सुश्री वर्षा बालगोपाल

? बोलकी मुखपृष्ठे ?

☆ “बियॉन्ड लिमिट्स” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

ठसठशीत कुंकू काळजीची नजर आणि त्या नजरेच्या टप्प्यातले एक बालक एवढेच चित्र आणि त्याखाली लिहिलेले बियॉण्ड लिमिट्स हे शीर्षक. बस एवढेच छायाचित्र.

पण बारकाईने पहिले तर हे चित्र खूपसे बोलू लागते.

अगदी सरळ भाषेत म्हटले तर घार उडते आकाशी तिचे लक्ष पिलापाशी या म्हणीवर आधारित चित्र काढा म्हटले तर ते असेच असेल.

एक आई संसार आणि नोकरीं दोन्ही सांभाळताना कायम तिच्या मनात आपल्या बाळाचे विचार असतात. तिला तिच्या बाळाचे रूप नजरेत कायम दिसते. याच विचारात ती आपली नोकरीं करत असते. ती आईची व्यथा, वेदना या चित्रातून स्पष्ट दिसते.

आईचे घर म्हणजे तिची धरती, तिची नोकरी म्हणजे तिचे आकाश. मग या धरती अंबरच्या मिलनी अर्थात क्षितिजावर तिला तिचे मूल स्पष्ट दिसत असते आणि या क्षितिजावरूनच त्याने गगनभरारी घ्यावी हे तिचे स्वप्न अगदी हुबेहूब रेखाटले आहे वाटते.

आपले बाळ हे स्त्रीचे हळवेपण असते तर तेच बाळ त्या बालकावर संकट आले तर तिचे बलस्थान पण होऊ शकते. हीच खंबीर नजर त्याचे कवच ठरू शकते असेही दाखवते.

बियॉण्ड लिमिट्स हे वाचल्यावर याच एका स्त्रीला आपल्या मर्यादा ओलांडून आपल्या बाळासाठी काही करण्याची इच्छा आहे हे लक्षात येते.

आईची नजर कायम आपल्या बाळावर असतेच पण ते कमी आहे म्हणून की काय पण कुंकवाचा तिसरा नेत्रही बाळाकडे रोखून पहात आहे असे वाटते.

हाच तिसरा नेत्र बालसूर्य होऊन बाळाला सकारात्मक ऊर्जा देण्याचे काम करत आहे असे वाटते.

त्या चेहऱ्यावरील काळजीचा एक नेत्र क्षणभरही बाळाला ओझर होऊ देत नसला तरी दुसरा डोळा त्याच्या काळजीने झरतो आहे पण मोठ्या कौशल्याने हे अश्रू ती लपवते कोणाला दाखवत नाही असेही हे चित्र सांगते.

त्या चेहऱ्यावर केस विखुरलेले दाखवले आहेत. तिचे मन त्या प्रमाणे विस्कटलेले असले तरी तेच केस मुलायम रेशमी बंध होऊन मुलाला आईकडे खेचतात असाही अर्थ निघू शकतो पण एक आई आणि तिचे बाळ यामधील अतूट बंधाचे हे चित्र आहे एवढे मात्र निश्चित असले तरी अंतरंगात डोकावल्यावर कळते की आपल्या एकुलत्या एक मुलाला झालेल्या ब्लड कॅन्सर मुळे पिळवटलेले काळीज डोळ्यातून पाझरले तरी त्या लेकराला यातून बाहेर काढण्याची आई वडिलांची ही संघर्ष कथा तर मुलगा तन्मय याची या दुखण्यावर मात केलेली ही यशोगाथा आहे. तेच भाव या चित्रात रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे.

तसेच या पुस्तकात गव्हान्कुराचा उल्लेख प्रामुख्याने औषधाच्या रूपाने आला आहे. या चित्रातील चेहऱ्यावरील केस किंवा पदराचे काठ हे त्या गव्हांकुरासारखे दिसतात. तेच तिच्या डोक्यात आहेत आणि त्यानेच ते बाळ वाढतंय असेही वाचल्यानंतर चित्रातून प्रतीत होते.

खरोखर वाचण्यासारखी प्रेरणादायी अशी ही कादंबरी  किंवा जीवनकथा आहे.

त्यासाठी मुखपृष्ठ कार अरविंद शेलार, परिस पब्लिकेशन आणि सगळ्यात महत्वाचे लेखिका हेमलता तुषार सपकाळ यांचे मन:पूर्वक आभार.

200 पानांची ही कादंबरी 350 रुपये एवढे मूल्य आहे. आशा आहे आपण ही कादंबरी घेऊन वाचालच पण एक प्रेरणादायी कथा म्हणून ती इतरांना पण भेट द्याल.

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments