श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

डोन्ट मिस युवर पॉवर — ☆ श्री सुनील देशपांडे

आपल्या जीवनात सगळ्यात पॉवरफुल शब्द कुठला असा प्रश्न जर मला विचारला तर मी उत्तर देईन

‘अहोss’ ……. 

या शब्दाचं सामर्थ्य जाणून असलेल्या पिढीचा सध्या अस्त होत आहे. खरं म्हणजे हा शब्द, स्त्रीप्रधान संस्कृतीचा मेरुमणी आहे. 

या शब्दात असं काय आहे ? असं विचारण्यापेक्षा या शब्दात काय नाही असे विचारणं जास्त संयुक्तिक ठरेल…… 

….. यात प्रेम आहे, यात धाक आहे, यात जरब आहे, यात आजारी माणसाची अगतिकता आहे, मदत याचना आहे,  आज्ञा आहे, यात सर्व काही आहे. ही नुसती एक हाक सुद्धा आहे.   हा शब्द उच्चारल्यानंतर ज्याच्यासाठी हा उच्चारलेला असतो, ती व्यक्ती हातातलं सगळं काम सोडून धावत सुटते.

यामधली भावना, हा शब्द उच्चारण्याची पद्धती आणि स्वर यावर अवलंबून असते. या मधला अर्थ उच्चारणाऱ्याला आणि ज्याच्यासाठी उच्चारला आहे त्याला त्या दोघांनाच निश्चित समजतो.

यात परिचय ही आहे. हो, कुणाशीही परिचय करून देताना – ‘हे आमचे अहो’ असा परिचय करून दिल्यानंतर घरातील संपूर्ण परिस्थितीची जाणीव समोरच्याला येते.

हे माझे मिस्टर – हे अगदीच नाटकी वाटतं.  हा माझा नवरा – हे वाक्य तर इतकं रुक्ष वाटतं की,  कडक उन्हाळ्यात  तापलेल्या डांबरी रस्त्याच्या बाजूच्या वठलेल्या संपूर्ण निष्पर्ण वृक्षा सारखं वाटतं. 

अलीकडच्या मुलींना अर्थात आमच्या पिढीतील सुद्धा नवऱ्याला नावाने हाक मारणाऱ्या मुलींना या शब्दाच्या सामर्थ्याची कधी कल्पनाच आलेली नाही. त्यामुळेच अलीकडच्या मुलींनी घरामध्ये स्वतःचं महत्व कमी करून घेतल्याचे जाणवते. 

माझ्या बायकोने जर मला ‘अरे सुनील जरा इकडे ये’ असे सांगितले असते तर मी तिला उत्तर दिले असते ‘हो थोड्या वेळाने येतो’ . पण ती जेव्हा अहोss  म्हणते त्या वेळेला होss चा शेवटचा हेल  संपायच्या आत मी हजर असतो.  

प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र सुद्धा ‘अहो ss  मला हरणाचं कातडं आणून द्या ना!’ असं म्हटल्या म्हटल्या लगेच धनुष्यबाण घेऊन त्या हरणा मागं धावले असतील, क्षण सुद्धा वाया घालवला नसेल. नाहीतर खरं म्हणजे त्यांनी लक्ष्मणाला सांगायला पाहिजे होतं की ‘जा रे त्या हरणाची शिकार करून ये’ पण नाही, ते अहो ऐकलं आणि सगळं संपलं! 

प्रभू रामचंद्रांसारख्या ईश्वरीय व्यक्तिमत्त्वाला सुद्धा खरं म्हणजे चुकीच्या वेळेला, चुकीचं कृत्य करण्यासाठी भाग पाडणारा तो शब्द किती सामर्थ्यवान असेल त्याची कल्पना करा! 

हा शब्द म्हणजे विवाहित स्त्रीचे घरातलं सामर्थ्य आहे. 

नवीन पिढीतील सर्व तरुणींना प्रेम विवाहित असो किंवा लिव्हइन मधील सुद्धा, माझी एक विनंती आहे.  एकदा अहोss हा शब्द प्रयोग वापरून तर पहा. त्याच्या सामर्थ्याची तुम्हाला एकदा कल्पना आली तर आपण काय मिस करत होतो याची कल्पना येईल. 

© श्री सुनील देशपांडे.

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments