श्री मिलिंद दिवाकर 

परिचय 

समाजसेवक, वक्ते, लेखक, स्तंभलेखक, सातत्याने वृत्तपत्रात लेखन पालवी ह्या गाजलेल्या आत्मकहाणीचे लेखक

? मनमंजुषेतून ?

“रश्मी किरण…श्री मिलिंद दिवाकर

ए… खरं सांगू  खूप आवडतं मला तुझं ते निष्पाप कोवळं येणं

केव्हा केव्हा ना तुझे ते दाहक होणं रणरणतं, राकटपणसुद्धा मला आवडतं रे…

संध्याकाळी एक रोमान्स तू घेऊन येतोस नं  खूप रोमांचित होतो मी तुझ्या येण्याने….

निस्तब्ध एकट्या रात्रीनंतर तुझ्या येण्याच्या कोवळ्या चाहुलींनी

एक उबदार चैतन्य माझ्यात सळसळायला लागतं… असं वाटतं सोडूच नये तुझी साथ 

पण तू असा रागीट होत जातोस… दाहक व्हायला लागतोस, पण सांगू

तेही आवडतंय रे मला….

कारच्या काचेतून बघताना तुझं चालणारं तांडव पहात रहावसं वाटतं मला 

शृंगार घेऊन येतोस तू  फिरून संध्याकाळी, काय काय तुझ्या ठायी भरलंय रे….

जीवनाचा एक पटचं दाखवतोस तू आम्हांला

पण या करंट्या मनाला कळतंच नाही की 

जीवन कालचक्र तू  आम्हांला समजावून सांगतोयस !

तुझं सकाळचं निष्पापपण कुठे हरवतं कोणास ठाऊक,

दुपारी तू जुनाट व्हायला लागतोस, तेव्हा रखरखायला लागतोस आणि 

उताराकडे झुकतोस ना निरोप घ्यायला… तेव्हा शांत होतोस

सकाळच्या तुझ्या येण्याने जी मंगल सात्विकता माझ्यामध्ये भरलेली असते 

दुपारी पुन्हा ती घेऊन टाकतोस, दाह व्हायला लागतो कधीकधी 

पेटवतोस आपला अग्नी…. किती तुझे विभ्रम  

संध्याकाळ झाली की हलकेच रोमांचित करून जातोस 

ते संध्याकाळी तुझं जाणंसुद्धा विरहाकडे घेऊन जातं

मग पुन्हा वेध लागतात सकाळच्या त्या तुझ्या येण्याचे…

एक अतूट नातं झालंय तुझ्या अन् माझ्यामध्ये 

निस्तब्ध एकट्या रात्री मी आसुसलेला असतो 

सकाळच्या तुझ्या उबदार आगमनाची वाट बघत 

एक चैतन्य सळसळतं माझ्यामध्ये तुझ्या येण्यानं 

मीच काय ही सगळी वसुंधरा तुझ्यासाठी आसुसलेली असते…

कोण म्हणतं, ही धरा फक्त पावसाचीच प्रतीक्षा करते

तिच्या उदरातील बीजं ना, तुझ्या येण्याची वाट बघतात 

तुझा उष्मा त्यांना हवा असतो, अंकुरायला

तुझ्या उष्म्याने ती सवरतात… फुलतात… खुलतात…

पिकं डोलायला लागतात, त्या धरित्रीलाही तुझी गरज असते 

आणि मग आमच्यातलं चैतन्य जागवायला तू जेव्हा निरागस अवतरतोस

सकाळ मंगल करून जातोस आमचं जगणं… एक सात्त्विकतेचा उदय, चैतन्य संचारतं आमच्यात 

मग पुन्हा दुपारचं तुझं रखरखतं अस्तित्व…

सगळं बंद करून घरात शांत एकटेपणात, एकट्या जीवनाचं भान देतं

तुझ्या रुपानं जगणं शिकवतं आम्हाला, हे सगळं असंच चालत राहणारे अंतापर्यंत 

आदिम सनातन तुझ्या अस्तित्वाची ही कृपा आमच्यावर अशीच बरसत राहो 

कधीकधी तक्रार होते तुझ्याबद्दल मनात, तुझ्या त्या दाहक तांडवाची,

तुझ्या त्या रणरणत्या राकटपणाची पण असो…

हे सगळं समग्रतेच्या जीवनाचं दर्शन तुझ्या रुपानं रोज घडतंय 

आम्ही करंटे मात्र तुला नावं ठेवतं, तुझ्या अस्तित्वाची तक्रार करतं बोटं मोडत असतो 

माफ कर मित्रा! पण जगणं शिकवतोस लेका तू 

आणि हेही कळतं की तुझ्या असण्यामुळेच हे चैतन्य आहे 

मग कसा रोखू स्वतःला… तुझ्यापुढे कृतज्ञ होण्यापासून 

कसं रोखता येईल मला… मी कृतज्ञ आहे तुझा 

खूप खूप कृतज्ञ आहे.

© श्री मिलिंद दिवाकर

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments