सौ. राधिका भांडारकर

 ☆ मनमंजुषेतून ☆ माझे जन्मदाते….! ☆ सौ. राधिका भांडारकर ☆ 

आम्ही पाच बहिणी.

“सगळ्या  मुलीच? मुलगा नाही? मग वारस कोण? वंश खुंटला.”

अशा दुर्भाष्यांना, माझ्या आई वडीलांना नेहमी सामोरं जावं लागत असे.

पण दोघंही खंबीर. वडील नेहमी म्हणायचे, “माझ्या पाच कन्याच माझे पाच पांडव आहेत! माझ्या वंशाच्या पाच दीपीका आहेत!”

लहानपणी जाणीवा इतक्या प्रगल्भ नव्हत्या पण आज जाणवतय् पित्याची ती ब्रह्मवाक्ये होती! आणि त्यांनीच आम्हाला आत्मसन्मान,आत्मनिर्भरता आणि आत्मविश्वास दिला.

आई, स्रीजन्माची कर्तव्ये तिच्या स्वत:च्या आचरणातून कळतनकळत बिंबवत होतीच.  त्याचवेळी वडील — पपा विचारांचे, लढण्याचे, सामोरं जाण्याचे, दुबळं.. लेचपेचं. न राहण्याचे धडे गिरवत होते! ते म्हणत, “गगनाला चुंबणारे वृक्ष नाही झालात —— हरकत नाही. पण लव्हाळ्या सारखे व्हा! वादळात मोठी झाडं ऊन्मळुन पडतात पण लव्हाळी तग धरतात!”

आमच्या घरात ऊपासतापास, व्रतवैकल्ये, कर्मठ देवधर्म नव्हते. परंतु पारंपारिक सोहळे आनंदाचे प्रतिक म्हणून जरुर साजरे केले जात.

प्रभात समयी पपा रोज ओव्या अभंग त्यांच्या सुरेल आवाजात गात! ते सारं तत्व अंत:प्रवाहात झिरपत राह्यल.आणि त्यानं आम्हाला घडवलं!

एक दिवस मी पपांना म्हणाले, “पपा सकाळी तुम्ही मला पैसे दिले होते. पण हिशेब विचारायला विसरलात!”

ते लगेच म्हणाले, “बाबी, माझा विश्वास आहे तुझ्यावर. तू नक्कीच ते वेडेवाकडे खर्च केले नसणार”

मुलांवर आईवडीलांचा विश्वास असणे ही त्यांच्या जडणघडणीतील खूप महत्वाची पायरी असते! पपांनी नाती जोडायला शिकवलं अन् आईने ती टिकवायला शिकवलं.

आईनं केसांच्या घट्ट वेण्या घातल्या अन् पपांनी मनाची वीण घट्ट केली.

असं बरंच काही…

लहानपणी माझ्या मुलीने निबंधात लिहीले होते “मला चांगली आई व्हायचे आहे”

माझ्या आईसारखी आई मी होऊ शकले का हा प्रश्न मला नेहमी सतावत असतो!

परवा पपांच्या स्मृतीदिनी धाकटी बहीण म्हणाली, “आपण पपांच्या दशांगुळेही नाही. त्यांची विद्वत्ता, वाचन, लेखन, स्मरणशक्ती, जिद्द चिकाटी काही नाही आपल्यात!”

खरय्.. पण त्यांच्याकडुन जगावं कसं ते शिकलो!

वादळ संपेपर्य्ंत टिकणारी लव्हाळी तर झालोच ना?

खूप रुणी आहे मी माझ्या जन्मदात्यांची..!!!

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments