सौ राधिका भांडारकर
☆ माझे आजोळ… भाग – २ ☆ सौ राधिका भांडारकर ☆
(पण आज जेव्हा मी विचार करते तेव्हा ‘आपण काहीतरी चुकीचे केले’ याची मला खूप रुखरुख वाटते.आपण आजोबांपासून हे लपवायला नको होतं.) – इथून पुढे —
इतके सगळे जरी असले ना तरी भाई आमचे खूप लाड करायचे. शनिवारी— रविवारी दुपारी ते आमच्याबरोबर पत्ते खेळायचे. ‘झब्बु’ नावाचा खेळ आम्ही खेळायचो. त्यावेळी भाई आम्हाला खूप विनोदी किस्से सांगायचे. आम्हाला चिडवायचे, आमच्याबरोबर मोठमोठ्याने हसायचे. संध्याकाळी आम्हाला चौपाटीवर फिरायला घेऊन जायचे. बिर्ला क्रीडा केंद्रापासून थेट नरिमन पॉईंट पर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर पायी चालत जायचो. त्या वेळच्या मुंबईच्या समुद्राचे सौंदर्य काय वर्णू? त्या फेसाळत्या लाटा, तो थंडगार वारा, समोर धनवानांच्या सुंदर इमारती, रोषणाई असलेली दुकाने आणि अतिशय वेगात चालणारी दिमाखदार वाहनं. आजोबां बरोबरचा हा समुद्रावरचा पायी फिरण्याचा अनुभव अविस्मरणीय असायचा. या पायी फिरण्याचा काळातही भाई आम्हाला अनेक गोष्टी सांगायचे. वेळेचे महत्व, बचतीचे महत्त्व, शिस्त स्वच्छता यांचं महत्त्व वगैरे अनेक विषयावर ते बोलायचे. त्यांची मुख्य तीन तत्त्वे होती. पहिलं तत्व डी टी ए. म्हणजे डोंट ट्रस्ट एनीबडी.
दुसरं— टाईम इज मनी.
आणि तिसरं— इफ यू सेव्ह पेनी पाऊंड विल सेव्ह यु.
समुद्रावरून फिरून आल्यानंतर आम्हाला ते कधी जयहिंदचा आईस्क्रीम नाहीतर शेट्टीची भेळपुरी खायला न्यायचे. आम्ही साऱ्या नातवंडांनी सुट्टीत त्यांच्याबरोबर काश्मीर ते कन्याकुमारी असा भरपूर प्रवास केलाय. अनेक नाटकं, चित्रपट आम्ही सुट्टीमध्ये भाईंबरोबर पाहायचो. रात्री रेडिओ जवळ बसून एकत्र, आकाशवाणीवरून सादर होणारी नाटके, श्रुतिका ऐकायचो. फक्त एकच होतं या सगळ्या गंमतीच होत्या. तरीही यात भाईंची शिस्त आणि त्यांच्या आराखड्याप्रमाणे घडायला हवं असायचं. माझ्या बंडखोर मनाला ते जरा खटकायचं. मला वेगळंच आईस्क्रीम हवं असायचं. भाईंनी भेळपुरी मागवलेली असायची तर मला शेवपुरी खायची असायची. आता या आठवणी गंमतीच्या वाटतात.
मी कधी कधी आजोळी आले असताना पाठीमागच्या आवारात आऊट हाऊस मध्ये राहणाऱ्या नंदा नावाच्या मुलीशी खेळायला जायची. तिचं घर अंधारलेलं कोंदट होतं. घराच्या पुढच्या भागात तिच्या वडिलांचं पानबिडीचं दुकान होतं. विड्या त्यांच्या घरातच वळल्या जात. त्यामुळे तिच्या घरात एक तंबाखूचा उग्र वास असायचा. पण तरीही मला तिच्याकडे खूप आवडायचं. तिथे मी आणि नंदा मुक्तपणे खेळायचो. कधीकधी तर मी तिच्याकडे जेवायची सुद्धा. आम्ही दोघी गवालिया टॅंक वर फिरायला जायचो. मी परवानगीशिवाय जायची. नंदाला मात्र परवानगीची गरज वाटायची नाही. तिच्या घरात कसं मुक्त वाटायचं मला आणि हो तिच्याबरोबर मी, ती मडक्यातल्या पाण्यात बुडवून दिलेली चटकदार पाणीपुरीही खायची. माझ्यासाठी मात्र हा सारा चोरीचा मामला असायचा पण माझ्या आजोळच्या वास्तव्यातला तो माझा खरा आनंदही असायचा. तिथेच दुसऱ्या आऊट हाऊस मध्ये गुरखा राहायचा. त्याची घुंगट घातलेली बायको मला फार आवडायची. ती, माझे आणि नंदाचे खूप लाड करायची. तिच्या हातचे पराठे आणि लिंबाचं लोणचं! आठवून आताही माझ्या तोंडाला पाणी सुटतं.
पाठीमागच्या आवारात अनेक कामं चालायची. पापड वाळवणे, उखळीत लाल मिरच्यांचे तिखट कुटणे, धान्य वाळवणे, निवडणे वगैरे. ही सारी कामं सदनिकेतल्या लोकांचीच असायची पण ती करून देणारी आदिवासी माणसं असायची आणि त्यातही बायाच असायच्या. त्यांचं वागणं, बोलणं,काम करताना गाणं, त्यांनी घातलेले दागिने, कपडे यांचं मला फार अप्रूप वाटायचं. माझी त्यांच्याशी मैत्री व्हायची.अद्ययावत संस्कृतीतून बाहेर येऊन या लोकांच्यात मी रमायची.माझी भावंडं मला चिडवायची.पण माझ्यावर त्याचा काहीच परिणाम व्हायचा नाही.
निकालाच्या दोन दिवस आधी आम्ही भाईंना निरोप देऊन ठाण्याला परतायचचो. तेव्हा कळत नव्हतं आईच्या डोळ्यातल्या अश्रूंचं नातं. भाईही पाणावायचे. एवढा पहाडासारखा माणूस हळवा व्हायचा. अजूनही सांगते, तेव्हा माझ्या मनात फक्त ठाण्याला, आपल्या घरी परतण्याच्या विचाराचा आनंद मनात असायचा. या वाहणाऱ्या पाण्याचा अर्थ तेव्हा नाही कळायचा पण आता कळतो. आता त्या आठवणीनेही माझे डोळे गळू लागतात. लहानपण आणि मोठेपण यात हेच अंतर असतं.
ठाण्याच्या घरी आजी उंबरठ्यावर वाट पाहत असायची, तिने आमच्यासाठी माळ्यावर आंब्याच्या अढ्या पसरवलेल्या असायच्या. मी घरात शिरल्याबरोबर आजीला मिठी मारायची आणि म्हणायची,
“जीजी मला तुझ्या हातचा आक्खा आंबा खायचा आहे.”
‘आक्खा आंबा’ ही कल्पना खूप मजेदार आहे बरं का?
भाईंकडे असतानाही आम्ही खूप आंबे खाल्लेले असायचेच. पण खूप आणि मनमुराद यात फरक आहे ना? तिथे आंबे व्यवस्थित कापून एकेकाला वाटले जायचे. म्हणून हे आक्खा आंबा खाण्याचे सुख काय होतं हे कसं सांगू तुम्हाला?
आणखी एक —घरी आल्यावर जाणवायचं!
”अरे! इथे तर कायम आजी आपल्या सोबतच असते.” म्हणजे खरंतर आपलं हेच कायमचं आजोळ नाही का? पण एका आजोळा कडून दुसऱ्या भिन्न आजोळाकडे जाणाऱ्या प्रवासात मी जीवनातले विविध धडे शिकले. एक आजोळ मायेचं, उबदार. दुसरं शिस्तीचं, नियमांचं. या दोन भिन्न प्रकृतींनी माझं जीवन नेटकेपणानेच घडवलं. त्या आजोळाकडचे भाई खूप उशिरा कळले, उशिरा जाणवले.
आज पोस्टाच्या पाकिटावर व्यवस्थित पत्ता लिहितानाही भाईंची आठवण येते. कपड्यांच्या घड्या घालताना भाईंची शिकवण आठवते. मी माणसांना चाचपडत असते तेव्हा आठवतं, भाई म्हणायचे,” कुणाला घरात घेण्याच्या आधी त्याची परीक्षा घ्या. संपूर्ण विश्वास कुणावरही ठेवू नका.”
“वस्तूंच्या जागा बदलू नका” ही त्या आजोळची शिकवण आयुष्यभर निरनिराळ्या अर्थाने उपयोगी पडली. किती आणि काय काय लिहू? थांबते आता.
पण माझ्या आजोळी ज्यांनी माझी झोळी कधीच फाटू दिली नाही त्या सर्वांच्या स्मृतींना कृतज्ञतापूर्वक प्रणाम !
– समाप्त –
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
मो.९४२१५२३६६९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈