सौ राधिका भांडारकर
✈️ प्रवासवर्णन ✈️
☆ चला आसाम मेघालयाला… भाग – 5 ☆ सौ राधिका भांडारकर ☆
आमचा परतीचा प्रवास सुरू झाला.
आता परत गुवाहाटीकडे. आमच्या प्रवासाची जिथून सुरुवात झाली त्याच ठिकाणी परत जायचे. गुवाहाटी म्हणजे गोहत्ती. गोहत्तीचे चे प्राचीन नाव, प्रागज्योतिषपूर असे आहे.आसाम राज्यातील आणि ईशान्य भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे हे शहर. हे आसामच्या मध्य पश्चिम भागात,ब्रह्मपुत्रा नदीच्या दक्षिण काठावर वसले आहे..प्राग्ज्योतिषपूर या नावाने प्रचलित असलेले गुवाहटी, हे,ऐतिहासिक कामरूप राज्य तंत्राची राजधानी होती. आता दिसपूर ही.आसामची राजधानी आहे.काझीरंगा ते गुवाहाटी हे जवळजवळ १९३ किलोमीटरचे अंतर आहे. गुवाहाटी कडे जाणारा हा रस्ता अतिशय रमणीय होता. वातावरण पावसाळी होते. आकाश ढगाळलेले होते. चहाचे लांबचलांब मळे दुतर्फा होते. केळी सुपारी होत्याच.बटाट्याचीही शेती दिसली. वाटेत, चहा, नारळाचे पाणी,किरकोळ खरेदी अशी मौजमजा करत प्रवास चालला होता. गाडीत ड्रायव्हरने आसामी गाणी लावली होती. काहीशी भजनी चाल वाटत होती. काही शब्दही कळत होते. थोडीशी बंगाली पद्धतीची शब्दरचना वाटत होती. आवाजही चांगला होता. गाणी ऐकताना मन रमले.
आजचे विशेष आकर्षण होते ते ब्रह्मपुत्रा नदीतील क्रूझ. आणि रोपवे सफारी. मात्र गुवाहाटीला पोहोचल्यावर मुसळधार पावसाने सारीच त्रेधातिरपीट उडवली. रोपवे सफारी रद्द करावी लागली. मात्र आमच्या टूर सहायकाने दुसर्या दिवशी जाऊ असे आश्वासन दिले.म्हणून बरे वाटले.
1. ब्रह्मपुत्रा 2.आसामी कलकुसर 3. आसामी जेवण
ब्रह्मपुत्रेचं दर्शन आत्मानंदी होतं! आशिया मधली ही एक प्रमुख नदी आहे. तिबेट, चीन, भारत,आणि बांगलादेश मधून ही वाहते. बांगलादेशामध्ये तिला जमुना या नावाने ओळखले जाते. गंगेच्या त्रिभुज प्रदेशात येऊन ब्रह्मपुत्रा बंगालच्या उपसागरास मिळते. ब्रह्मदेवाचा पुत्र म्हणून ब्रह्मपुत्रा.काही ठिकाणी तिचा ब्रह्मपुत्र असा पुलिंगीही ऊच्चार करतात. आसाम राज्यातील बहुतेक मोठी शहरे ब्रह्मपुत्रेच्या काठावर वसलेली आहेत.नद्यांना आपण देवता का मानतो? अनुभूतीतून ते जाणवायला लागतं. संथ वाहणाऱ्या या महाकाय सरितेच दर्शन खरोखरच स्वर्गीय आनंद देणार होतं! तिच्या पात्राकडे बघता बघता नकळतच हात जुळले.निसर्गातल्या अज्ञात शक्तीला केलेलं ते नमन होतं!गंगा,गोदावरी,इंद्रायणी जणू सार्यांचं एकरुप पहात आहोत असं वाटलं.वात्सल्यरुपी माऊलीसारखीच मला ती भासली. पावसाळ्यात मात्र ती रौद्र रुपात एखाद्या देवीसारखीच भासत असावी.
अल्फ्रेस्को ग्रँड हे आमच्या बोटीचं नांव.तीन मजली बोट होती. यामधून केलेला विहार अतिशय आनंददायी होता. बोटीवरच जलपान झाले. आणि सारेच पर्यटक नाचगाण्यात रमून गेले. नदीमध्ये अनेक लहान मोठी बेटे, झाडाझुडपात दडलेली आहेत. तिथे मंदिरेही आहेत. मावळतीच्या वेळचे आकाशातले गुलाबी रंग आणि किरणांचे, संथ पाण्यातले प्रतिबिंब पाहता पाहता माझे मन हरखून गेले. ती नौका सफर अविस्मरणीय होती!!क्षणभर वाटलं या जलौघात सामावून जावं!!
गुवाहाटी हे तसं मोठं गजबजलेले शहर आहे. आसाम मधील मोठे, शैक्षणिक, सांस्कृतिक, आणि व्यापारी क्षेत्र आहे. येथे सरकारी कार्यालये, विधानसभा, उच्च न्यायालयाच्या इमारती आहेत. इथल्या नेहरु स्टेडियमवर क्रिकेट व फुटबॉलचे आंतरराष्ट्रीय सामने होतात. मात्र इथल्या रस्त्यांचा विकास झालेला वाटला नाही. रस्ते अरुंद आणि वर्दळ प्रचंड. पण ट्रॅफिक रूल्स पाळण्याची शिस्त असल्यामुळे गोंधळ जाणवला नाही.
आमच्या हॉटेलचं नाव मला आवडलं. घर ३६५.
या! आपलं स्वागत आहे! वर्षभर घर आपलेच आहे! अशा अर्थाचं हे नाव वाटलं. रूम लहान असली तरी सर्व सुविधा संपन्न होती. रात्रीचे जेवणही छान होते. आता हळूहळू मोहरीच्या तेलातलं आसामी चवीचं जेवण आवडू लागलं होतं.रात्री झोपताना मात्र डोळ्यासमोर येत होती ती विशाल ब्रह्मपुत्रा!
क्रमश:…
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈