पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

☆ ‘‘पुनर्जन्मा ये पुरुषोत्तमा’’— लेखक – श्री. शंकरराव फेणाणी – ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

पुनर्जन्मा ये पुरुषोत्तमा…

(पु. ल. स्मृती)

गेले काही दिवस पुलंविषयी  बरंच काही छापून आलं, बोललं गेलं, दूरदर्शनवरही दाखवलं गेलं. आज मी आपणास ‘पुलं आणि माझे वैयक्तिक संबंध याविषयी चार शब्द सांगणार आहे.

प्रत्यक्ष मुद्यावर येण्यापूर्वी थोडी पार्श्वभूमी स्पष्ट करणे आवश्यक आहे.

पुलंचे आजोबा, श्री. वामन मंगेश दुभाषी यांच्या कुटुंबियांची कारवारला एक चाळ होती. त्यात आम्ही लहानपणापासून भाडेकरू म्हणून रहात होतो. १९४० साली मॅट्रिकची परीक्षा देण्यासाठी मी व माझी थोरली बहीण मुक्ता, दोघे प्रथम मुंबईला आलो. त्यावेळी कारवारला मॅट्रिकचे सेंटर नव्हते. आल्या आल्या, वडिलांच्या सांगण्यावरून वामनरावांना भेटण्यासाठी आम्ही दोघे पार्ल्याला त्यांच्या राहत्या घरी गेलो असताना त्यांनी रवींद्रनाथ टागोरांच्या ‘गीतांजली’ची त्यांनी, मराठीत अनुवादित केलेल्या पुस्तकाची एक प्रत आम्हाला बहाल केली. वामनराव खरोखर विद्वान असून, संस्कृत पंडित होते. तसेच उत्तम चित्रकारही होते. त्यांनी घरातल्या भिंतींवर रामायण, महाभारतातील काही प्रसंग उत्तम तर्‍हेने चितारले होते. त्यावेळी मी अवघा १७ वर्षाचा होतो व पुलं माझ्याहून फक्त दोन वर्षानी मोठे. तरीही तोवेळपर्यंत माझा व पुलंचा परिचय मुळीच नव्हता.

पुढे १९४२ मध्ये मी वांद्र्याला राहायला गेलो. तिथे राष्ट्रसेवादलाशी संबंध आला आणि मी सेवादल सैनिक म्हणून सेवादलात दाखल झालो. इथंच प्रथम पुलंची ओळख झाली व हळूहळू स्नेहात रूपांतर झालं.

१९४२ च्या चळवळीत सेवादलातर्फे, जनजागृतीसाठी म्हणून त्यावेळी पुलंनी ‘पुढारी पाहिजे’ नावाचा वग लिहिला. सुदैवाने त्यात काम करण्याची संधी मला मिळाली. तमाशाच्या तालमी पुलंच्या राहत्या घरी पार्ल्याला होत असत. ते राष्ट्रप्रेमाने भारावलेले दिवस होते. रात्रौ १२-१२ वाजेपर्यंत तालमी चालत. पुलंच्या दिग्दर्शनाखाली आमची चांगलीच तयारी झाली व लवकरच आम्ही सेवादलातर्फे महाराष्ट्राचा दौरा यशस्वी केला. त्यातील एका शेतक-याचा रोल माझ्या वाट्याला आला होता. माझ्या नावावरून ‘पुलं’नी त्यात एक गाणे रचले होते. त्याची सुरुवात अशी होती,

“शंकरभटा, लवकर उठा,

जागा झाला शेतकरी,”

वगैरे… हा तमाशा साऱ्या महाराष्ट्रात अत्यंत गाजला.

त्याच सुमारास, नामवंत समाजवादी पुढारी ना. ग. गोरे, S.M. ऊर्फ अण्णा जोशी, भाऊसाहेब रानडे यांच्यासारख्या प्रतिष्ठित पुढाऱ्यांचा पुलंना आशीर्वाद लाभला व त्यातूनच अशा थोर मंडळींची ओळख होण्याचे सद्भाग्य आम्हालाही लाभले.

पुढे १९४९ च्या जून महिन्यामध्ये मी माहीमला ‘सारस्वत कॉलनीत’ राहायला आलो. योगायोगानं पुलंची थोरली बहीण वत्सला पंडित सारस्वत कॉलनीत राहायला आल्या. मी ४ थ्या मजल्यावर व पंडित कुटुंब ५व्या मजल्यावर. पुलंचं अधूनमधून बहिणीकडे येणंजाणं असायचं व अशावेळी आम्ही पुलंना आमच्याकडेही बोलवत असू. माझी धाकटी मुलगी पद्मजा त्यावेळी ४-५ वर्षाची होती. तिचा आवाज चांगला असल्यामुळे वत्सलाताई तिच्याकडून गाणी म्हणून घेत असत व तिचे कौतुक करीत. जा पुलंच्या मातोश्री लक्ष्मीबाई मुलीकडे आल्या म्हणजे आमच्याकडे आल्याशिवाय राहत नसत. त्याही पद्मजाकडून गाणी म्हणून घेत व कौतुक करीत. तसंच माझी थोरली मुलगी उषा हिला मी वक्तृत्व स्पर्धेसाठी लिहून दिलेले, “आम्ही विद्यार्थी म्हणजे समाजाचे आरसे” वगैरेंसारखे विविध विषयावरचे लेख, पुलंच्या आई, “मी भाईला हे वाचून दाखवते”, असे म्हणून कौतुकाने घरी घेऊन जात. आणि दरवर्षी वक्तृत्व स्पर्धेत प्रथम पारितोषिक घेऊन येणाऱ्या उषाला बक्षिसानिमित्त भरपूर पुस्तके देऊन कोडकौतुक करीत. दुसऱ्याचे मनापासून कौतुक करण्याचा हा वारसा पुलंना आईकडूनच मिळाला असावा.

पुढे १९७४ मध्ये मी माहीमच्याच ‘अव्हॉन अपार्टमेंट्स मध्ये राहायला आलो. इथे आल्यावर माझ्या नव्या घरी मी त्यांना आमंत्रित केले आणि त्यांनीही आमंत्रण आनंदाने स्वीकारलं. त्यावेळी ते एन.सी.पी.ए.’चे डायरेक्टर इनचार्ज होते. त्यांचे जवळचे नातेवाईक अत्यंत सिरीयस असल्याने अर्ध्या तासाहून अधिक वेळ ते आम्हाला देऊ शकणार नाहीत या पूर्वअटीवर ते आले. त्यांनी आपल्या ड्रायव्हरला बजावलं की, “अर्धा तास झाल्याबरोबर बोलवायला यावं. अर्धा तास होताच ड्रायव्हर आला. पण पुलं पूर्णपणे रमले होते. त्यांनी त्याला अजून एका तासाने यायला सांगितलं, पद्मजाकडून २ गाणी म्हणून घेतली. पंडित अभिषेकींचं, ‘शब्दावाचून कळले सारे’ आणि आणखी एक गीत तिने गायलं. ही ऐकून पुलं खूप खूष झाले. ते म्हणाले, “ही मुलगी पुढे मोठ्ठी गायिका होईल.” पंचवीस वर्षापूर्वीचे भाईंचे हे भाकीत किती खरे झाले हे पाहून पुलं हे एक उत्तम द्रष्टे होते असे म्हणता येईल. तिचं गाणं ऐकून त्यांनी लगेच फर्माईश केली, “पेटी काढा’. पेटीवर मस्तपैकी बालगंधर्वांची दोन नाट्यगीते व दोन राग वाजवून त्यांनी आम्हाला मंत्रमुग्ध केले. त्यांच्या बोटातील जादू अवर्णनीय अशी होती.

हॉस्पिटलमधून निरोप आल्याने आता मात्र जाणे भाग होते. तब्बल दीड तास कसा निघून गेला कळलंच नाही. पुढे त्यांनी रागदारी संगीत पेश करण्यासाठी NCPA वर पद्मजाला संधी दिली. प्रयोग छानच रंगला.

कालांतराने पुलं पुण्याला स्थाईक झाले आणि माझा फारसा संपर्क राहिला नाही. तरीदेखील पद्मजा ज्या ज्या वेळी पुण्याला जात असे तेव्हा पुलंना भेटल्याशिवाय रहात नसे. तेव्हाही ते आणि सुनीताबाई तिच्याकडून दोन-चार गाणी म्हणून घेत व कौतुक करीत. माझ्या कुटुंबाचीही चौकशी करीत. त्यांना मातृभाषेचा फार अभिमान होता. त्यांच्या मातोश्रींप्रमाणे ते सुद्धा आम्हां सर्वांशी कारवारी कोकणीत बोलत.

असा हा- विनोद सम्राट, हास्य रसाचे गिरसप्पा, कवी, लेखक, गायक, नट, चित्रपट निर्माता, दानशूर, बहुरुपी आनंदयात्री आम्हाला कायमचा सोडून गेला आहे. मागे उरली आहे अपेक्षा- समस्त मराठी आठ कोटी बांधवांची त्यांच्याच कवितेच्या ओळी उद्धृत करून मी म्हणतो –

“पाखरा, जा त्यजुनिया, प्रेमळ शीतल छाया,

भेटूनि ये गगनाला,

बघुनि ये देव लोक सारा

विश्व अपार, हृदयी संचित घेऊनि

परतूनी ये घरा

परतूनी ये घरा…”

हे पुरुषोत्तमा, पुन्हा जन्म घेऊन येशील ना?…

लेखक : श्री. शंकर फेणाणी 

©  सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments