाला..
अन तसा तू येत असतोच न विसरता दर वर्षाला… लालचावलास तू सारखा सारखा इथं यायला… भलामोठा मंडपात, सुशोभित मखरात, बसतोस ऐषआरामात… घरच्या, दारच्या यजमानांची उडते किती त्रेधातिरपिट… तूझ्या आगमनाच्या आधीपासून ते तुला निरोपाचा विडा देईपर्यंत.. असते का काही तुला त्याची कल्पना… फक्त भिरभिरते डोळे तुझे शोधती नैवेद्याचे मोदक ताट भरून आहेत ना.. सुपाएवढे कान तुझे आरत्या, पूजाअर्चा, तारस्वरातल्या ऐकून घेती… छचोर गाण्याचा शंख कर्णा त्या फुंकती.. नवल वाटे मजला अजूनही बहिरेपण तुजला कसे न आले… आल्यापासून जाईपर्यंत डोळे टक्क उघडे ठेवशी… साधुचे नि भोंदूचे भाव अंतरीचे जवळूनी पाहशी.. जसा ज्याचा भाव तसा त्याला पावशी… मिस्किल हसू आणून गोबरे गाल फुगवून बसशी… तथास्तू चा हात आशिर्वादाचा तव मात्र सगळ्यांच्या मस्तकी ठेवशी… ज्याची त्याची मनातली मागण्यांची माळेची मोजदाद तरी तु किती करशी… करोडोंची होतसे इथे उलाढाल ती दिखाऊ भक्तीचा भंडारा उधळून देण्यास.. देखल्या देवा दंडवताच्या उक्ती नि कृतीला तूही आजवरी ना विटलास… चौदा विद्या नि चौसष्ट कलांचा तू अधिपती… कसा विसरलास भक्तांना अंतर्यामी खऱ्या भक्तीची, सश्रद्ध बुद्धी देण्यास ती… दहा दिवसाचा तो सोहळा रात्रंदिन आमचाच कोलाहलाचा गलका… कधीही चुकूनही नाही तू सोडले मौनाला शब्दाने एका.. जे चालले ते सगळेच चांगलेच होते भावले आहे का तुला?… निदान हे तरी सांगशील का मला!……
.. आणि आणि हो.. माझं ना तुझ्या जवळ एक मागणं आहे!.. या वर्षी तू इथं आलास कि तू मौन बाळगून बसू नकोस… जे जे तुला दिसतयं ते तुला आवडतयं, नावडतयं ते स्पष्ट सांगायचं!.. घडाघडा बोलायचं!… मनात काही ठेवायचं नाही.. नि पोटात तर काहीच लपवायचं देखिल नाही!… तुला काय हवयं ते तू मागायचं.. अगदी हट्ट धरून… आम्ही नाही का तुला नवस सायास करतो तुझ्या कडे हक्कानं!.. मग तु देखील आमच्याकडे मागणी करण्याचा हक्क आहेच कि… टेक ॲन्ड गिव्ह हि पाॅलिसी चालतेय ना श्रध्देच्या बाजारात… मगं कसं सगळा व्यवहार पारदर्शी होईल…. पण त्यासाठी तुला बोलावेच लागेल… मौन धरून गप्प बसण्यात काही मतलब नाही.. आणि आम्हालाही कळेल कि आपल्या मागण्या पूर्ण होणार आहेत कि नाहीत… आणि समजा मागुनही मिळणार नसेल तर तर दोन हस्तक नि एक मस्तक तुझ्या पायी ठेवून.. ठेविले अनंते तैसेची राहावे.. चित्ती असु द्यावे समाधान अशी मनाची समजूत घालून पुढे चालू लागू… तरी पण यावेळे पासून तू आमच्या बरोबर बोलणार, संवाद साधणार आहेस… अरे तु दिलेल्या चौदा विद्या नि चौसष्ट कलांचा आम्ही मानवांनी काय आविष्कार केलाय हे तु पाहिलसं पण ते तुला जसं हवं होतं त्याच अपेक्षेप्रमाणे झालयं का कसं… का तुला काही वेगळचं अपेक्षित होतं.. हे तुला आता सांगावच लागेल… निदान उशीर होण्यापूर्वी चुक दुरुस्ती तर करता येईल…. नाहीतर नाहीतर आम्ही पण तुझ्याशी बोलणार नाही.. एकाही शब्दांनं… कट्टी कट्टी घेणार तुझ्याशी… आणि आणि आरतीच्या, पूजाअर्चाच्या वेळेला तुला दाखवलेला नैवेद्य, प्रसाद आम्ही सगळाच खाऊन टाकू… तुला बिल्कुल देणार नाही… हिच तुला आमच्याकडून पेनल्टी… कितीही गाल फुगवून रूसून बसलास तरी… मग मनात आणूही नकोस फिलिंग स्वत:ची गिल्टी वाटल्यावरी…
© नंदकुमार पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈