सौ. वृंदा गंभीर
☆ असाही एक भीतीदायक अनुभव… ☆ सौ. वृंदा गंभीर ☆
ही कथा नसून माझ्या जीवनातला एक भयानक अनुभव आहे. माझं नावं प्राजक्ता संजय कोल्हापुरे. मी जेव्हा लहान होते तेव्हा मी सायकलवरून शाळेत जात होते. माझी शाळा होती आमच्या घरापासून जवळ जवळ 4km अंतरावर आणि शाळेत जाताना व घरी येताना मला फार दम लागायचा,
मला थकवा जाणवायचा पण वाटायचे सर्वांना होते त्यात काय वेगळं? म्हणून सारखं मी त्याकडे दुर्लक्ष करायचे. आई पण मला म्हणायची ‘ दिदू जेवणं वेळेवर करतं जा किती थकवा येतो तुला ‘ पण मी मात्र दुर्लक्ष करणार. पण त्याचे परिणाम पुढे जाणवतील हे कुणालाच लक्षात आले नाही. मी मोठी झाले पण माझा हा त्रास कुणाच्याच लक्षात आला नाही. ४ वर्षाखाली माझी आई वारली. तिने आत्महत्या केली, सगळे जण म्हणतात मी फार रडलेच नाही. पण माझं फार प्रेम होत तिच्यावर म्हणून मला फार आठवण यायची. ती गेल्यावर मी एकटीच असायचे घरी, मी फार रडतच नव्हते त्यामुळं सर्व त्रास मी निमूटपणे सहन केला, भावनाहीन झाले होते.
मग मला स्थळ आले. मलवडीमध्ये दाखवण्याचा कार्यक्रम अगदी उत्साहात झाला. माझं एक वर्षाखाली धूमधडक्यात लग्न झालं, आणि तेही माझ्या आईच्या पुण्याईने. तिने माझ्यासाठी करून ठेवलेले सोने माझ्या उपयोगाला आले. स्वामींच्या आशीर्वादाने खूप चांगले लग्न झाले. मला एक छान आणि सुंदर व्यक्तिमत्व असणारा नवरा मिळाला, आणि त्या कुटुंबातील माणसं फार चांगल्या स्वभावाची आणि निर्मळ मनाची होती,. मी झाले प्राजक्ता संघर्ष गंभीर, गंभीर घराची मोठी सून.
सर्वजण फार आनंदात होते, नित्य नियमाने सगळी कामे होत होती, कुलाचार पण चांगला होत होता. पण आमच्या हसणाऱ्या कुटुंबाला कुणाची तरी नजर लागली. आमच्या घरी मामीच्या दोन मुली आल्या होत्या, नम्रता आणि गौरी. आम्ही सगळे शनिवारी पिक्चरला गेलो. पिक्चर बघून घरी आलॊ तर आमचा फ्लॅट आहे तिसऱ्या मजल्यावर. मी चढून वर आले तर मला थकवा जाणवायला लागला. फार दम लागला .. १० मिनिटे झाली पण माझा दम काही थांबेना. मागच्या आठवड्यात मी आणि माझे मिस्टर दवाखान्यात जाऊन आलॊ होतो तेव्हा डॉक्टर म्हणाले होते की ऍसिडिटी झाली आहे आणि त्यांनी मला गोळ्या दिल्या, पण माझा त्रास काही थांबेना. त्याच दिवशी रात्री मला फार त्रास झाला, मला नीट आणि पुरेसा श्वास घेता येत नव्हता. आडवे झोपले कि श्वासाच प्रमाण कमी अधिक होत होते. त्या दिवशी मी काही झोपले नाही, पण दुसऱ्या दिवशी मी आईंना सांगितले कि मला दम लागतोय मग त्या मला म्हणाल्या कि, आपण दवाखान्यात जाऊ, मी टाळाटाळ केली, लक्ष दिले नाही. मग मात्र आईने मागे लागून माझ्यावर रागवून मला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथे त्यांनी टेस्ट केली आणि त्या टेस्टमध्ये कळले कि माझ्या छातीत पाणी झाले आहे.,आधी एकदा होऊन गेले आहे आणि ते छातीत साठून चिटकून बसले आहे हृदयात. म्हणून मला श्वास घेता येत नव्हता. डॉक्टर म्हणाले लवकरात लवकर हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करावे नाहीतर मुलगी वाचणार नाही. दुसऱ्या दिवशी मला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नेले. तिथे त्यांनी टेस्ट केली आणि मला ताबडतोब वोर्डमध्ये ऑक्सिजनवर ठेवले होते, आणि भीती घालण्यात आली होती कि ट्रीटमेंट लवकरात लवकर चालू करा नाहीतर मुलगी वाचणार नाही. ते डॉक्टर हृदयात होल पाडून पाणी काढणार होते, असा आहे प्रायव्हेट हॉस्पिटलमधला भोंगळ कारभार. तिथे बिल तर फाडले जातेच पण भीती देखील दाखवली जाते. या भीतीखाली रात्रभर कुणालाच झोप लागली नाही. सगळे हॉस्पिटल मधेच होते पण तेवढ्यात त्यांना कुणीतरी कळवले कि मुलीला ससून हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करा, तिथे चांगली ट्रीटमेंट केली जाते. मला प्रायव्हेटवरून गव्हर्नमेंटमध्ये ऍम्ब्युलन्समधून न्यावे लागले. ऑक्सिजन लावलेलाच होता. असा अनुभव परत कधीच कुणाच्या वाट्याला येऊ नये. मी ससूनला आले. फार गर्दी होती आणि बेडदेखील शिलक नव्हता. कसाबसा बेड आरेंज केला. मी त्रासाने कळवळत होती, त्यानंतर मला वरच्या हॉलमध्ये हालवण्यात आले. सगळे जण घाबरून गेले होते मला अशा अवस्थेत पाहून आणि माझ्या आई तर फार रडत होत्या मला पाहून, कारण तशी भयानक दिसत होते मी त्या अवस्थेत! मला तिथून बाहेर काढून प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये हालवण्यावरून फार वाद झाले सासर कडच्यामध्ये आणि माहेर कडच्यामध्ये, पण शेवटी मला ससूनमध्ये ठेवण्याचा निर्णय पक्का झाला, कारण प्रायव्हेट मध्ये पैसे जास्त घेणार होते आणि शिवाय पायपिंग करून पाणी बाहेर काढणार होते, ससून मध्ये मात्र मला गोळ्यांनी बरे केले,
रोज मला दोन गोळ्या सकाळी आणि संध्याकाळी सुरु केल्या, स्टेरॉईड आणि इंजेकशन तर वेगळाच जीव घेत होते, आणि ऑक्सिजन आणि सलाईन वेगळेच, मी फार गळून गेले होते. मात्र त्या 10 दिवसात जो अनुभव आला तो वैऱ्याला पण येऊ नये, कारण त्या दिवसात मला माझी माणसं कळली, कोण जवळचे आणि कोण परके सर्व दाखवलं स्वामी महाराजांनी. माझे पाळीचे प्याड बदलण्यापासून माझी युरीन फेकण्यापर्यंतचे सगळे काम माझी सासू म्हणजेच दुसरी आई करतं होती. शेवटी काय, ” परदु:ख शितळ असतं ” असे सर्वांना वाटतं असेल , असो. आईने कधीच मला सून म्हणून ट्रीट नाही केले. तिथे असणारे सर्व पेशन्ट आणि त्यांचे कुंटूब जेव्हा आम्हाला पहायचे तेव्हा त्यांना नवलच वाटत होते, जेव्हा आई माझी तेल लावून वेणी घालायचे, मला रोज गरम गरम जेवायला आणायची, तेव्हा सर्व म्हणायचे कि काय मुलीच नशीब, आणि आई नाही तर सासरे म्हणजेच बाबादेखील माझे ताट धुवून ठेवायचे तर सर्व फक्त माझ्या कडेच पाहायचे त्या दिवसात खूप dr लोकांनी खूप भीती घातली कि हे या लहान वयात होणे चांगले नाही. खूपच वाईट वाटले कि ‘असे कसे झाले तुमच्या सुनेचं ‘ असे टोमणे देखील ऐकायला मिळाले. मात्र माझी आई माझ्या सोबत होती आणि बाबा देखील. त्या दिवसात मला एक देखील जवळचे नातलग भेटायला आले नाहीत, माझा भाऊ देखील मला अर्ध्यावर सोडून गेला निघून गेला, माझा सखा बाप पण मला पाहायला आला नाही कि माझी मुलगी कशी आहे? म्हणून. फक्त मावशीचे mr भेटायला आले. बाकीच्यांनी तर तोंड फिरवली होती. मुलगी जिवन्त आहे कि मेली कुणाला काहीच देणं घेणं नाही आणि मी खुळी त्या दरवाज्याकडे नजर लावून होती कि कोणी तरी येईल भेटायला, पण देवाने माणसे मात्र दाखवली.
त्या दिवसापासून ठरवलं कि सासरकडची माणसं आपली, कारण ज्या सख्या आईने जीव सोडला तरी दुसऱ्या आईने जीव वाचवला. आज ती नसती तर मी पार खचून गेले असते. ती रोज तुळजाभवानी मातेला प्रार्थना करायची, महाराजांना विनंती करायची कि माझ्या सुनेला घरी सुखरूप घेऊन ये, तिला पूर्ण बरे कर आणि तसेच झाले. त्यांनी माझ्यासाठी शुक्रवार धरले आणि कालभैरवाने तिचे मागणे पूर्ण केले. त्याला आईने साकडं घातलं होते कि सुनेला पूर्ण बरे कर आणि देवाने प्रार्थना ऐकली. मी पूर्ण बरी झाले. मला घरी आणण्यात आले. आज ही मी व्यथा मांडत आहे पण माझ्या डोळ्यातले अश्रू काही थांबायला तयार नाहीत. तरी देखील हे सत्य मला मांडायचे होते कारण असं म्हणतात कि देव तारी त्याला कोण मारी……,
लेखिका : सुश्री प्राजक्ता संघर्ष गंभीर
प्रस्तुती – दत्तकन्या (सौ. वृंदा पंकज गंभीर)
न-हे, पुणे. – मो न. 8799843148
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈