सुश्री वर्षा बालगोपाल
बोलकी मुखपृष्ठे
☆ “प्रेम रंगे ऋतूसंगे” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆
एक गुलमोहराचे झाड… एक माणसाचा हात… आणि भोवतालची हिरवाई एवढेच चित्र….
त्याखाली ‘प्रेम रंगे ऋतुसंगे’ हे दिलेले शिर्षक…त्यावरून चित्राचे अवलोकन केले जाते.
मग किती यथार्थ चित्र काढलेले आहे!या विचारांमध्ये चित्र बारकाईने बघितले असता,त्यातील एक एक पैलू जाणवत जातात.
प्रथमत: जाणवतो, गुलमोहराच्या झाडाच्या फांदीला झालेला मानवी हाताचा स्पर्श ; त्यातून चितारलेले मानवाचे काळीज… त्यात लपलेली हिरवी प्रेमाची भावना… यामुळेच निसर्गाचे मानवाशी किती अद्वैत साधलेले आहे हे उत्कृष्ट पद्धतीने दाखवले आहे.
विचार करता असे भासते, गुलमोहराचे खोड हे मोराच्या माने सारखे…म्हणजे मोरच आहे. मोर म्हटल्यावर ‘पावसाळा’….
गुलमोहराची डवरलेली फुले म्हणजे… ग्रीष्म,अर्थात ‘उन्हाळा’….
मानवी हाताने साधलेल्या… बदामी आकारातील हिरवट रंग आणि भोवताली पण त्याच छटेची हिरवाई…म्हणजे जणू लपेटलेली शाल… अर्थात ‘हिवाळा’…
अशा तीनही ऋतुंमध्ये काळजाचे निसर्गाशी एकरूप झालेले प्रेम… अखंड झरत आहे…पाझरत आहे हे जाणवते…
थोडा वेगळा विचार करता, असे जाणवते… निसर्ग हा आपोआप फुलत असतोच, आपले काम चोख करत असतोच, पण याच निसर्गाला, मानवाने थोडा हातभार लावला तर… निसर्गाचे संवर्धन तर होईलच, पण मानवाच्या मनात आणि निसर्गाच्या काळजात आपोआप प्रेम उत्पन्न होणारच. ही सहजता माणसाला निसर्गापासून मिळेल,आणि सगळीकडे प्रेमच प्रेम असेल, दिसेल, फुलेल, बहरेल…
इतकेच नाही तर… प्रेमाची व्यापकता ही पंचमहाभुते सामावून घेण्याची असते. हे सांगण्यासाठी धरती म्हणजे ‘पृथ्वी’, झाडाच्या मागून पाण्याचा आलेला ओहोळ म्हणजे ‘आप’, वातावरणातील जाणवणारा तजेला म्हणजे ‘तेज’, पक्षी, पानांची जाणवणारी सळसळ म्हणजे ‘वायू’, वर दिसणारे ‘आकाश’… ही सगळी पंचमहाभुते… मानवाच्या हृदयात बंदिस्त असताना, त्यात वसलेलं प्रेम ओसंडतंय असा भास होतो.
सगळ्यात महत्वाचा एक संदेश हे चित्र आपल्याला देत आहे असे वाटते. तो संदेश म्हणजे… प्रत्येकाने एक झाड लावून त्याचे संगोपन केले तर, त्या प्रत्येक हातामुळे झाडाच्या काळजात उत्पन्न झालेले प्रेम…हातांना कधीच विसरणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने किमान एका झाडाचे संगोपन करणे,ही आजच्या निसर्गाची गरज आहे. ती प्रत्येकाने ओळखून आपले निसर्गाप्रतीचे प्रेम व्यक्त करावे आणि निसर्गालाही तुमच्यावर प्रेम करताना… तुमचा प्राणवायू होण्याची, तुम्हाला आरोग्य देण्याची, तुम्हाला सावली देण्याची, तुम्हाला फळे देण्याची, तुम्हाला फुले देऊन,मन प्रसन्न करण्याची,संधी द्यावी.
जणू झाड म्हणत आहे,
थोडे द्यावे, थोडे घ्यावे, तेव्हा प्रेम फुले…
जीवाचा जिवलग तेथे झुले.
सुहास रघुनाथ पंडित यांनी लिहिलेल्या निसर्ग आणि प्रेम यावरील 66 कवितांचा हा संग्रह…त्या लिखाणाला तादात्म्य साधणारे हे चित्र… अशा एका गोड संगमातूनही प्रेम निर्माण करते.
इतके छान मुखपृष्ठ तयार केले…म्हणून सांगलीच्या सुमेध कुलकर्णी यांना, तसेच अक्षरदीप प्रकाशन यांना,आणि कवी सुहास पंडित यांना,याच चित्राची निवड केली म्हणून खूप खूप धन्यवाद
आशा आहे ज्या पुस्तकाचे मुखपृष्ठ इतके बोलके आहे, तो संग्रह वाचण्याची उत्सुकता लागून आपण घेऊन नक्कीच वाचाल.
© सुश्री वर्षा बालगोपाल
मो 9923400506
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈