डॉ अभिजीत सोनवणे
© doctorforbeggars
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आयुष्य – एक नाटक ? .. की एक खेळ ? – भाग-१ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
कुणीतरी म्हटलंय, आयुष्य हे एक रंगमंचावरचं नाटक आहे…
पण मला वाटतं, आयुष्य हा एक खेळ आहे. या खेळात हरणं – जिंकणं, आनंद – दुःख, आशा – निराशा, मोह – स्वार्थ – त्याग – तिरस्कार, जिद्द, उपेक्षा, तगमग, तळमळ… पुस्तकात लिहिलेल्या या सर्व भावना प्रत्येक खेळात प्रत्यक्ष अनुभवाला येतात. आयुष्य यापेक्षा काय वेगळं आहे ?
खेळामध्ये मात्र एक नियम असतो, आपल्या टीम मधल्या / कुटुंबातल्या सदस्याला आपण त्रास द्यायचा नाही, हरवायचं नाही, हरू द्यायचं नाही… मग हा खेळ क्रिकेट असो की कबड्डी…!!
दुर्दैवाने आयुष्याच्या खेळात मात्र हा नियम पाळला जात नाही…!
अनेकदा आपलेच लोक, आपल्याच माणसांचे पाय ओढून, त्याला रिंगणा बाहेर फेकून देतात, कायमचं आऊट करतात… !
ज्या लोकांना असं रिंगणाबाहेर टाकलं जातं, त्या लोकांच्या काही चुका असतीलही, मान्य … पण ज्या पानावर चूक आहे, फक्त ते पान फाडायचं ? की आख्ख पुस्तकच फाडायचं….???
चुका होणं हि प्रकृती…. चूक मान्य करणं हि संस्कृती…. आणि चुका सुधारणं हि प्रगती…!
पण एखाद्या चुकीसाठी एखाद्याला कायमचं आउट करणं ही मात्र विकृती…!!!
एकदा ही माणसं आयुष्यातून आउट झाली… बाद झाली की लवकर सावरत नाहीत….बरोबर आहे, पाडणारे आपलेच असतील, तर सावरायला वेळ लागतोच..!!! असो…
उन्हाळा खूप वाढलाय असं सारखं कानावर येतं…
घरात पंख्याखाली सुद्धा अंगाची लाही लाही होते… मी तर उन्हात डांबरी रस्त्यावर एखाद्या गटार /उकिरड्याशेजारी किंवा इतर मिळेल त्या जागी बसलेलो असतो. (मला लोक त्यांच्या घरासमोर किंवा दुकानासमोर किंवा इतर चांगल्या जागी बसु देत नाहीत, त्यांच्या मते हे घाणेरडे लोक आमच्या नजरेसमोर नकोत)
तर…. रस्त्यावर बसल्यावर, खालून चटके आणि वरूनही चटके…!!!
रस्त्यावर भर उन्हात दिवसभर शे दिडशे किलोच्या बॅगा सांभाळत असतानाही, उन्हाळ्याचा त्रास मला मात्र जाणवत नाही….
रणरणत्या उन्हात, मी बसलेलो असताना, दोन तीन भिक्षेकरी माझ्यामागे नुसतेच उभे असतात…. मागे उभे का रे ? असे पुढे या… असं मी दटावलं तरी माझं ते ऐकत नाहीत…. दोन तासाने माझं काम संपतं …मी बॅग आवरायला घेतो आणि मग ते पुढे येतात… ते पुढे आल्या आल्या मला उन्हाची तीव्रता जाणवू लागते… मी पुन्हा दटावून विचारतो … असे वेड्यासारखे माझ्या मागे मागे काय घुटमळत होता रे ? त्यातला एक जण मग चाचरत म्हणतो, ‘डाक्टर तूमाला उन्हाचा लय चटका बसत हुता… आमी म्हागं हुबं राहून तुमच्यावर सावली धरली हुती ओ…!!!
.. .. दोन तास स्वतः उन्हात उभे राहून यांनी माझ्यावर सावली धरली होती…. भर उन्हातही मग डोळ्यामधून पूर येतो..!
स्वतः चटका सहन करून दुसऱ्यावर सावली धरणारा फक्त एक बापच असू शकतो…
ही प्रेमळ माणसं, बाप होऊन, माझ्या वाटेवरची झाडं होतात… डोक्यावर सावली धरतात… मग माझ्यासारख्या वाटसरूला ऊन कसं लागेल ?
मला उन्हाळा जाणवतच नाही…. कोण म्हणतं उन्हाळा वाढलाय म्हणून…?
भर उन्हाळ्यात रस्त्यावर मी बसतो तेव्हा माझ्या आज्ज्या, आया, मावश्या माझ्या डोक्यावर पदर धरतात, कुणीतरी उकिरड्यातला एखादा पुठ्ठा घेऊन येतं आणि बाजूला बसून वारा घालतं… मध्येच कुणीतरी पदरानं घाम पुसतं…. तर मध्येच कोणीतरी थंडगार पाण्याची बाटली आणून देतं…. भिकेतून मिळालेल्या पैशातून कोणी ताक विकत आणतं….तर कुणी लस्सी…. तर कुणी उसाचा रस….
प्रेमाच्या आणि मायेच्या इतक्या शितल वातावरणात मी बसलेला असतो, की मला उन्हाळा जाणवतच नाही….. उन्हाची प्रत्येक लाट, माझ्यासाठी थंडगार वाऱ्याची झुळूक बनून येते… मला मग उन्हाळा जाणवतच नाही…. कोण म्हणतं उन्हाळा वाढलाय म्हणून…?
मी आहे साधा भीक मागणाऱ्या लोकांचा डॉक्टर, पण त्यांच्यात गेलो की ते मला एखाद्या देशाचा राजा असल्याचा फील देतात…
काही तासातच ते मला जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती बनवतात… रोज – रोज आणि रोजच…!
दुसऱ्याला श्रीमंत बनवणाऱ्या, आयुष्याच्या खेळात कायमस्वरूपी आऊट झालेल्या आणि रिंगणाबाहेर बसलेल्या या व्यक्तींच्या जखमांवर तुम्हा सर्वांच्याच सहकार्याने फुंकर घालत आहे आणि म्हणून या महिन्याचा लेखाजोखा आपणास सविनय सादर !
*(आमच्या कामाचा मूळ गाभा फक्त वैद्यकीय सेवा देणे नसून, वैद्यकीय सेवा देता देता, त्यांचा विश्वास संपादन करणे, त्यांच्याशी चांगले नाते निर्माण करणे, भिक मागण्याची कारणे शोधणे, त्यांच्यामधील गुणदोष शोधून त्यांना व्यवसाय करण्यास प्रवृत्त करणे आणि त्यांना झेपेल तो व्यवसाय टाकून देणे…. जेणेकरून ते भिक्षेकरी म्हणून नाही, तर कष्ट करायला लागून, गावकरी होऊन ते सन्मानाने जगतील… कुणीही कुणापुढे हात पसरून लाचार होऊ नये, जगात कोणीही भिकारी असू नये, हा आमच्या कामाचा मूळ गाभा आहे, वैद्यकीय सेवा देणे हा त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही फक्त मार्ग म्हणून निवडला आहे)*
भिक्षेकरी ते कष्टकरी आणि कष्टकरी ते गावकरी
दारुड्या नवरा – मतिमंद मूल आणि अपंग आई… कंटाळून तीने शेवटी घर सोडलं; म्हणण्यापेक्षा नवऱ्यानेच तीला घराबाहेर हाकलून दिलं…!
पुण्यात आली… या तीनही पिढ्या, सातारा रोड येथील एका मंदिराबाहेर भिक मागू लागल्या…
ताई खमकी आहे पण त्यापेक्षा सुद्धा जास्त संवेदनशील…
मला भेटली आणि आपोआप भाऊ बहिणीचं नातं प्रस्थापित झालं…
तिला यानंतर नात्याचा उपयोग करून काही बाही विकण्याचा व्यवसाय रस्त्यावर टाकून दिला…. ती तो प्रामाणिकपणे करत होती… !
तिची आई पूर्णतः बहिरी आहे… ताईचा बारा वर्षांचा मुलगा मतिमंद…. दरवेळी मी मुलाला चॉकलेट घेऊन जातो… तिच्या आईला म्हणजेच आजीला मी खूप चिडवतो…. “ए बहीरे म्हातारे” म्हटल्यावर तिला खूप राग येतो (बरोबर हे तीला कसं ऐकू जातं हे मला अजून कळलं नाही)
.. ही आजी मला दाद्या म्हणते… तीच्या मुलीचा ती मला मोठा भाऊ समजत असावी कदाचित… ! बऱ्याच वेळा हक्कानं शिव्याही देते…
तर, हीच बहिरी आजी तासनतास माझ्या डोक्यावर छत्री घेऊन उभी असते…. मी तीला प्रेमाने म्हणतो, ‘म्हातारे बस की आता थकली असशील…’
तिला मात्र, ‘ बहिरे, मर की आता थकली असशील…’ का कोण जाणे पण, असं ऐकू येतं… मी का मरू ? असं म्हणत, यानंतर ती छत्री घेऊन मला मारण्यासाठी माझ्या पाठी लागते… !
अशा सगळ्या गंमती जमती… जे ऐकायला यायला हवं तेच ऐकायला येत नाही….
तर ही ताई आता याच मोठ्या मंदिराच्या बाहेर सिक्युरिटी गार्ड म्हणून कामाला लागली आहे.
अत्यंत ओंगळवाण्या, दीनवाण्या अवतारात हिला पाहिली होती… आता जेव्हा हिला रुबाबदार युनिफॉर्म मध्ये पाहतो, तेव्हा मला काय वाटतं… ? मी शब्दात सांगू शकत नाही…!
एके दिवशी म्हातारी आली आणि माझ्या कानात ओरडून म्हणाली, ‘दाद्या आता मी मरायला मोकळी झाले…’
मी पण तेवढ्याच प्रेमानं तीला कानात ओरडून सांगितलं, ‘म्हातारे मरू नको इतक्या लवकर…’
बहुतेक तीला “म्हातारे मला मारू नको” असं ऐकू आलं असावं…. ती माझ्या गालाचे, हाताचे मुके घेत म्हणाली, ‘भयनीचं इतकं करतुस दाद्या, आता मी तुला न्हायी मारणार… न्हायी मारणार…!
.. .. असं म्हणत ती माऊली अश्रूंचा अभिषेक माझ्या हातावर करते… मी तीला कानात ओरडून म्हणतो, ‘ म्हातारे, काळजी करू नकोस, तीला मी बहीण म्हणून स्वीकारलं आहे…. तीचा हात मी कधीच नाही सोडणार.. तुज्या शप्पत…’
– ही संपूर्ण वाक्ये मात्र जशीच्या तशी बहिऱ्या म्हातारीला ऐकू जातात… शेवटी आईच ती….!
‘ न्हायी सोडणार ना भयनीचा हात….? न्हायी सोडणार ना भयनीचा हात….?? ‘ माझ्या पाठीवरून खरबरीत हात फिरवत ती दहा वेळा माझ्याकडून वदवून घेते… मला तिच्या चेहऱ्यावर माय दिसते…. डोळ्यात गाय दिसते….!
– क्रमशः भाग पहिला
© डॉ अभिजित सोनवणे
डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे
मो : 9822267357 ईमेल : [email protected],
वेबसाइट : www.sohamtrust.com
Facebook : SOHAM TRUST
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈