सौ राधिका भांडारकर

??

☆ माझे आजोळ… भाग – १ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

का. रा. केदारी.

ईश्वरदास मॅन्शन, बी ब्लॉक, पहिला मजला, नाना चौक, ग्रँट रोड, मुंबई.

हे माझे आजोळ.

वास्तविक आजोळ हा शब्द उच्चारला की नजरेसमोर येतं एक लहानसं, टुमदार  गाव.  झुळझुळणारी नदी, दूरवर पसरलेले डोंगर,  हिरवे माळरान,  कौलारू,  चौसोपी,  ओसरी असलेलं घर. ओटीवरचा पितळी कड्यांचा,  शिसवी पाटाचा झोपाळा, अंगणातलं पार असलेलं बकुळीचं किंवा छान सावली देणार झाड.  सुट्टीत आजोळी जमलेली सारी नातवंडं.  प्रचंड दंगामस्ती,  सूर पारंब्यासारखे खेळ आणि स्वयंपाक घरात शिजणारा  सुगंधी पारंपारिक स्वयंपाक.

हो की नाही?

पण माझे आजोळ असे नव्हते. ते मुंबई सारख्या महानगरीत, धनवान लोकांच्या वस्तीत, अद्ययावत पारसी पद्धतीच्या सदनिका असलेल्या देखण्या प्रशस्त सहा मजली इमारतीत होतं.  गुळगुळीत डांबरी रस्त्यांवर बसेस, काळ्या—पिवळ्या टॅक्स्या, ट्राम्स अविरत धावत असत. अंगण नव्हतं. सदनिकेच्या मागच्या बाजूला फरशी लावलेली मोकळी जागा होती.  तिथेच काही आऊट हाऊसेस, आणि सदनिकेत राहणाऱ्या धनवान लोकांच्या गाड्या ठेवण्यासाठी गॅरेजेस होती. 

त्या मोकळ्या जागेत ईश्वरदास मॅन्शन मधली मुलं मात्र थप्पा, आंधळी कोशिंबीर,डबा ऐसपैस, लगोरी,  लंगडी, खो खो असे दमदार खेळ खेळत. यात काही मराठी मुलं होती पण बरीचशी मारवाडी आणि गुजराथी होती. ही सारी मुलं मुंबईसारख्या महानगरीत शहरी वातावरणात वाढत होती.  विचार करा. त्यावेळी ही मुलं सेंट  कोलंबस अथवा डॉन बॉस्को सारख्या इंग्रजी माध्यम असलेल्या नामांकित शाळेत शिकत होती. फाडफाड इंग्लिशमध्ये  बोलायचे सारे.

मी ठाण्याची. माझा घरचा  पत्ता – धोबी आळी, शा.मा. रोड, टेंभी नाका ठाणे.

पत्त्यावरूनच कुटुंब ओळखावे. साधे, बाळबोध पण साहित्यिक वातावरणात वाढत असलेली, नगरपालिकेच्या बारा नंबर शाळेत,  मराठी माध्यमातून शिक्षण घेत असलेली मी.  सुट्टीत आईबरोबर आईच्या वडिलांकडे म्हणजे आजोबांकडे त्यांच्या पाश्चिमात्य थाटाच्या घरी जायला आम्ही उत्सुक असायचो.

माझ्या आजोळीच्या आठवणी वयाच्या पाच सहा वर्षापासूनच्या अजून पक्क्या आहेत. आजोळ  म्हणजे आजी आजोबांचं घर. आजीचा सहवास फार लाभला नाही. तरीही कपाळी ठसठशीत कुंकू लावणारी, कानात हिऱ्याच्या कुड्या आणि गळ्यात हिऱ्याचं मंगळसूत्र मिरवणारी,  इंदुरी काठ पदराची साडी नेसणारी,प्रसन्नमुखी  मम्मी अंधुक आठवते. ती मला “बाबुराव” म्हणायची तेही आठवतं. पण ती लवकर गेली.

वयाच्या पस्तीस—चाळीस  वर्षांपर्यंत म्हणजे आजोबा असेपर्यंत मी आजोळी जात होते.  खूप आठवणी आहेत.  माझ्या आठवणीतलं आजोळ, खरं सांगू का? दोन भागात विभागलेलं  आहे. बाळपणीचं आजोळ आणि नंतर मोठी झाल्यावरचं, जाणतेपणातलं आजोळ.

वार्षिक परीक्षा संपली की निकाल लागेपर्यंत आई आम्हाला आजोबांकडे घेऊन जायची. मी, माझ्या बहिणी आणि आई.  वडील आम्हाला व्हिक्टोरिया टर्मिनसला सोडायचे. आताचे छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानक. तेव्हा व्हीटी म्हणून प्रसिद्ध होतं. ठाणा स्टेशन ते व्हीटी हा प्रवासही मजेदार असायचा. व्हीटीला उतरलं  की सारा भव्यपणा सुरू व्हायचा. समोर महानगरपालिकेची इमारत.  तिथे आम्हाला घ्यायला आलेली आजोबांची मरून कलरची, रुबाबदार रोव्हर गाडी उभी असायची  पण त्यापूर्वीचा, व्हीटीला उतरल्यावर पप्पांच्या आग्रहास्तव प्राशन केलेल्या थंडगार निरेचा अनुभवही  फारच आनंददायी असायचा. 

आजोबांकडे मावशी आणि माझी मावस भावंडंही आलेली असायची, रंजन, अशोक,  अतुल आणि संध्या.  संध्या मात्र जन्मल्यापासून आजी-आजोबांजवळच राहायची.  सेंट कोलंबस मधली विद्यार्थिनी म्हणून तिच्याबद्दल मला खूपच आकर्षण होतं.  आम्ही सुट्टीत तिथे गेलो की तिलाही खूप आनंद व्हायचा. महिनाभर एकत्र राहायचं, खेळायचं, उंडरायचं, खायचं,  मज्जा करायची. धम्माल! 

धमाल तर होतीच.  पण?  हा पण जरा मोठा होता बरं का. माझे आजोबा गोरेपान, उंचताड, सडसडीत बांध्याचे. अतिशय शिस्तप्रिय. बँक ऑफ इंडियात  ते मोठ्या हुद्द्यावर होते. त्यावेळी बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले नव्हते. ब्रिटिशकालीन शिस्तीत त्यावेळी कार्यालयीन कामं चालत. आणि त्या संस्कृतीत माझ्या आजोबांची कर्मचारी म्हणून जडणघडण झाली होती. त्यांची राहणी, आचार विचार सारेच पाश्चिमात्य पद्धतीचे  होते. त्यावेळी आजोबांकडे वेस्टर्न टॉयलेट्स, बॉम्बे पाईप गॅस, टेलिफोन, फ्रिज वगैरे होते. घर म्हणाल तर अत्यंत टापटीप,  स्वच्छ.  फर्निचरवर धुळीचा कण दिसणार नाही.  दिवाणखान्यात सुंदर काश्मिरी गालिचा अंथरलेला,  वॉशबेसीनवरचा  पांढरा स्वच्छ नॅपकिन टोकाला टोक जुळवून टांगलेला. निरनिराळ्या खोलीत असलेल्या काचेच्या कपाटात  सुरेख रचून ठेवलेल्या जगभरातल्या अनेक वस्तू. खिडक्यादारांना सुंदर पडदे,शयनगृहात गादीवर अंथरलेल्या विनासुरकुतीच्या स्वच्छ चादरी आणि असं बरंच काही. असं माझं आजोळ  सुंदरच होतं.

आता आठवत नाही पण आम्ही इतके सगळे जमल्यावरही आजोबांचं घर विस्कटायचं नाही का?

आम्ही कुणीच नसताना आणि आजी गेल्यानंतर त्या घरात आजोबा आणि त्यांची  निराधार बहीण म्हणजे आईची आत्या असे दोघेच राहायचे.. आत्याही तशीच शिस्तकठोर आणि टापटीपीची पण अतिशय चविष्ट स्वयंपाक करायची. आम्ही सारी भावंडं जमलो की तिलाही आनंद व्हायचा. सखाराम नावाचा एक रामागडी होता. दिवसभर तो आजोबा— आत्या साठी त्यांच्या शिस्तीत राबायचा. आमच्या येण्याने  त्यालाही खूप आनंद व्हायचा. तो आम्हा बहिणींसाठी गुलाबाची आणि चाफ्याची फुले आणायचा. 

आजोबा सकाळी दहा वाजता बँकेत जायचे. रामजी नावाचा ड्रायव्हर होता तो त्यांची बॅग घ्यायला वर यायचा. आजोबा संध्याकाळी सात वाजता समुद्रावर फेरफटका मारून  घरी परतायचे. म्हणजे दहा ते सात हा संपूर्ण वेळ आम्हा मुलांचा.  पत्ते, कॅरम! सागर गोटे आणि असे अनेक खेळ आम्ही खेळायचो. एकमेकांशी भांडणं, मारामाऱ्या एकी-बेकी सगळं असायचं.  आत्या रागवायची पण आजोबांना..ज्यांना आम्ही  भाई म्हणायचो, त्यांना जितके आम्ही घाबरायचो तितके तिला नव्हतो घाबरत. सात वाजेपर्यंत  विस्कटलेलं घर आम्ही अगदी युद्ध पातळीवर पुन्हा तसंच नीटनेटकं करून ठेवायचो.

एकदा एका  सुट्टीत मला आठवतंय, भाईंची शिवण्याची सुई माझ्या हातून तुटली.  तुम्हाला खोटं वाटेल पण तीस वर्षं भाई ती सुई वापरत होते. पेन्सिल, सुई यासारख्या किरकोळ वस्तू सुद्धा त्यांना इकडच्या तिकडे झालेल्या, हरवलेल्या,  मोडलेल्या चालत नसत. या पार्श्वभूमीवर सुई तुटण्याची ही बाब फार गंभीर होती.  पण रंजनने खाली वाण्याकडे जाऊन एक तशीच सुई आणली आणि त्याच जागी ठेवून दिली. सात वाजता भाईंची दारावर बेल वाजली आणि माझ्याच काय सगळ्या भावंडांच्या छातीत धडधड सुरू झाली. जो तो एकेका कोपऱ्यात जाऊन वाचन नाही तर काही करण्याचं नाटक करत होता. सुदैवाने भाईंच्या लक्षात न आल्यामुळे ते सुई प्रकरण तसंच मिटलं. पण आज जेव्हा मी विचार करते तेव्हा ‘आपण काहीतरी चुकीचे केले’ याची मला खूप रुखरुख वाटते.आपण आजोबांपासून हे लपवायला नको होतं.

 – क्रमशः भाग पहिला 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments