श्री सुनील शिरवाडकर
☆ छोटासा ब्रेक… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆
एकाच ऑफिसमध्ये काम करत असुनही रामची आणि माझी भेट बर्याच वर्षांत झाली नव्हती.त्या दिवशी अचानकच तो भेटला.ऑफिसमध्येच.दाढी थोडीशी वाढलेली.. कपाळावर भस्माचे पट्टे.इकडचं तिकडचं बोलणं झालं. म्हटलं.. चल चहा घेऊ.
तर तो म्हणाला.. नको माझं पारायण चालु आहे.
“अजुन करतोस तु पारायण?”
“हो वर्षातुन दोन पारायण करण्याचा नियमच आहे माझा. गुरुपौर्णिमा,आणि दत्त जयंती.”
हो.माहीत आहे मला. पण अजुनही करतो म्हणजे विशेषच की. होतं का वाचन या वयात?”
“हं..आता सगळेच नियम नाही पाळले जात. पण करतो. जसं जमेल तसं”
रामच्या घरी पुर्वीपासुनच दत्त भक्ती. आता ‘गुरुचरित्र’ पारायण करणं म्हणजे त्याचे अनेक नियम.पारायण करणार्याची अंतर्बाह्य शुचिर्भूतता..सोवळे,ओवळे..वाचनाची लय..पारायण काळातील आहार.. ते पांढऱ्या धाबळीवर झोपणे.. पारायणानंतरचे उद्यापन, महानैवेद्य.
हे सगळं रामकडुन आता या वयात कसं होत असेल?
“हे बघ..जेवढं जमेल तेवढं करायचं.आता मी वाचनही संध्याकाळी करतो.दिवसभर ऑफिस झालं की मग घरी गेल्यानंतर स्नान करून वाचनाला बसतो.तेही खुर्चीत. मांडी घालुन आता खुप वेळ नाही बसता येत.नियम म्हणशील तर या काळात बाहेरचं काही खात नाही. आपल्या कडुन होईल तेवढं करायचं.अखेर भावना मोठी.
कारण गुरुचरीत्रातच तर म्हटलंय..
‘अंतःकरण असता पवित्र..
सदाकाळ वाचावे गुरुचरित्र’
एकीकडे पारायण सुरु असतानाच वारकर्यांना ओढ लागते ती पंढरीची.शेतकर्यांनाही जरासा विसावा, चेंज हवाच असतो ना!आता आषाढ सुरु झाला. वेगवेगळ्या संतांच्या पालख्या पंढरपुरच्या वेशीजवळ येऊ लागतात.वर्तमान पत्रात फोटो, बातम्या येऊ लागतात.
पुण्यात ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे थाटात स्वागत.
‘आज सासवड मध्ये पालख्या पोहोचल्या.
वाखरी गावात रिंगण रंगले..
पंढरपुरात पालख्या दाखल..
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा करण्यात आली.
एकंदरीतच आषाढ महीना म्हणजे थोड्याशा विश्रांतीचा.आपल्या नेहमीच्या रुटीनपासुन वेगळं काही करण्याचा.ईश्वरभक्ती करण्याचा.निसर्गाच्या जवळ जाण्याचा.छोटासा ब्रेक घेण्याचा.
बर्याच कुटुंबात एक परंपरा असते.आषाढ महीन्यात देवीला नैवेद्य अर्पण करण्याची.गावाच्या वेशीवर असलेल्या ग्रामदेवतेला खिर पुरीचा नैवेद्य दाखवायचा.पावसाळ्यात साथीचे आजार जास्त प्रमाणात पसरतात.मग आपल्या लहानग्यांना त्याची बाधा होऊ नये यासाठी देवीला साकडे घालायचे.हा नैवेद्य बनवणे यालाच अनेक घरांमध्ये ‘आखाड तळणे’ असं म्हटलं जातं.
एकेकाळी व्यापारी वर्गासाठी हा महीना लाडका असायचा.म्हणजे बघा.. दोन तीन महीन्याची लग्नसराई आता संपलेली आहे. पुर्वी आषाढात लग्न होत नसायचे. तर लग्नसराईत चांगला धंदा झालेला.मुलांच्या शाळा आता रेग्युलर सुरु झाल्या आहेत.वह्या, पुस्तके, दप्तर वगैरे ची खरेदी पण आटोपली आहे. गाठीशी बर्यापैकी पैसा.दोन तीन महीने धावपळ, दगदग झालेली.अर्थात ती पण हवीहवीशी.
तर आता या महीन्यात आराम करायचा. सगळा आसमंत हिरवागार झालेला आहे.बाहेर छान पाऊस पडतो आहे. गावागावांत तर निसर्ग बहरलेला आहेच.पण शहरांच्या आसपासही हिरवाई पसरलेली आहे छोटे मोठे धबधबे कोसळत आहे.वर्षा सहलीसाठी पर्यटकांचे थवे बाहेर पडत आहे.
अगदीच काही नाही तर आपल्या बाल्कनीत बसुन चहाचे घोट घेत पावसाचा आनंद घ्यायचा.बस्स..आपल्यासाठी जगायचं.मग श्रावण सुरु झाला..सणवार सुरु झाले की आहेच सगळ्यांची धावपळ.
आषाढात गिर्हाईकी नाही.. धंदा शांत.पण त्याचा खेद करायचा नाही. कारण त्या पिढीतल्या लोकांचं म्हणणंच असायचं..
‘आषाढ मंदा..तो सालभर धंदा’
© श्री सुनील शिरवाडकर
मो.९४२३९६८३०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈