श्री मोहन निमोणकर 

??

☆ “सज्जनगडावरील प्रसादाची खीर!” – लेखक : डॉ. वीरेंद्र ताटके ☆ श्री मोहन निमोणकर

सज्जनगडावर भोजनप्रसादात मिळणारी गव्हाची खीर हा पीएचडीचा विषय होऊ शकतो. गेल्या शेकडो वर्षात गडावरील रामदासी लोक बदलले, त्यांची खीर करायची पद्धत देखील इतक्या वर्षांमधये   बदलली असेल पण खिरीची चव मात्र जैसे तैशीच ! 

लहानपणी गडावर जाण्याचे मुख्य आकर्षण असायचे ते या खिरीचे….. आणि आता वयाने मोठं झाल्यावर…. खोटं कशाला बोलायचं…. आजही त्या खिरीचे आकर्षण तेवढेच आहे. काहीजण या खिरीला लापशी म्हणतात परंतु ‘खीर’ या शब्दात जो जिव्हाळा आहे तो ‘लापशी’ या शब्दात नाही.

भोजनप्रसादात या खिरीचे आगमन होण्यासाठी मोठी वाट पाहावी लागते. आधी प्रसादाच्या रांगेत उभे राहून आतून येणाऱ्या  सुगंधावरून आज पानात  भातासोबत फक्त  आमटी आहे की एखादी भाजी सुद्धा आहे याचा अंदाज लावायचा… त्यानंतर थोड्या वेळाने ताटं-वाट्यांचा आवाज येतो.  नंतर भोजनगृहात प्रवेश मिळाला की नामस्मरण झालं की सर्वप्रथम भात -आमटी मीठ, चटणी यांचे पानात आगमन होतं….. आणि मग  खरपूस सुगंधाचा सांगावा आधी पाठवत त्यानंतर त्या बहुचर्चित खिरीच्या बादल्यांचे आगमन होते….. पण सांभाळून…. डेक्कन एक्सप्रेसच्या वेगाने तुमच्याकडे येणारी खीर तुमच्या पानापर्यंत पोहचण्याआधी भात आमटी संपवून ताट चकचकीत करायचं कसब तुमच्याकडे हवं.  भोजन-प्रसादाला नियमित येणाऱ्या बंधू-भगिनींना हे अंगवळणी पडलेलं असतं.

अर्थात हा भोजनप्रसाद घेणारा मनुष्य सुद्धा चांगला बलदंड असला पाहिजे. उगाच ‘नको-नको ‘ म्हणणारा ( आदरणीय मकरंद बुवांच्या शब्दात -‘कायमचूर्णवाला’ ) नको. त्यासाठी  पंगतीच्या त्या टोकाला खिरीने गच्च भरलेली बादली घेतलेले काका  दिसले की त्यांच्या वाढण्याच्या वेगाचा अंदाज घेऊन ते आपल्यापर्यंत पोहचण्याआधी आपल्या पानातील खीर संपविण्याचा वेग पाहिजे. टाईमपास करत – गप्पा मारत प्रसाद घेणाऱ्याचे हे कामच नाही.

काही गृहिणी म्हणतात की आम्ही आमच्या घरी सुद्धा अशी खीर करतो पण  तुम्ही  गडावर मिळते तशी  खीर  घरी करून दाखवली तर मी कसलीही पैज हरायला तयार आहे. मुळात रेसिपीची पुस्तके वाचून – “अमुक एवढा गुळ, अमुक एवढे पाणी, तमुक मुठी गहू, मंद आचेवर  इतका  वेळ  ठेवावी ” असली वाक्ये वाचून करण्याचा हा पदार्थच नाही.

गडावर मिळणारी खीर ही ‘रेसिपी’ नसते तर ‘प्रसाद’ असतो. त्यात भिक्षाफेरीत रामदासी मंडळींनी दारोदारी अनवाणी जाऊन, मनाच्या श्लोकांचा जागर करत गोळा केलेला आणि  असंख्य भक्तांनी प्रेमाने दिलेला  शिधा असतो, गडाच्या पायथ्यापासून घाम गाळत गव्हाची पोती गडावर पोहचविणाऱ्या सेवेकऱ्यांचे श्रम असतात, जमा झालेले गहू निवडून-पाखडून, त्याला ऊन  दाखवून वर्षभर जपून ठेवणाऱ्या माता-भगिनींचे कष्ट असतात.

या सर्वांसोबत मला सर्वाधिक आश्चर्य वाटतं ते भोजनप्रसादाची खीर  तयार करणाऱ्या बल्लवाचार्य मंडळींचे !  प्रसादाला नक्की किती लोक आहेत हे पहिली पंगत बसेपर्यंत सांगता येत नाही. तरीही आलेल्या सर्वांना पुरेल एवढी आणि नेमकी त्याच चवीची खीर रोज तयार करायची. या सेवकांच्या या  ‘स्कील’पुढे  तर नतमस्तकच व्हावेसे वाटते. (आपल्या घरी एखादा पाहूणा अचानक आला तर जेवणासाठी आपली किती तारांबळ उडते याची आपल्याला सर्वांना कल्पना आहे).

आदर्श दिवसाची कल्पना काय असं विचारलं तर मी उत्तर देईन, ” सकाळी प्रसादापूर्वी गडावर पोहचावे.  रामराया, मारुतीराय, समर्थ, परमपूज्य श्रीधर स्वामी  यांचे दर्शन घेऊन प्रसादाच्या रांगेत वेळेत उभे राहावे, भोजनप्रसादात खिरीची बादली आपल्यापुढे तीन-चार वेळा यावी आणि त्यावेळी आपले पान चकचकीत असावे, भोजनप्रसादानंतर थोडा वेळ कलंडून दुपारचा चहा घेऊन धाब्याच्या मारुतीचे दर्शन घेऊन यावे. सायंउपासनेला, दासबोध-वाचनाला हजर रहावे. शेजारती झाल्यानंतर रात्रीच्या पंगतीला पिठलं-भातासोबत  पुन्हा एकदा सकाळची मुरलेली खीर असावी  आणि त्यानंतर मुक्कामाला खोली मिळालेली असावी…… सगळं जग विसरून जाण्यासाठी यापेक्षा अधिक काय हवं ?

लेखक :  डॉ वीरेंद्र ताटके 

पुणे, ९२२५५११६७४ 

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments