सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘पाणबुड्या भातातली वांगी ’ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

मला वाटतं संसारात पदार्पण केल्यानंतर आईची जरा जास्तच आठवण येते काहो ? कारण एकेक चटके बसायला लागले की आई गं ! असं  म्हणून आईच आठवते  नाही कां आपल्याला ? बघा नं ! टोपली भरून वांगी बघून तुमचही असच झाल  असत . पुराणातली नाही कांही खऱ्या वांग्याची गोष्ट सांगतीय मी. सोबतीला माझी फजिती पण ऐका.  पहिल्यापासूनच सगळं सांगते तुम्हाला, 

‘कंटाळा,’आणि ‘ हे मला  येत नाही ‘! हे दोन शब्द माझ्या आईच्या कोशातच नव्हते. ही कडक शिस्त तिने आम्हा भावंडांना मारून मुटकून लावली होती .

 संसाराचे धडे आईने आमच्याकडून गिरवून घेतले.ते धडे लग्न झाल्यावर ,संसारात पडल्यावर फार फार उपयुक्त आणि मौल्यवान ठरले.

एकदा गंमतच झाली कशी कोण जाणे ह्यांनी  वांगी जरा जास्तचं आणली होती .  कदाचित भाजीवालीने गोड बोलून साहेबांच्या गळ्यातच मारली असावीत, आता या एवढ्या वांग्याचे काय करू ? त्यांना प्रेमाने गोजांरू म्हटलं तर  काटे हातात टोचणार .  चरफडत पिशवी रिकामी केली.  अहो टोपल भरलं  की हो वांग्यानी !  माझ्यापुढे मोठा यक्षप्रश्न,! संसारात पडून सुगरणपणाच्या मोरावळा झाला नव्हता . त्यामुळे मला सुगरणीला ते आव्हानच होत. आईच डाळवांग  अप्रतिम व्हायच. बुद्धीला ताण देऊन पहिल्या दिवशी आई कसं करायची ? काय काय घालायची ? हे आठवून आठवून  केल एकदाच डाळ वांग.   दुसऱ्या दिवशी केली भरली वांगी. तिसऱ्या दिवशी  कांदा बटाटा वांग्याचा रस्सा. हाय रे देवा!  तरीपण द्रौपदीच्या थाळीसारखी  टोपलीत काही वांगी उड्या मारतच होती.आता काय करायच बाई ह्या वांग्याच ? पुन्हा  भल मोठ्ठ प्रश्नचिन्ह  ??? आणि मग एकदम ट्यूब पेटली. आईने केलेली मिश्र डाळींची, दाणे आणि अगदी दोनच चमचे, तांदुळाची सगळं काही थोडं थोडं घेऊन भाजून, वाटून  मसाला घालून  केलेली चविष्ट रस्सा भाजी आठवली. मग काय बांधला की हो पदर.! सगळ्या डाळी, दाणे भाजून, वाटून रस्सा केला. अय्या ! पण भाजलेले  तांदूळ वाटायचे राहयलेच की जाउं दे ! घालू तसेच सबंध तांदूळ,एवढ्याशा तांदुळानी काय होणार आहे ? असं म्हणून मी तांदुळाची वाटी रिकामी केली.काय तरी बाई ह्या वांग्या वांग्यांनी डोकच फिरवलय. रसरशित फुललेल्या दगडी कोळशाच्या शेगडीवर भाजीचा हंडा चढवलाएकदाचा . “आज काय मग बेत” ?असं  म्हणतच सगळेजण  स्वयंपाक घरात डोकावले. मी थंडपणे उत्तर दिल, ” आज पण शेवटच्या वांग्याची, वेगळ्या प्रकारची,रस्सा भाजी केली आहे चला जेवायला “. सगळे नाक मुरडत मागच्या मागे पसार झाले. ह्यांना तर बोलायला जागाच नव्हती. कारण किलो दोन किलो वांगी हयांनीच तर आणली होती. माझ्या चेहऱ्याकडे बघून नवरोबांनी   पण  चक्क पळ काढला. पण काही म्हणा हं, भाजीचा सुगंध लपत नव्हता. बारा वाजले. पंगत बसली.आणि —

बापरे ! वाढताना लक्षात आल,भाजीत न वाटलेल्या तांदुळाचे प्रमाण  जरा जास्तच झालय. एकजीव न झालेले अखंड तांदूळ माझ्याकडे डोळे वटारून बघताहेत आणि पाणबुडी सारख्या उड्या मारताहेत. चार घास खाऊन कसंबसं जेवण उरकून, ” ए आई आम्ही ग्राउंड वर  जातो गं ” म्हणून मुल पसार पण झाली. हे मात्र भाजी चिवडत बसले होते. शेवटी न राहून इकडून विचारणा झाली “आजचा वांग्याचा प्रकार जरा वेगळा वाटला  नाही कां?म्हणजे कुठे मासिकांत वाचलात कीं कुणी सखीनी शिकवला?   नाही म्हणजे सहज विचारतोय, नक्की काय आहे हे ? वांग्याची भाजी का वांगी  भात,?  काय म्हणायच ह्याला ?”

 मसाल्याबरोबर न वाटता सबंध तांदूळ घालून आधीच माझ्या चारी मुंड्या  चीत झाल्या होत्या. तरी पण हार मानेल ती बायको कसली ? मी ठसक्यात उत्तर दिल, “आमच्याकडे  ह्याला ‘ मसाला वांगी रस्सा भाजी ‘ , म्हणतात आणि माझ्या आईनेच तर मला ही शिकवलीय. आई पण अशीच करते ही मसाला वांगी. ह्यांचा घास हातातच राहयला. आ वासून  ते माझ्याकडे बघतच  राह्यले. ‘आता हीच्या आईने, म्हणजे आपल्या सासूबाईंनीच  शिकवलं म्हणजे….

 जाऊदे झाल ! पुढे काही न बोलणंच चांगल  अशा धूर्त विचाराने, अगदी शेवटचं एकच राह्यलेलं वांग आ वासलेल्या तोंडात महाशयांनी कोंबल.आणि मी  हुश्यss  केल. संपली ग बाई एकदाची भाजी. 

पुढे आईकडे गेल्यावर अगदी जस्सच्या तस्स आई पुढे मी ते वांगी पुराण मांडल. आणि लाडात येऊन म्हणाले, “ए आई अशीच करतेस नां गं तू ही भाजी ? मी तस ह्यांना सांगूनही टाकलंय की माझ्या आईने शिकवलीय ही भाजी मला.” आई काम करता करता एकदम थबकली . कपाळावर हात मारून पुटपुटली, “कार्टीनी तिच्याबरोबर जावयांसमोर माझीही अब्रू घालवली.जावई म्हणाले असतील, “अरे वा रे वा!  आपली इतकी सुगरण बायको,आणि तिची आई म्हणजे आपली सासू खरंच किती सुगरण असेल.आईला नुसत्या कल्पनेनेच लाजल्यासारख झाल. आणि काय योगायोग  बघा हं!   हे नेमके त्याच दिवशी आईकडे यायचे होते. आई मधली सासू जागी झाली. पटकन माझ्या हातात पिशवी कोंबत ती म्हणाली,       ” लवकर जा आणि मंडईतून वांगी घेऊन ये.  आणि हो वाटेत मैत्रिण भेटली तर चकाट्या पिटत बसू नकोस.जावई यायच्या आत भाजी तयार झाली पाहिजे.” आहे का आता ! आई म्हणजे ना! मी  कुरकुरले, ” आई  अगं पुन्हा वांगी ? हे वैतागतील माझ्यावर” माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष   करीत आई म्हणाली, “जा लवकर आणि ताजी, छोटी, काटेरी वांगी आण  पटकन.” हाय रे दैवा ! कुठून आईला हा किस्सा सांगितला असं झाल मला .कंटाळा तर खूssप आला होता पण आई पुढे डाळ शिजणार नव्हती. एकदाची चरफडत  वांगी आणली. आणि जरा हाश हुश करीत दमले ग आई !असं म्हणून  टेकले, लोडावर रेलून लोळण फुगडी घेऊन , माहेरपणाचा  विसावा,घेण्याचा सुखद विचार  करत होते . इतक्यात आईसाहेबांचे फर्मान आले.,” लोळू नकोस इकडे ये ,मी भाजी कशी करतेय ते नीट बघ. आणि तांदुळाचं वगैरे प्रमाण किती घेते तेही बघून ठेव.” मंडळी बघताय ना तुम्ही? माहेरी आले पण सासुरवासच कीं हो हा.! कुठून आईला ही वांग्याची गाथा सांगितली असं झालं मला. आणि हे तरी आजच का यावेत ? लगेच बायकोच्या मागे सासुरवाडीचा पाहुणचार झोडायला ? सगळे  ग्रहच फिरलेत गं बाई  माझे, पण  करणार काय ? झक्कत उठले. आणि आईसमोर बसले. बघता बघता सगळी धान्य थोडी थोडी घेऊन भाजून,वाटून मसाला घालून चमचमीत भाजी तयार पण झाली. संपूर्ण घरभर भाजीचा घमघमाट सुटला होता. काय तरी बाई ! याच भाजीचा भुसावळला आपण केवढा मोssठ्ठा घोळ घातला होता. आणि ती तर मसाला भाजी नाही, तर मसाले भातच झाला होता. पाणबुडी सारखे अखंड तांदूळ त्यात उड्या मारत होते. पणअहाहा!ही आईने आत्ता केलेली भाजी रस्सेदार अशी,कित्ती छान दिसतीये . हे आले बारा वाजले. म्हणजे घड्याळयाचे हं . 😃 पानं मांडली . हात धुवायला जावई मोरीपाशी गेले. तेव्हा टॉवेल द्यायचं निमित्त करून मी पण हळूच पिल्लू सोडल, “अहो ऐकलंत का?आज जेवणात वांग्याची भाजी आहे बरं का! मी जेवढं हळू सांगितलं नां तेवढे हे जोरात  किंचाळले “काsssय वांगी? आमच्या घरात आईकडे बाथरूम नव्हतं तर चौकोनी  मोरी होती. तिथेच भला मोठा तांब्याचा वहिनीने  लखलखीत घासलेला बंब आईने कोपऱ्यात त्रिकोणी तिवईवर व्यवस्थित बसवला होता.

हं तर काय सांगत होते, हे का  s  s sय ? करून ओरडल्यामुळे माझ्या भावाला शरद आप्पाला वाटल ह्यांना  बंबाचा चटका बसला की काय ? तो एकदम पुढे येत म्हणाला, ” काय झालं बाळासाहेब ? बंबाचा चटका बसला का ? नाही  म्हणजे ! एकदम ओरडलात म्हणून म्हटलं.” हे गडबडले ओशाळून म्हणाले, “नाही ! नाही! तसं नाही.,! “असं म्हणत मी दिलेल्या  टॉवेलमध्ये त्यांनी तोंड खूपसलं. तेवढ्यात, शरद आप्पासाहेब गरजले” अरे त्या बंबाची जागा बदला रे कुणीतरी. ” एवढ्या सगळ्या गोंधळात मी कशाला थांबतीय तिथे? वांग्याच्या भाजीचे पिल्लू सोडून मी पळ काढला. आईजवळ येऊन उभी राहयले तर आई गालातल्या गालांत हंसत होती.’ त ‘ वरून ताकभात ओळखण्या इतकी ती नक्कीच हुशार होती .या सगळ्या प्रकरणाची काहीच माहिती नसल्याने वहिनी मात्र विचार करीत होती,बंब कुठे ठेवायचा? असा हा सावळा गोंधळ कुठून कुठे चालला होता.

 पानावर बसल्यावर जावई सासुबाईंना म्हणाले, “सासूबाई भाजी जरा कमी करता का? नाही म्हणजे वांग्याची भाजी मला सोसत नाही अलर्जी आहे .” हा इशारा मला होता. मुकाट्याने वाटी उचलून त्यात फक्त दोनच चमचे भाजी वाढून मी वाटी ह्यांच्या पुढे ठेवली.पहिला वरण भात संपला.आता पाळी आली भाजीची. ह्यांनी भाकरीचा तुकडा मोडून घास तोंडात घातला.आणि डोळेच विस्फारले. एका सेकंदात वाटी  रिकामी झाली.अगदी चाटून-पुसून वाटी घासल्यासारखी लख्ख झाली. उस्फूर्तपणे शब्द बाहेर पडले, ” सासूबाई काय कमाल आहे!मस्त  झालीय हो भाजी.  खूपच छान ! नाहीतर आमच्याकडची बाई साहेबांनी केलेली भाजी, नव्हे.. नव्हे वांगी भातच म्हणावं लागेल त्याला .नको नको ती आठवणच नको!. असं म्हणून  चेहरा वेडा वाकडा करत जावयांनी विनवल, ” सासुबाई एक विनंती आहे, तुमची लेक माहेर पणाला आली आहे ना,  तर रोज शाळा घ्या तिची. “आई झटकन पुढे झाली. आणि म्हणाली,”असं नका  हं म्हणू, ही भाजी तुमच्या बायकोनीच केली आहे ” आईने पांघरूण घातल्यावर मीही नाक फुगवून  म्हणाले, ”  बर का आई ! आत्ता तुझ्या देखरेखी खाली मी भाजी केलीय . अशीच भाजी पुन्हां मी करूनच दाखवीन.” खाली मान घालून घे पुटपुटले नको नको!काही दिवस तरी नको. ” लगेच वहिनी म्हणाली,”  आता सासुबाईंच्या  देखरेखी खाली मी पण तयार होणार आहे.आणि म्हणणार आहे ,” हम भी कुछ कम  नहीं ” 

मैत्रिणींनो –वांगी पुराण– संपलं. एक गोष्ट मात्र लक्षात आली, माझी आई,सुगरण, संसार दक्ष, संसाराचा समन्वय   साधणारी आणि सगळ्यांना शिस्तीत मार्गदर्शन करणारी होती. तसंच मला व्हायचं आहे. पण या कथेवरून तुम्हीही  एक धडा घ्या बरं का ! वांगी खूप नका हं आणू? नाहीतर रोज वांगी..वांगी.वांगीपुराणच होईल तुमच्या घरी.            .

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments