श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ विचार तर कराल ? ☆ श्री सुनील देशपांडे

आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो.त्यामुळे आपण कोण आहोत हे दुसर्यांना सांगण्याची गरज नाही, फक्त चांगले कर्म करत रहा.

वरील मजकूर मला व्हाट्सअप वर आला होता. अशा प्रकारचे सुविचार अनेक येतात.  या सारख्या बऱ्याच गोष्टींबद्दल सविस्तरपणे सांगावेसे वाटते. वस्तुतः चंदनाचे झाड हे लक्षात येत नाही.  गावाकडे आमच्या बागेत काही चंदनाची झाडे उगवली होती. परंतु आम्हाला ती झाडे चंदनाची आहेत हे समजलेच नव्हते. कोणीतरी आम्हाला हे झाड चंदनाचे आहे हे सांगितले तेव्हा समजले. झाडे थोडी मोठी झाल्यावर त्याचा गवगवा होऊन चोरीला जाण्याची शक्यता कोणीतरी व्यक्त केली म्हणून गावाकडच्यांनी ती विकून टाकली. घरात चंदनाचे खोड असेल तर घरात त्याचा सुगंध पसरलेला आम्ही तरी कधी अनुभवला नाही. पूर्वी पूजेसाठी चंदनाचे खोड प्रत्येकाच्या घरी असायचं. चंदनाचे खोड जेव्हा उगाळले जाते तेव्हा त्यातून सुगंध पसरतो त्यामुळे चंदनाला, कुणीतरी हे चंदन आहे हे सांगावेच लागते. आमच्या गावाकडचे घर विकल्यानंतर तेथील सामान देऊन टाकणे व  विकून टाकणे ही प्रोसेस चालू असताना चंदनाचे खोड हे वेस्टेज मध्ये टाकले गेले होते. कोणीतरी हे चंदनाचे खोड आहे म्हणून उचलून आणले.  हिरा सुद्धा पैलू पाडल्याशिवाय हिरा आहे हे कुणालाही समजत नाही. तसे पाहता पैलू पाडल्यानंतर सुद्धा खरा हिरा आणि खोटा हिरा हे कोणाला समजते? 

हिरा ठेविता ऐरणी, वाजे मारिता जो घणी, तोचि मोल पावे खरा, करणीचा होय चुरा. असे तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितले आहे.  त्यामुळे अज्ञानी किंवा फारसा विचार न करणाऱ्या लोकांना एखादा चुकीचा मुद्दा सुद्धा पटवून देण्यासाठी अशा प्रकारच्या चुकीच्या मजकुरांचा किंवा चुकीच्या दृष्टांतांचा उपयोग केला जातो.  लोकांना आपला मुद्दा पटवून देण्यासाठी दृष्टांतांची परंपरा कीर्तनकारांनी फार पूर्वीपासून आपल्या समाजात रुजवली आहे. कीर्तनकाराला स्वतःचा मुद्दा पटवून देण्यासाठी काही दृष्टांत द्यावयाचे असतात. परंतु ते दृष्टांत किती योग्य आहेत याचा विचार केला जात नाही. फारसा विचार न करणाऱ्या लोकांसमोर अशा दृष्टांतांचा उपयोग होतो.‌ सध्या व्हाट्सअप वर असे दृष्टांत देऊन एखादी चुकीची गोष्ट सुद्धा पटवून देण्याची स्पर्धा लागलेली आहे. त्यामुळे कोणतेही उदाहरण किंवा दृष्टांत याबाबत आपण सजग पणे आणि विचारपूर्वक पाहिले पाहिजे. 

कुणीतरी गुड मॉर्निंग साठी असे काहीही सुविचार व्यावसायिकपणे तयार करून पाठवतात. ज्याला खरोखरीचा तर्क लावून तपासून पाहिले तर तो विचार योग्य आहे असे वाटत नाही.  परंतु कट पेस्ट संस्कृती आणि आलेले फॉरवर्ड करा विचार करू नका. या प्रवृत्तीमुळे अनेक चुकीचे नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी आपला उपयोग काही लोक करून घेतात. त्यामुळे अविचाराने फॉरवर्ड करणे किंवा आला मजकूर की कट पेस्ट करणे ही सवय चांगली नाही. या गोष्टी शक्यतो टाळाव्यात जी गोष्ट विचारपूर्वक आपल्याला पटली असेल, विचारपूर्वक म्हणजे खरोखरच त्यावर विचार करून मान्य झाली असेल तरच ती पुढे पाठवावी. ही सवय स्वतःच्या अंगी बाणवण्याचा प्रयत्न मी सुरू केला आहे. आपणही सर्वांनी अशा पद्धतीने करावे आणि दुसऱ्याचा विचार फॉरवर्ड करण्यापेक्षा जे फॉरवर्ड कराल तो तुमचा विचार असला पाहिजे. निदान तुम्हाला सर्वतोपरी विचार करून पटलेला तरी असला पाहिजे.  तो मान्य  असला पाहिजे.  ‘फॉरवर्ड ॲज रिसिव्हड’ अशा पद्धतीने करणे टाळावे, नव्हे, करूच नये!

पहा जमते का? आपण सर्वच हे जमवूया.  अर्थात आपणास विचार करायची सवय असेल तर! नसेल तर लावून घ्यायला काही हरकत आहे का? सुशिक्षित आहात ना? शिक्षित नसला तरी सुविचारी तरी आहात ना? करा करा ..  प्रयत्न करा माझ्याबरोबर ! 

© श्री सुनील देशपांडे.

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments