डाॅ. निशिकांत श्रोत्री
मनमंजुषेतून
☆ शब्दांची वादळं… ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
सुमारे चाळीस एक वर्षांपूर्वीची घटना आहे ही. आता मी जनसामान्यांबरोबरच साहित्यिकांमध्ये देखील प्रथितयश कवी म्हणून ओळखला जाऊ लागलो होतो. तरीही आपल्यापेक्षा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ हे थोरच नाही का!
पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात कवी संमेलनात मी माझी ‘शब्दांची वादळं’ ही कविता सादर करायला व्यासपिठावर उभा होतो. मी पहिलाच चरण म्हटला,
‘शब्दांची अनेक वादळं आली, कधी तसा डगमगलो नाही’.
आणि अचानक माझ्या मागून, व्यासपिठाच्या मागील भागातून ‘वाः! सुंदर’ अशी दाद मिळाली. मी चमकून, तरीही कृतज्ञतेने मागे वळून पाहिले; आणि काय सांगू तुम्हाला, ही दाद मिळाली होती विंदा करंदीकर आणि मंगेश पाडगावकर या दोन ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कविवर्यांकडून! माझ्या अंगावर शहारे आले आणि मोठ्या उत्साहात मी ती संपूर्ण कविता सादर केली. कवितेला टाळ्यांच्या कडकडाटाचा प्रतिसाद तर मिळालाच; शिवाय मेनका प्रकाशनच्या पु. वि. बेहेरे यांनी माझा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित करण्याची इच्छा प्रकट केली. साहजिकच या काव्यसंग्रहाचे नाव आहे ‘शब्दांची वादळं’!
ही शब्दांची वादळं कविता: —-
शब्दांची अनेक वादळं आली कधी तसा डगमगलो नाही
नजरांचे कुत्सित झेलले बाण विचलित असा झालोच नाही
आपण बरे आपले बरे ही वृत्ती कधी सोडली नाही
मार्ग आपला शोधत राहिलो कानावरचं मनावर घेतलंच नाही
नजर माझी वाईट म्हणत त्यांच्या वाटे गेलोच नाही
नजरेसमोर आले त्यांना मात्र कधी टाळले नाही
बोलणाराची वृत्तीच वाईट त्याचा बाऊ केलाच नाही
अनुभवाचे बसले चटके दुर्लक्ष करता आलं नाही
*
अपयशाचा धनी झालो माझ्या, त्यांच्या खोटं नाही
सावली माझी वैरीण झाली, शुभ तिला ठाऊक नाही
नजर माझी अशुभ म्हणता सत्याला या पडदा नाही
दृष्टी माझी टाळून जाता मांगल्याला अडचण नाही
भीती आता माझी मलाच अपयशाला वाण नाही
नको आरसा म्हणून मला असली दृष्ट सोसवत नाही
☆
© डॉ. निशिकान्त श्रोत्री
एम.डी., डी.जी.ओ.
मो ९८९०११७७५४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈