सुश्री वर्षा बालगोपाल
बोलकी मुखपृष्ठे
☆ “सांजधून” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆
सूर्य अस्ताला चालला आहे. सर्वत्र केशरी संधीप्रकाश पसरला आहे. तेच प्रतिबिंब जलात असून जलकाठावर असलेल्या एका झाडावरून एक पक्षी ओरडत आहे. असे एक साधारण संध्याकाळचे चित्र.
त्यावरील शिर्षक सांजधून हे तो पक्षी ओरडत नसून एक धून गात आहे असे सुचवते.
मन सांजेप्रमाणे विभोर होते आणि मनात संध्या समयीची हुरहूर जाणवते.
साधारण संध्याकाळ झाली की देवघरात दिवा लावतात. तसाच सृष्टीच्या घरातील क्षितिजावरील देवघरात हा संध्यादीप कोणी लावला आहे असा विचार मनात येतो.
संध्याकाळ जाऊन आता अंधार पडणार आहे ती कातरता नकळत मनाला जाणवते. तशीच ती ढगांच्या कडेवरही जाणवते.
मग उगचच तो पक्षी चकोर पक्षी आहे आणि आता आकाशात चंद्र उगवेल म्हणून ते चांदणे प्यायला सज्ज होऊन चोच उघडून बसला आहे असे वाटते.
सूर्यबिंब हे अस्ताला गेले तरी चराचर जागृत राहणार आहे हे झाडाच्या आणि पक्षाच्या छबीतून समजते.
एका दिवसाची कहाणी संपत असली तरी मनात उद्याची आशा देणारी छान स्वप्नांची रजनी प्रदान करणारी अशी संध्याकाळ वाटते.
भगवेपणामुळे सन्यस्त योग्या प्रमाणे वाटणारा सूर्य मनाला धीरगंभीरताही प्रदान करतो.
असे संध्याकाळचे अनेक अर्थ सांगणारे हे चित्र आहे.
पण सरळ सरळ असे वाटणारे चित्र जरा वेगळ्या दृष्टीने पाहिले तर हे एक सांकेतिक अर्थ सांगणारे चित्र वाटते. सगळ्यांनाच हे माहित आहे की शिवाजी महाराजांनी सोन्याच्या नांगराने भूमी नांगरली होती. मग त्या सोन्याच्या स्पर्शाने सगळी भूमी सोन्याची झाल्यासारखी वाटून त्या भूमीवर येणाऱ्या झाडांना सोन्याची फळे येतील ही ग्वाही तो पक्षीही सकलांना देत आहे.
म्हणूनच की काय पण शिवाजी महाराजांनी फडकवलेली ही भगवी पताका रोज आपण विसरलो तरी निसर्ग विसरत नाही आणि नेमाने ही पताका फडकवतो असे वाटते.
गुढार्थ बघितला तर कोणी सन्यस्त योगी सूर्य रूपाने येणार तो जाणार असे शिकवून आता जो क्षण लाभला आहे तो आनंदाने जगून घ्या सन्मार्गी लावा असा संदेश देत आहे.
पुस्तकाच्या अंतरंगात डोकावले की कळते हे श्री मोहनलाल वर्मा यांच्या हिंदी भाव कथानचा मराठी अनुवाद आहे. मग असे वाटले हे त्या भाव कथानंमधील वेगवेगळे भावरंग दाखवून सुरेखशी संध्याकाळ स्वतः एक सांजधून गात आहे.
खरच वेगवेगळ्या कथामधील वेगवेगळे भाव पण एकाच मनात दाटणारे असे एकाच चित्रात दाखवणारे हे चित्र वरवर पाहाता अगदी साधे वाटते पण खूप सारे भाव जगवणारे आहे.
इतके छान मुखपृष्ठ चित्र देणाऱ्या श्री अन्वर पट्टेकरी, प्रकाशक पराग लोणकर :-प्रियांजली प्रकाशन आणि लेखिका सौ उज्ज्वला केळकर यांना खूप खूप धन्यवाद
© सुश्री वर्षा बालगोपाल
मो 9923400506
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈