श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

तेरी मेरी कहानी…☆ श्री मंगेश मधुकर 

‘एक प्यार का नग़मा है, मौजों की रवानी है

ज़िंदगी और कुछ भी नहीं, 

तेरी मेरी कहानी है’

—-  गीतकार संतोष आनंद यांनी जगण्याचा सारीपाट या गाण्यात फार सुंदर मांडलाय.

जेव्हा जेव्हा हे गाणं ऐकतो, तेव्हा तेव्हा ते खोलवर भिडतं. आजपण तसंच झालं. 

 

…. रविवारी अचानक रेडियोवर हे गाणं लागलं अन मन गुंग झालं.

जगण्याचा सहज सोपा अर्थ सांगणारी रचना ऐकून  एकेक गोष्टी नजरेसमोर आल्या. 

कसं असतं ना माणसाचं जगणं, वेगवेगळं आयुष्य असलं तरी प्रत्येकाच्या जगण्याचा घटनाक्रम हा सारखाच .. 

सुरुवात जन्मापासून,– त्यावेळी होणारे लाड,कौतुक,मिळणारं प्रेम, – पूर्ण परावलंबी असलं तरी  फार मस्त असतं ते आयुष्य. त्या निरागस वयात स्वार्थाशिवाय काहीच कळत नाही. तेच बरं असतं.

अर्थात सगळ्यांच्याच नशिबी हे नसतं हे देखील तितकंच खरयं.

 

सरत्या दिवसांसोबत वय वाढत जातं. हळूहळू विचार करायला शिकतो. आजूबाजूला चाललेलं समजायला लागतं. काय बरोबर,काय चूक ठरवता येतं. आणि मग!!

— मग निरागसतेची जागा व्यवहार घेतो. एकेक करून सगळंच बदलतं. 

लहानपणीचा बहारदार काळ ओसरून सुरू होतो अपेक्षांचा खेळ .. शाळेपासून चिकटलेल्या ‘अपेक्षा’ नंतर आयुष्यभर सोबत करतात. महत्वाकांक्षा, स्वप्न यांच्यामागे धावताना नोकरी,व्यवसाय,लग्न,संसार,मुलं एकेक जबाबदाऱ्या येतात. स्वरूप बदलतं पण ‘अपेक्षा’ साथ सोडत नाहीत. 

— हे मिळवायचं,ते मिळवायचं म्हणून चाललेला जीवाचा आटापिटा. कितीही मिळालं तरी कमी होत नाही.

दमतो,थकतो तरी पळणं थांबत नाही. टेन्शन नावाचा वेताळ पाठ सोडत नाही. तो नवनवीन प्रश्न निर्माण करतो  अन आपण उत्तरं देत राहतो. हा सिलसिला थांबत नाही. जगण्याची तऱ्हा निरंतर चालू राहते

स्वप्न,इच्छा प्रत्येकाच्या असतात. काहींच्या पूर्ण होतात तर काहींच्या …. 

चांगल्या-वाईट घटना घडत राहतात. सुख-दु:ख,ऊन सावली सारखं कूस बदलतात  

.. पराकोटीचा आनंदही मिळतो अन टोकाच्या वेदनासुद्धा. 

 

प्रतिकूल परिस्थितीनं निराशा दाटते. उदास वाटतं. वैताग येतो. संयमाचा कस लागतो. तरीही —

सगळं व्यवस्थित होईल, हा विश्वास जगण्यातली उमेद जिवंत ठेवतो. कितीही संकटं आली तरी हार मानली जात नाही. जगण्यातली हीच  गंमत आहे. 

 

नेहमी वाटतं की, आयुष्य म्हणजे चटकदार भेळ… कधी आंबट तर कधी गोड, कधी तिखट,झणझणीत डोळ्यातून पाणी काढणारी – – तरी भेळ आवडीनं खाल्ली जातेच.   

शंभर टक्के कोणीच सुखी नाही अन दु:खीही नाही, कितीही चढ उतार आले तरी जगण्यावरचं ‘प्रेम’ कमी होत नाही. 

– – जगणं म्हणजे – संतोष आनंद यांच्याच शब्दात सांगायचं तर — 

“आँखों में समंदर है, आशाओंका पानी है 

ज़िंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी हैं ”

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments