सुश्री मंजिरी येडूरकर

? मनमंजुषेतून ?

☆ 👁️ तेच डोळे देखणे… 👁️ ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

☆ १० जून, नेत्रदान दिन… ☆

डोळ्यांनी या पाहतो सुंदर 

चंद्र, सूर्य अन् निळे अंबर

रंगबिरंगी फुले नि तारे

अथांग सागर नदीकिनारे… 

*

काय पाहतील जे  दृष्टीहीन

कुणा समोरी होतील लीन

डोळ्यापुढती काहीच नसे

मग कल्पनेला तरी पंख कसे… 

*

देऊन डोळे दृष्टीहीनांना

धन्य होऊ मरूनि उरतांना 

संकल्प करा आजच साचा

भरूनि उरू दे घट पुण्याचा… 

अंधत्वाचे काही प्रकार असतात, वेगवेगळी कारणे असतात, पण काही अंधांना दृष्टी आपण देऊ शकतो. त्याला नेत्रदान म्हणतात. नेत्रदान म्हणजे मृत व्यक्तीच्या डोळयातील बुबुळावरचा पारदर्शक पडदा, कॉर्निया, काढून घेणे. हे काम दहा मिनिटात होते, रक्तस्त्राव होत नाही, डोळे विद्रुप दिसत नाहीत. किंबहुना काही केले आहे असे वाटतही नाही. पण दोन डोळयांना आपण दृष्टी देऊ शकतो. नेत्रदान संमतीचे कार्ड जवळ ठेवावे. ते नाही म्हणूनही काही बिघडत नाही. मृताचे नातेवाईक ऐनवेळी सुद्धा नेत्रदानाचा निर्णय घेऊ शकतात.  वयस्कर व्यक्तींनी तशी इच्छा नातेवाईकाना सांगून ठेवावी. नेत्रदान तरी वय, डोळ्यांची परिस्थिती यावर अवलंबून असत नाही, फक्त कॉर्निया चांगल्या स्थितीत असावा लागतो. व्यक्ती मृत झाल्यावर सहा तासाच्या आत कॉर्निया काढावा लागतो.

खरं म्हणजे आपण सगळे नेत्रदान करू शकतो. प्रत्येकाची इच्छाही असते.पण प्रत्यक्षात तेवढे नेत्रदान होत नाही. त्याचे कारण मला असे वाटते हं, बरोबर की चूक माहित नाही… 

… जेंव्हा घरातली व्यक्ती मृत होते त्यावेळी घरातली माणसे दुःखात असतात. पुरुष जरा लवकर सावरतात, पण त्यांच्या डोक्यात त्यावेळी कुणाकुणाला फोन करायला हवेत, पुढच्या गोष्टी काय काय करायच्या असतात हे सगळं असतं. एखादी व्यक्ती खूप हळवी असते, तिला सावरायचं असतं. अशावेळी त्यांना काही सुचत नसतं. पण मला वाटतं अशा प्रसंगात मदत करणारा (म्हणजे अर्थीचं सामान आणणं, शववाहिका सांगणं इत्यादी) एक नारायण असतोच. त्याने घरातल्या सावरलेल्या व्यक्तीला विचारावं. आय बँकेला फोन करावा. एक पुण्य आपल्या नावावर जमा करावं. अगदी नारायण विसरू शकतो असं समजून तिथे असलेल्यांपैकी कुणीही लक्षात ठेऊन ही गोष्ट करावी. खालची माहिती वाचलीत की तुम्हाला त्याचे महत्व समजेल. मग  प्रत्येक मृत व्यक्तीचे डोळे सत्कारणी लावण्याचे काम कराल ना, नक्की?

जगातल्या ५ लाख अंधांपैकी एक लाखाच्यावर अंध लोक भारतात आहेत. त्यापैकी ६० टक्के १२ वर्षाखालील मुले आहेत. वर्षाला सुमारे दीड लाख नेत्र रोपणांची गरज असते. प्रत्यक्षात फक्त ४०- ४५ हजार नेत्ररोपणाच्या शस्त्रक्रिया होतात. म्हणजे किती मुले नेत्र-रोपणाविना राहतात बघा ! आपण ठरवलं तर त्या सगळ्या चिमुरड्याना जग दाखवू शकतो. मग कविवर्य बा. भ. बोरकरांच्या देखण्या डोळ्यात आपलेही डोळे सामावतील….. 

तेच डोळे देखणे, जे कोंडिती साऱ्या नभा 

वोळिती दुःखे जनांच्या, सांडिती नेत्रप्रभा…

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments