डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ जगात भारी…. आम्ही भिक्षेकरी…!!! – भाग-२ ☆ डॉ अभिजीत सोनवणे

(हो आम्ही टोमणे छातीवर घेऊन मिरवतो…. 🙂 – इथून पुढे 

तर; लक्ष्मी रोड / टिळक रोड किंवा इतर खरेदीच्या ठिकाणी आपले हे लोक गळ्यात आपण दिलेली हि पाटी अडकवून फिरतील आणि ज्यांच्या हातात प्लास्टिकची पिशवी आहे, अशा सर्वांना आपले हे लोक, आपली कापडी पिशवी त्यांना Get Well Soon म्हणत देतील…! (सिनेमा ने आपल्याला हा एक लय भारी शब्द दिला आहे)

जे आपले लोक रस्त्यावर अशा मोफत पिशव्या देतील, त्या प्रत्येकाला आपण एका पिशवी मागे पाच रुपये देणार आहोत,  म्हणजे एखाद्या व्यक्तीने शंभर पिशव्या वाटल्या तर त्यालाही पाचशे रुपये मिळतील… 

आपले लोक पिशव्या देतात की नाही….  

हे बघण्यासाठी मी आपल्या इतर 4 – 5 लोकांना (जे सध्या इमाने इतबारे भीक मागतात अशांना)  गुपचूप नजर ठेवण्यास सांगणार आहे…  त्यांनाही त्या बदल्यात दोन रुपये प्रति पिशवी देणार आहोत…. 

म्हणजे एखाद्याने शंभर पिशव्या दिल्या तर नजर ठेवणाऱ्या व्यक्तीला आपोआप दोनशे रुपये मिळतील…

ज्या माझ्या लोकांना आपण पिशव्या वाटायला देणार आहोत ते अत्यंत विश्वासू आहेत, त्यांच्यावर खरंतर कोणीही नजर ठेवण्याची गरज नाही…. 

पण, दारू पिणाऱ्या माणसाला दारूचे दुकान बघितलं की दारूची आठवण येते… तसंच भीक मागण्याच्या काही जागा फिक्स असतात, त्या जागी गेल्यानंतर भीक मागण्याची इच्छा आपोआप होते…. 

आणि म्हणून नजर ठेवण्याच्या निमित्ताने / बहाण्याने इतर चार-पाच जणांना भीक मागण्याच्या जागेतून  त्यांच्याही नकळत बाहेर काढता येईल. इथे आपण माणसाच्या स्वभावाचा वापर करून घेणार आहोत. 

आता बरेच लोक मला असे म्हणतील…. फुकट कशाला द्यायच्या आपल्या पिशव्या??? 

परंतु हि एक बिझनेस ट्रिक आहे, आधी फुकट द्यायचं…. सवय लावायची…. आणि त्यानंतर तीच गोष्ट दामदुपटीने विकायची… ! (अधिक माहितीसाठी मागील पाच वर्षातील स्वतःच्या घरातील वर्तमानपत्रे स्वतः चाळावीत, सर्वच माहिती देण्याचा आम्ही काही मक्ता घेतलेला नाही. ताजा कलम : पाच रुपये किलो हिशोबाने आपण वर्तमानपत्रे अगोदरच रद्दीत विकली असतील तर त्याला आम्ही जबाबदार नाही) 

बापरे… चुकून एक टोमणा मारला गेला की…. सवय हो सवय…. दुसरं काय…. ? 

तर, अनेक लोक स्वतःचे पोट भरण्यासाठी हि बिझनेस ट्रिक वापरतात…. आपण दुसऱ्याचे पोट भरण्यासाठी, दुसऱ्या एखाद्याला जगवण्यासाठी जर हि ट्रिक वापरली तर त्यात गैर काय…? 

विचार करा…. इतक्या साध्या गोष्टीमुळे किती कुटुंबं उभी राहतील ? रस्त्यावरचे  किती भिक्षेकरी कमी होतील ?? आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे प्लास्टिकचा वापर किती कमी होईल ??? 

पिशव्या शिवणारे, विकणारे आणि नजर ठेवणारे यांना यातून पैसे मिळतील हा एक भाग आहेच…  

सर्वात महत्त्वाचं म्हणजे, या सर्व गोष्टींमुळे भीक मागण्यापासून आपण त्यांना विचलित करणार आहोत… हे सर्व करत असताना, नुसते फिरायचे त्यांना पैसे मिळत असतील, भीक मागायच्या जागेवर जर ते थांबणार नसतील…. तर त्यांना भीक मागायची आठवण तरी राहील का…. ??? 

रडणाऱ्या लहान मुलाच्या हातात एखादं खेळणं देऊन त्याचं लक्ष विचलित करून त्याला शांत करणं… जगातल्या प्रत्येक आई आणि बापाने हेच आजवर केलं आहे…. 

(हल्ली रडणाऱ्या बाळाच्या हातात आई मोबाईल फोन देते तो भाग वेगळा, बाळ शांत झालं की मग कसं शांततेत फेसबुक, इन्स्टा वगैरे पाहता येतं 

असो, तीच संकल्पना आपण इथे राबवण्याचा प्रयत्न करत आहोत. ! तेच साधं सोपं गणित वापरण्याचा इथे प्रयत्न आपण करत आहोत…. 

शिवाय फुकट देऊन सुद्धा, “चीत भी हमारी पट भी हमारी”…. !!! 

४.  यानंतर पुण्यातले मोठे मॉल, दुकानदार यांना मी स्वतः भेटेन…  हात जोडून त्यांना आपल्या पिशव्या विकत घ्यायची विनंती करेन. यातून जो पैसा मिळेल तो  पिशव्या शिवणाऱ्या, विकणाऱ्या आणि नजर ठेवणाऱ्या व्यक्तींना आपण परत करू. 

यानंतर मला माहित आहे…. 

आता आपला प्रश्न येईल, आम्ही यात काय मदत करू शकतो… ???

१. तर, पहिली गोष्ट म्हणजे प्लास्टिकची पिशवी वापरणे बंद करा माय बाप हो…..आणि स्वतःच्या घरातील कापडी पिशवी वापरा; नसेल तर आमच्याकडे मागा. आम्ही ती तुम्हाला पाठवू “चकटफू”…!!! 

२. एक फूट उंच, अर्धा फूट रुंद अशा आकाराच्या पिशव्या शिवता येतील असे कापड आपण आम्हाला देऊ शकता. उदा.जुनी ओढणी, जुनी साडी, मांजरपाटाचे किंवा तत्सम कापड इत्यादी…. (अंगडी टोपडी, फाटके बनियन, विरलेले रुमाल, तसेच घरात जुने शर्ट पॅन्ट पडलेच आहेत तर देऊन टाकू….  असे टाकाऊ कपडे इत्यादी गोष्टी देऊ नयेत… वितभर कपड्यापासून हातभर पिशवी तयार करायला आमचे पितामह काही स्वर्गातून ट्रेनिंग घेऊन आलेले नाहीत…  )

नाही म्हणता म्हणता, अजून एक टोमणा गेलाच की राव चुकून…. ! 

जाऊ द्या…. 

३. आपल्या परिसरातील दुकानदार / मॉल यांना आमच्या वतीने या पिशव्या कमीत कमी किंमतीत विकत घ्यायला विनंती करू शकता. यालाही ते तयार नसतील तर आम्ही त्यांना Get well soon म्हणत फुकट पिशव्या पाठवू…. 

प्लास्टिकचा वापर कमी करणे आणि भिक्षेकर्‍यांचे लक्ष विचलित करणे हा आमचा मूळ हेतू आहे, यातून कोणताही व्यवसाय करण्याचा हेतू नाही…! 

४. माझ्याकडे जमा होत असलेल्या देणगीचा विचार करून मी सुरुवातीला साधारण दहा ते बारा लोकांना अशा प्रकारे काम देऊ शकतो. पण भीक मागणाऱ्या जास्तीत जास्त लोकांना यात सहभागी करून, त्यांना मानधन मिळावे, प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णतः बंद व्हावा…. हा प्रकल्प आणखी मोठ्या प्रमाणावर करता यावा…. यासाठी आपण आम्हाला ऐच्छिक देणगी देऊ शकता. 

17 एप्रिल माझा वाढदिवस… याच दिवशी श्रीराम नवमी होती…. याच दिवसाच्या मध्यरात्री मला हि संकल्पना सुचली…. योगायोग म्हणायचा की आणखी काही ? मलाही कळत नाही….! 

आपण कुणीही श्रीराम बनू शकत नाही…. पण आपल्या जवळ असणारे “भात्यातले बाण” आपण समाजासाठी “रामबाण” म्हणून तर नक्कीच वापरू शकतो… 

बघा पटतंय का… ??? 

माझ्या वाढदिवसा दिवशी मला सुचलेली ही संकल्पना… ! 

यामुळे थोड्या प्रमाणात का होईना, परंतु प्लास्टिकचा वापर कमी होईल, त्यामुळे निष्पाप प्राण्यांचे प्राण वाचू शकतील, अनेक सामाजिक आणि वैद्यकीय धोके थोड्या तरी प्रमाणात कमी होतील… माझे भीक मागणारे किमान दहा ते बारा लोक पहिल्या फटक्यातच भिकेतुन बाहेर पडतील… 

“भिक्षेकरी”  म्हणून नाही…. तर “कष्टकरी” होऊन; ‘गावकरी” म्हणून जगण्याकडे ते एक पाऊल टाकतील…! 

वाढदिवसाचं इतकं मोठं गिफ्ट या अगोदर मला कधीही मिळालं नव्हतं…!!! 

आयुष्यभर ऋणात राहीन मी या गिफ्टच्या….!!!

– समाप्त – 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments